कधी थांबायचे हे कळले पाहिजे !
‘मंज़िल की चाह रखो,
मगर ठहरना भी सीखो,
जो मिल गया है ज़िंदगी में,
उसे सँभालना भी सीखो!’
माणसाच्या आयुष्यात ‘मिळवणे’ जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ‘कुठे थांबायचे’ हे ओळखणेही महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा माणसाला पुढे घेऊन जाते; पण हव्यास अनेकदा मिळालेलेही हिरावून घेतो. सध्या सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वातील पुण्याच्या अर्पिता झा यांची अलीकडील घटना आणि २०२४ मधील डॉ. नीरज सक्सेना यांचा प्रसंग या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने हाच जीवनधडा सांगतात.
‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजे ज्ञान, आत्मविश्वास आणि नशिबाची परीक्षा. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांसाठी प्रत्येक प्रश्नासोबत पैशाची रक्कम वाढत जाते. काही हजारांपासून सुरू झालेला प्रवास लाखो आणि कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचतो. अशा वेळी ‘आता थांबावे की आणखी पुढे जावे?’ हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
याचाच अलीकडील प्रत्यय सप्टेंबर २०२६ मध्ये आला. पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर अर्पिता झा ‘कौन बनेगा करोडपती-१८’च्या हॉट सीटवर पोहोचल्या. त्यांच्या कुटुंबाने आर्थिक अडचणींचा मोठा काळ पाहिला होता.
अर्पिता यांनी खेळात उत्तम कामगिरी करत रु.५० लाखांची रक्कम जिंकली. त्यानंतर त्यांच्यासमोर होता रु. एक कोटीचा प्रश्न. पण त्या टप्प्यावर त्यांच्या सर्व लाइफलाइन्स संपल्या होत्या आणि प्रश्नाचे उत्तर त्यांना निश्चितपणे माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढे जोखीम न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि रु.५० लाख घेऊन बाहेर पडल्या. नंतर त्यांनी दिलेला अंदाज चुकीचा ठरला.
आता या प्रसंगाची तुलना २०२४ मधील आणखी एका kBC घटनेशी करावी लागेल. KBC-१६ मध्ये कोलकात्याचे डॉ. नीरज सक्सेना यांनी रु.३ लाख २० हजारांचा टप्पा गाठल्यानंतर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी केवळ स्वतःच्या जिंकलेल्या रकमेचा विचार केला नाही, तर इतर तरुण स्पर्धकांनाही संधी मिळावी, या भावनेतून खेळ सोडला.’जो प्राप्त है, वो पर्याप्त है’ अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.अमिताभ बच्चन यांनी हा प्रसंग विशेष असल्याचे सांगितले आणि अनेक वर्षांच्या KBC इतिहासात सहस्पर्धकांना संधी देण्यासाठी अशा प्रकारे खेळ सोडण्याचे हे पहिले उदाहरण असल्याचे नमूद केले. तसेच यासाठी ३ लाख २० हजार बोनस देवून एकूण ६ लाख ४० हजार दिले.
दोन घटना.
दोन वेगवेगळ्या परिस्थिती. पण एक समान प्रश्न — कुठे थांबायचे? डॉ. नीरज सक्सेना यांच्यासाठी थांबण्यामागे इतरांना संधी देण्याची भावना होती.
आज प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक मिळवण्याची स्पर्धा आहे. पैसा हवा, मोठे घर हवे, महागडी गाडी हवी, मोठे पद हवे, प्रसिद्धी हवी... एक ध्येय पूर्ण झाले की दुसरे उभे राहते. एक पायरी चढली की पुढची पायरी खुणावते.
महत्त्वाकांक्षा वाईट नाही. उलट महत्त्वाकांक्षेमुळेच माणूस प्रगती करतो. पण महत्त्वाकांक्षा आणि हव्यास यांच्यात एक बारीक रेषा असते. ती रेषा ओळखता आली पाहिजे. कधी कधी आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा जे नाही, त्याचाच विचार आपण अधिक करतो. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंदही घेता येत नाही.
आजच्या काळात हा धडा कुटुंबासाठीही महत्त्वाचा आहे. पालकांनी मुलांकडून सतत अधिक अपेक्षा ठेवणे, तरुणांनी सतत इतरांशी स्वतःची तुलना करणे, नोकरी, व्यवसायात अधिकाधिक कमावण्याच्या नादात आरोग्य आणि नाती दुर्लक्षित करणे, या सगळ्याचा शेवट कुठे?
आपण स्वतःला कधीतरी विचारले पाहिजे —
माझ्यासाठी ‘पुरेसे’ म्हणजे नेमके काय?
हा प्रश्न पैशापुरता मर्यादित नाही. तो वेळेलाही लागू होतो, नात्यांनाही लागू होतो आणि महत्त्वाकांक्षेलाही लागू होतो. शेवटी जीवनाची खरी श्रीमंती केवळ बँक खात्यातील आकड्यांनी ठरत नाही. मनःशांती, समाधान, नाती, माणुसकी आणि इतरांसाठी काही करण्याची भावना—हीसुद्धा जीवनाची संपत्ती आहे.
शेवटी सरळ सरळ सांगायचे तर—
आयुष्यात मोठी स्वप्ने पाहा, मोठी ध्येये ठेवा, भरपूर मेहनत करा; पण ‘अजून... अजून...’च्या न संपणार्या शर्यतीत स्वतःचे समाधान हरवू नका. कारण यश म्हणजे केवळ किती मिळवले याचे नाव नाही; तर मिळालेल्या गोष्टीचा आनंद घेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जगता येणे हेही यशच आहे.
कधी पुढे जायचे आणि कधी थांबायचे हे ज्याला कळते, त्यालाच खर्या अर्थाने जगण्याचे गणित समजते!
शेवटी या आशयाचा एक शेर आठवतो...
‘हसरतें पूरी हों, ये जरूरी तो नहीं,
जो मिला है वही कम है, ये भी जरूरी तो नहीं;
सुकून मिल जाए अगर थोड़े में जिंदगी का,
तो हर बार ज्यादा पाने की जरूरत भी नहीं!’
- डॉ. राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक तसेच पत्रकारितेत पीएच.डी.पदवी प्राप्त आहेत.)




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा