(SUPER NEWS-24-मराठी)
✍🏻 अकोला : शेतकऱ्यांना दिवसा आणि खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत अकोला जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टापैकी ८३.४० टक्के ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य पूर्ण केले आहे.
वाशीम जिल्ह्याने ७०.४३ टक्के उद्दिष्टपूर्तीसह राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. अकोला परिमंडळाने ६०.८० टक्के कामगिरीसह राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती 'महावितरण'चे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी दिली. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. अकोला परिमंडळासाठी २०६ ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून महावितरणच्या १७४ उपकेंद्रांसाठी ७९६ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १०७ उपकेंद्रांच्या माध्यमातून ४८४ मेगावॉट वीज निर्मिती सुरू झाली असून, परिमंडळातील १ लाख १६ हजार शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध झाली आहे. अकोला जिल्ह्यात ५१ उपकेंद्रांपैकी ४१ उपकेंद्रांसाठी वीज निर्मिती सुरू झाली आहे. २४७ मेगावॉटच्या उद्दिष्टापैकी २०६ मेगावॉट म्हणजेच ८३.४० टक्के सौर ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. वाशीम जिल्ह्यात ४४ पैकी ३० उपकेंद्रांसाठी वीज निर्मिती सुरू असून, १८६ पैकी १३० मेगावॉट म्हणजेच ७०.४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३६३ पैकी १४७ मेगावॉट, म्हणजे ४०.५० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. या योजनेमुळे अकोला परिमंडळातील १ लाख १६ हजार २१६ शेतकऱ्यांना खात्रीशीर व दिवसा वीजपुरवठा होत आहे. यात अकोला जिल्ह्यातील ५५ हजार १२३, वाशीम जिल्ह्यातील ३४ हजार २४४ आणि बुलडाणा जिल्ह्यातील २६ हजार ८४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.(सौ.अॅग्रोवन)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा