अकोला : व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विशाल पुरंदरे व रोखठोक लेखनासाठी पत्रकार विशाल राजे बोरे यांचा उद्योगपती जसपाल सिंग नागरा यांच्या हस्ते स्थानिक शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याची परिवर्तन युवक संघटनेचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची संकल्पना होती. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती तथा हॉटेल जसनागराचे मालक जसपाल सिंग नागरा लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन भारसाकळे उपस्थित होते. यावेळी बोलताना जसपाल सिंग नागरा यांनी अकोल्यातील पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे संतुलित आहार घेतल्याने कोणताही असाध्य आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे देखील पटवून दिले. हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च न करता आधी आपल्याशी संपर्क साधावा, आपण विनामूल्य उपचाराविषयी मार्गदर्शन करू असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचप्रमाणे प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनीही समाजातील विविध घटकांचा विकास होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सत्कार समारंभ म्हणजे केवळ हारतुरे नव्हे तर पुढील कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे असे ते म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा