मुसळधार पावसात भक्तीचा महापूर..
लेखक :
वृत्तदर्पण..✍️ राजेंद्र काळे
मातृतिर्थ सिंदखेडराजा.. परिवर्तनाचा केंद्रबिंदू.
_याच मातीतून परिवर्तनाची ललकारी ठोकल्या गेली होती ती, मुघल साम्राज्य विरोधात. राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्म जेंव्हा झाला, तेंव्हा याच सिंदखेडनगरीत हत्तीवरुन साखर वाटल्या गेली होती ती लखुजी राजे जाधव यांच्या माध्यमातून. अनेक चळवळी व विचार याच सिंदखेडराजातून पुढे गेले. मराठा सेवा संघाची ही तर कर्मभूमी, जिजाऊ सृष्टी असो की, शिवधर्मपीठ.. परिवर्तनाचा दिपस्तंभ मानल्या जातो. अनेक वारकरी चळवळी सुध्दा याच नगरीत झाल्या त्या टाळ-मृदुंगाच्या निनादात. इथं विणेचा गजर झाला, अन् तलवारींचा खणखणाट सुध्दा!_
अशा सिंदखेडराजा नगरीत काहीतरी भव्य-दिव्य करण्याचे स्वप्न महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणार्या संस्थांचे म्हणा की, पीठांचे.. असतेच. असंच एक भक्तीपीठ म्हणजे श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी. आज या केंद्राचा विस्तार महाराष्ट्रभर झाला आहे. लाखोंच्या संख्येत सेवेकर्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. विविध ठिकाणी या माध्यमातून सत्संग मेळावे होत असतात. असाच महासत्संग मातृतिर्थ सिंदखेडराजात व्हावा, या परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेला आकार मिळाला तो मंगळवार २० मे रोजी. सिंदखेडराजा येथे ‘जागर स्त्रीशक्तीचा, गजर राष्ट्रभक्तीचा’ या ब्रीदवाक्यांतर्गत राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याची तयारी जवळपास महिना ते दीड महिनाअगोदर सुरु होती. कारण राज्यभरातील स्त्री शक्ती या मेळाव्यासाठी सिंदखेडराजाला उपस्थित राहणार होती. ५१ कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात सन्मान झाला, वधु-वर परिचय मेळावा, भव्य रोजगार मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रहितार्थ दुर्गा सप्तशती पाठवाचन, पर्यावरण प्रकृती विभाग द्वारा महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या पवित्र मातीचे आणि भगव्या ध्वजाचे पुजन.. आदी विविध कार्यक्रम या राष्ट्रीय सत्संगाचे वैशिष्ट्य. तयारी जोरात सुरु होती. सेवेकरी तथा आयोजक नियोजनात व्यस्त होते. शेवटच्या ८-१५ दिवसात इतरत्र पाऊस पडत होता, पण कार्यक्रमस्थळी पाऊस होत नव्हता. तरीसुध्दा वॉटरप्रुफ मांडव टाकल्या गेला. मंगळवार हा कार्यक्रमाचा दिवस उजाडला. उद्घाटन झाले, विविध सत्रही सुरु झाले. मुख्य सोहळा म्हणजे गुरुमाऊलींच्याहस्ते पुरस्कार वितरण व त्यांचे मार्गदर्शन, तो कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता. परंतु दुपारी अचानक आभाळ भरुन आले, अन् ३ वाजता मुसळधार पाऊस सुरु झाला. या पावसाचा जोर इतका होता की, २ तासातच व्यवस्था फोल पडली. कनाती उडून गेल्या. कार्यक्रमस्थळी वॉटरप्रुफ मंडपाचा खालचा भाग वगळता चिखल झाला. आता काय होणार? या विवंचनेतही सायंकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे कार्यक्रमस्थळी पोहोचले. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, ना.रक्षाताई खडसे, आ.मनोज कायंदे यांच्यासह अनेक राजकीय नेते अगदी सहपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तथा प्रशासकीय क्षेत्रातीलही काही अधिकारी उपस्थित होते.
_गुरुमाऊलींचे उद्बोधन सुरु झाले, ज्या मातेने छ. शिवाजी महाराजांसारखा महान पुत्र घडवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.. त्या मातेचे चरित्र केवळ प्राथमिक शाळेत देवून चालणार नाहीतर राजमाता जिजाऊंचा जीवन आदर्श उच्च शिक्षणासाठी अभ्यासात आणण्याचे आवाहन त्यांनी करुन पुढच्या पिढ्यांना आपणाला राजमाता जिजाऊंचा आदर्श आचरणात आणण्यासाठी चांगले संस्कार होणे गरजेचे असल्याचे सांगत, भारतीय संस्कृतीचा मूळ पाया जिजाऊंचा जीवनादर्श असल्याचे सांगत भारताशिवाय जगातील इतर कोणत्याही देशाला भारतमाता म्हटले जात नाही, याला कारणीभूत फक्त आपल्या माता-भगिणी असल्याचे सांगत घराघरात श्रावणबाळ निर्माण होण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज प्रतिपादीत केली. मुसळधार पावसातही तिथे दिसला भक्तीचा महापूर. महासत्सगांत चिंब भिजलेला जाणवला जागर स्त्री शक्तीचा.. तत्पुर्वी राजवाड्यात जाऊन झाले ते, विश्वमाऊलीच्या चरणी नतमस्तक गुरुमाऊली!_
▪️ *महापूर..*
ऊन जरा जास्त आहे दरवर्षीवाणी,
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं..
तरीही पाऊलं चालत राहतात, मन चालत नाही.. घामाशिवाय शरीरामधे कुणीच बोलत नाही!
तितक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो,
उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो..
डोळ्यांसमोर ऋतू कुस बदलून घेतो,
पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो!
_पावसाच्या अशा आशयाच्या काही कविता या पावसाळ्याच्या तोंडावरच चांगल्या वाटतात. वळीवाचा पाऊस हा वळीवासारखाच बरसायला हवा. तो जर आषाढासारखा कोसळायला लागला तर बरं नाही वाटत. मे महिना तसा भर उन्हाचा, वैशाखाच्या वणव्याचा. पण यावर्षी मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यातच पावसाळा सुरु झाला की काय? असं भासायला लागलं. मार्च अन् एप्रिल हे दोन महिने तप्त उन्हाचे होते. त्यामुळे मे महिना हा रणरणत्या वणव्याचा राहिल, ही अपेक्षा होती. या महिन्यात लगीनसराई दाट होती. तसा आंब्याचा अन् रसाळीचाही हा महिना. परंतु या महिन्यातच आकाशात ढगांनी केलेली गर्दी अन् कोसळायला लागलेला पाऊस, यामुळे लग्नांची पुरती दाणादाण उडाली. मंगल कार्यालयातल्या लग्नांना तरी छत असते, परंतु खेड्यावरची लग्ने ही उघड्यावर होत असतात. अशा लग्नांमध्ये झालेली फजिती अन् त्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झालेले फोटो पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही._
मुख्यमंत्री हे विजयराज शिंदेंकडील लग्नात आले होते, त्या बुलढाण्याच्या लग्नाआधीही झालेला पाऊस, मागच्या वर्षीही विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या लग्नाच्या एक दिवशी आधी पडलेला पाऊस.. लग्न गरीबांचे असो की, श्रीमंतांचे.. पाऊस सारखीच दाणादाण उडवतो. कोसळलेल्या, अजूनही कोसळत असणार्या या पावसाने शेतीचेही बरेच नुकसान केले आहे.. काढणीला आलेला भुईमूग अन् कडब्याचे काडही भिजले आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश हे पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या अचानक अवकाळी पावसाने उन्हाळ्यातच आले काही नदीनाल्यांना.. महापूर!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा