• श्री गजानन महाराज संस्थान, शेगावकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाख रुपयांची मदत
• सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवत सेवा परंपरेचा जागर
शेगाव –
महाराष्ट्र राज्यात यावर्षी अतिवृष्टीने मोठे संकट ओढवले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. A-250, बुलडाणा) या श्रद्धास्थानाने सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. १ कोटी ११ लाखांचा निधी सुपूर्द केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे धनादेश सुपूर्द
दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री संस्थानच्या वतीने हा मदतनिधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृतरित्या धनादेशाद्वारे (Cheque) सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक सेवा करणारे संस्थान नसून, आपत्तीच्या काळात सामाजिक उत्तरदायित्व निभावणारा एक आदर्श केंद्र आहे. या पूर्वीही संस्थानने आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी कार्य केले आहे.
संस्थेचा सेवाभाव कायम
शेगाव संस्थानच्या या भरीव मदतीमुळे अनेक पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळणार असून, इतर संस्थांसाठीही ही एक प्रेरणादायक कृती ठरेल. "गजानन महाराजांचा सेवाभाव आणि सामाजिकतेचा विचार संस्थेच्या प्रत्येक उपक्रमातून प्रत्ययास येतो," अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. राज्यातील पूरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थानने दिलेला १ कोटी ११ लाखांचा मदतनिधी हा फक्त आर्थिक मदत नसून, एक सामाजिक संदेश आहे – "जेथे समाज संकटात आहे, तेथे सेवेसाठी पुढे या."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा