सामाजिकतेतील सहसचिव प्रवीण वासनिक
✍🏻 एक ऑगस्ट 2026. वेळ रात्री अकरा वाजताची. माझा फोन खणखणला. माझे सहसचिव श्री प्रवीण वासनिक यांचा तो फोन होता. श्री तुकाराम मुंढे यांचा अमरावतीच्या पोटे टाऊनशिप मधील भरगच्च कार्यक्रम संपून अडीच तास झाले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावावरून आलेल्या लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रवीण वासनिक वर दिली होती. त्या जबाबदारीतून मोकळे झाल्यानंतर त्याने मला फोन केला होता. सर्वांची भोजन व निवास व्यवस्था झाल्याचे त्यांनी मला कळविले व मला सर तुम्ही कुठे आहात. मी म्हणालो मी सर्किट हाऊसला श्री तुकाराम मुंढे यांच्याबरोबर आहे.
त्यावर तो म्हणाला माझी भेट होईल का. मी म्हणालो ये निश्चितच होईल. आम्ही सरांशी चर्चा करीत आहोत. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या प्रवीणशी श्री तुकाराम मुंढे यांची भेट झाली ती अशी.
प्रवीण वासनिक आमच्या मिशन आयएएसचा सहसचिव. खऱ्या अर्थाने काम करणारा नव्हे दिलेल्या कामांमध्ये झोकून देण्यात प्रवीण असणारा प्रवीण अशी त्याची ओळख मी लोकांना करून देतो. आणि ती योग्यच आहे.
प्रवीणचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे त्याने शोधून काढलेली पुणे येथील सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेली पहिली मुलींची शाळा. असाच प्रवीण
पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याला गेला. सावित्रीबाईची शाळा शोधायला. सावित्रीबाई फुले यांची शाळा शोधायला त्याला वेळ लागला. कारण आता फक्त तिथे रोडवर छोटासा फलकच राहिला होता. तोही न दिसणारा. त्याला ते खूपच वाईट वाटले आणि गेले अनेक वर्ष तो सावित्रीबाई फुले यांच्या त्या शाळेच्या स्मारकासाठी भांडत राहिला. निवेदन देत राहिला आणि आत्ता कुठे त्यात तो यशस्वी झालेला आहे.
सुमारे 35 वर्षांपूर्वी त्याने त्यांच्या मांजरी म्हसला या गावात सार्वजनिक वाचनालय सुरू केले. मांजरी मसला हे तसे आळवळणाचे गाव. बडनेरा अंजनगाव बारी मार्गे या गावाला जावे लागते. पस्तीस वर्षांपूर्वी कशी परिस्थिती असेल याची कल्पना न केलेली बरी. पण त्याने वाचनालय काढले. त्या वाचनालयायातून एक मुलगा आता क्लासवन अधिकारी झाला आहे. मी माझ्या गावासाठी काय करू शकतो यासाठी प्रवीण सतत काम करीत असतो. या ना त्या निमित्ताने आम्ही त्याच्या गावला अधून मधून भेटी देतो त्याला प्रोत्साहन देत असतो. परवा मी व मातोश्री लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.कमलताई गवई त्याच्याकडे जाऊन आलो. प्रवीणने गावात काही लोकांचे सत्कार ठेवले होते. प्रवीण ने आम्हाला शब्द टाकला. कमलताईचा स्वभाव तर नाही म्हणण्याचा नाहीच आहे. आणि प्रवीण तर माझा पट्ट शिष्य. गावात गेल्यानंतर आम्हाला एक आनंद झाला प्रवीणने वाचनालयासाठी स्वतंत्र जागा मिळवली आहे. त्याच्या प्रयत्नाला यश आले आहे.
फुले शाहू आंबेडकर चळवळ प्रवीणच्या कणाकणात भिणलेली आहे. तो 100% या चळवळीमध्ये काम करतो. कोणत्याही व्यक्तीचे स्वागत करायचे असेल तर तो बोधी वृक्ष सप्रेम भेट देतो. आजवर त्याने शेकडोंच्या संख्येमध्ये बोधी वृक्षाचे वाटप केले आहे. गाजर गवत निर्मूलन चळवळीत त्याने स्वतःला पूर्ण वाहून घेतले आहे. गाजर गवताचे दुष्परिणाम त्यांनी स्वतः पाहिलेले आहेत. म्हणून गाजर गवत निर्मूलन मोहीम त्याने हाती घेऊन वेळोवेळी थोरामोठ्यांना निवेदन देऊन हे गाजर गवत कसे नष्ट करता येईल त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
आमच्या मिशन आयएएस मध्ये तो जरी सहसचिव असला तरी त्याची भूमिका एका निष्ठावंत कार्यकर्त्याची आहे. पडेल ते काम करणारा विचारपिठावर बसण्याची धडपड न करणारा कोणतेही काम वक्तशीर करणारा प्रवीण त्यामुळे सर्वांच्या लक्षात राहतो. मिशन आयएएसचे कोणतेही काम त्याच्यावर सोपवले तर तो ते प्रामाणिकपणे पार पाडतो. आमच्या भगिनी सौ प्रभाताई आवारे ह्या अमरावती महानगरपालिकेच्या सभापती म्हणून काम करीत होत्या. प्रवीण त्यांच्याशी तेव्हापासून जुळलेला आहे. आता वयोमानाप्रमाणे त्यांना नेण्या आणण्याची व्यवस्था आम्ही प्रवीणवर सोपविलेली आहे आणि ती त्याने आतापर्यंत तरी व्यवस्थित पार पडलेली आहे.
वक्तशीरपणा हा एक प्रवीण मधला महत्त्वाचा गुण आहे. मिशन आयएएसच्या कार्यक्रमात तर तो पूर्णतः सहभागी आहेच पण याशिवाय इतर कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला तो वेळेपूर्वी उपस्थित असतो. नेहमी शुभ्र वस्त्र धारण करणारा प्रवीण त्याचमुळे सर्वांच्या लक्षात राहतो. एक चांगला सहसचिव प्रवीणच्या निमित्ताने आम्हाला प्राप्त झाला याचा आम्हाला अभिमान आहे. झाडांवर प्रेम करणारा सावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारा वृक्षारोपण ग्रंथ चळवळ गाजर गवत निर्मूलन यासाठी वाहून घेतलेल्या प्रवीणला शुभेच्छा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा