गणेशोत्सवाला जागतिक ओळख देण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करा : पो.अ.अर्चित चांडक यांचे गणेश मंडळे व नागरिकांना आवाहन
•अकोला : श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दलाच्या वतीने श्री गणेशोत्सव मंडळे तसेच शांतता समिती सदस्यांची बैठक २२ सप्टेंबर रोजी निमवाडी येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, उपविभागीय अधिकारी जावडे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अकोला शहर व परिसरातील ४८१ श्री गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहून गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.
“गणेशोत्सवाला जागतिक ओळख देण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करा”
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेश मंडळे आणि भाविकांनी काय करावे व काय करू नये, याबाबतचे माहितीपत्रक प्रत्येक मंडळासमोर लावण्यात आले आहे. त्यातील सूचनांचे मंडळांकडून पालन होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “एक मंडळ, एक पोलीस अंमलदार” ही योजना यंदा राबविण्यात येत असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक चांडक यांनी दिली. गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी तसेच अकोल्यातील नागरिकांनी Bappa.org वर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
विसर्जन मार्ग व घाटांची पाहणी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून विसर्जन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विसर्जन घाट आणि विसर्जन मार्गांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. नागरिकांनी आनंदाने आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा; पोलीस दल त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले. त्यांनी श्री गणेशोत्सवाची पूर्वपरंपरा तसेच बैठकीचा उद्देश स्पष्ट करून मार्गदर्शन केले. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी पोलीस मदत क्रमांकाबाबत माहिती दिली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती देत गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांनी गणेश मंडळे आणि पोलीस विभागामध्ये प्रभावी समन्वय कसा राहील, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा