नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
जिल्हाधिकाय्रांना सनातन संस्कृती महासंघाचे निवेदन
•अकोला :
मानव, पशुपक्षी आणि पर्यावरणासाठी घातक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, तसेच वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन सनातन संस्कृती महासंघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्याची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच महानगरपालिका आयुक्त यांना देखील देण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, पुर्वी सुती दोऱ्याच्या मांजाने पतंग उडविण्यात येत होत्या. गेल्या काही वर्षांपासून सुती दोऱ्याच्या मांजाची जागा नायलॉन मांजाने घेतली आहे. नायलॉन मांजा अतिशय घातक असल्याचे सर्वश्रुत आहे. नायलॉन मांजा गळ्यात तसेच दुचाकी वाहनात अडकल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
पक्षी आणि प्राणी यांच्या जिवीतासाठी देखील नायलॉन मांजा धोकादायक आहे. दोऱ्याच्या मांजा प्रमाणे नायलॉन मांजा नष्ट होत नसल्याने पर्यावरणासाठी पण हानीकारक आहे.
बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेसुमार विक्री आणि वापर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याबद्दल तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वारंवार आदेश देऊनही कोणताही सकारात्मक परिणाम न मिळाल्याने न्यायालयाने आता आदेशा द्वारा थेट कठोर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले आहेत.
नायलॉन मांजाचे पुरवठादार आणि विक्रेता यांना २.५ लाख रुपये दंड तर नायलॉन मांजा वापरताना आढळलेल्या सज्ञान व्यक्तीला तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांना ५०००० रुपये दंड प्रस्तावीत केला आहे. नायलॉन मांजा संबंधित जनहित याचिका न्यायालयाने स्वतःहून दाखल केली आहे.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, सध्या महानगरपालिका निवडणूकीचे वारे वाहत आहे. १४ जानेवारी रोजी "मकरसंक्रांत", आहे १५ जानेवारी रोजी मतदान असून १६ ला मतमोजणी होणार आहे. शासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहिल. याचा गैरफायदा नायलॉन मांजाचे विक्रेते आणि वापर करणारे घेऊ शकतात.
सर्वसामान्य नागरिक, पशूपक्षी यांच्या जिवीतांचे तसेच पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने, नायलॉन मांजाचे विक्रेते तसेच मांजाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती सनातन संस्कृती महासंघातर्फे करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी महासंघाचे हेमंत जकाते, नरेंद्र कराळे, मनोज अग्रवाल, हेमल खिलोसीया, सुबोध देशमुख, महेश शाह, पंकज सिधारा, मोहीत नायसे, अभिजित कराळे, ऋषीकेश जकाते आदी कार्यकर्ते उपस्थित असल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड आणि देवानंद गहिले यांनी कळविले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा