आ. रणधीर सावरकरांनी बांधावर जाऊन घेतला आढावा, शेतकऱ्यांना दिला धीर
🔷अकोला : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी आज मतदारसंघातील टाकळी बुद्रुक, हनवाडी, किनखेड या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि पाणीटंचाईच्या समस्येची माहिती घेतली. यावेळी गावातील शेतकऱ्यांसोबत सविस्तर संवाद साधत त्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.
"हिंदुस्थानचा शेतकरी हा देशाचा कणा आहे. आज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे, पण या संकटात आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले.
पिण्याच्या पाण्यासाठी विशेष नियोजन
येणाऱ्या काळात केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभाग, जिल्हा प्रशासन आणि सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने संपर्क साधून दुष्काळावर कशी मात करता येईल याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक गावात पाण्याचे टँकर, विहिरींचे खोलीकरण आणि जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याबाबतही त्यांनी सांगितले.
सरकार लवकरच दुष्काळी परिस्थितीचा अहवाल घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री आकाश फुंडकर हे स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे पदाधिकारी विनोद मंगळे, मधुकर पाटकर, विवेक भरणे, मंगेश घुले, टाकळीचे सरपंच निळकंठ वसू, अनिल इंगळे, संतोष फसाले, वासुदेव पाटकर, अनिल फसाले, समाधान येरोकार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा