श्री बाबा व सौ. वैशाली आणि जीवनगौरव पूरस्कार. . .
लेखक :
© निशिकांत, अकोला.
संपर्क -९८५०३४२४०४
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नभांगणात अनगिनत तारे आहेत. आपल्या आपल्या कार्याने ते प्रकाश पसरवीत असतात...निश्चल, निर्मोहीपणे आणि कोणताही गवगवा न करता. यातील अनेकांना जवळून अनुभवता आलं, हे आमचं भाग्य!
श्री. दिनकर नारायणराव उपाख्य बाबा देशपांडे हे मूळ अकोला निवासी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अकोल्यातील काळा मारोती प्रभात शाखेचे स्वयंसेवक. श्रीमती ल.रा. तो. वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. संघ दृष्टया तृतीय वर्ष शिक्षित. तीन वर्षे दि अकोला अर्बन को-ऑप बँकेत सेवा दिली. पराकोटीची संघनिष्ठा, त्याग, समर्पण ही मूल्ये प्रत्यक्ष ज्यांच्या जीवनात अनुभवावयास येतात त्या बाबा सरांनी ख़ुप संघर्ष करून, अत्यंत परिश्रमाने आपल जीवन घड़वले. आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी खंबीरपणे कर्तव्य पार पाडल्यानंतर सन १९९४ सालापासून भारतमातेच्या सेवेसाठी जीवन समर्पण करण्यासाठी क्षणभरही वेळ न दवडता संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले.
गडचिरोली, भंडारा, मेळघाट, छत्तीसगड़ च्या जंगलामधे असो की सुदूर सिक्किम असो बाबा सरांनी संघ योजनेनुसार कार्य केले. सन २००१ पासून पारिवारिक पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून वनवासी कल्याण आश्रमाच्या विविध जवाबदा-यांसाठी दोघाही पती-पत्नींनी स्वत:ला समर्पित केले. सन २०२१ ते २४ या काळांत वनवासी कल्याण आश्रमाचे गोवा प्रांत संघटनमंत्री म्हणून कार्य केले. सन २०२४ पासून कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र वसतिगृह प्रमुख म्हणुन दायित्व आहे व सध्या त्यांचे केंद्र रावेत-पूणे आहे.
पुस्तकाच्या पानांवर ज्या गोष्टी आपण वाचतो, त्याची प्रत्यक्ष अनुभूती या आपल्या बाबा मध्ये सर्वानी नेहमी घेतली आहे, आपल्या सर्वांच्या सारख्या साधारण परिस्थिति मधून वेगळी वाट निवडून, त्यावर जिद्दीने आणि मूल्य घेऊन चालणारे बाबा म्हणूनच सर्वासाठी आदरणीय आहे... बाबा उत्तम गायक आहेत, प्रभावी वक्ता आहेत, अफाट जनसंपर्काची विशेष हातोटी असलेला हाडाचा कार्यकर्ता आहे. आजच्या फेसबुक-व्हाट्सएपच्या काळात प्रत्यक्ष स्नेहाचे अमृत घेऊन सर्वांशी संपर्क ठेवणारा कर्मयोगी मित्र आहे.
सौ. वैशाली दिनकर देशपांडे, मूळ गाव मूर्तिजापूर जि अकोला, शिक्षण - एम. ए. (मराठी) राष्ट्र सेविका समितीची बालपणापासून सेविका.
समितिदृष्ट्या प्रबोध वर्ग (द्वितीय वर्ष) शिक्षित.पत्रकारितेचा अभ्यास झाला आहे. तसेच विवाहपूर्व पत्र द्वारा दासबोध अभ्यास पूर्ण झाल्यावर दासबोध मंडळाचे ३ वर्ष काम केले. महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेचे विविध दायित्व घेऊन अकोला जिल्ह्यात सक्रियपणे ५ वर्ष काम केले. संस्कार वर्ग चालविले. शाळेत २ वर्ष शिक्षिका म्हणून काम पाहिले. विवाह झाल्यावर दोघेही पती-पत्नी गत २४ वर्षांपासून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णकालिन कार्यकर्ते आहेत.
मेळघाट,छत्तीसगढ,सिक्कीम या ठिकाणी विविध दायित्व घेऊन कार्य केले. कोरोना काळात ठीकठिकाणच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या अनुभवांवर आधारित ३५ ब्लॉग्ज लिहिलेत. पुण्यात आल्यावर ३वर्ष पश्चिम महाराष्ट्र महिला कार्य सह प्रमुख ,नंतर प्रमुख म्हणून जबाबदारी होती. सध्या गत ३ वर्षांपासून पश्चिम क्षेत्र महिला कार्य प्रमुख म्हणून दायित्व आहे.
पश्चिम क्षेत्रात विदर्भ,देवगिरी,पश्चिम महाराष्ट्र,कोकण व गोवा असे पाच प्रांत येतात आणि या पाचही प्रांतात प्रवास असतो आणि निवास पुण्यात असतो.
या कामाची दखल म्हणून छत्तीसगढ महाराष्ट्र मंडळाकडून उत्तम सामाजिक कार्यकर्ती, जननी चॅनल (छत्तीसगढ) कडून उत्कृष्ट छात्रावास प्रमुख म्हणून जननी पुरस्कार,तसेच स्वामी विवेकानंद सार्ध शतीच्या (छत्तीसगढ) निमित्ताने उत्तम सेवाव्रती कार्यकर्ता दंपत्ती म्हणून त्याचप्रमाणे पुण्यात २ वर्षांपूर्वी महाराष्ट्र भूषण असे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नुकताच १२ जानेवारी २०२५ ला पुणे येथे झालेल्या जनमंगलच्या द्वितीय साहित्य संमेलनात जनमंगल सामाजिकता पुरस्कार मिळाला.
अनेकांचे संसार, अनेकांची जीवने उभी करण्यासाठी ज्यांची योजना झाली होती त्या बाबा आणि वैशाली यांनी आपला संसार अलगद उचलला आणि थेट वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यात समर्पित केला. भारतरत्न श्री. नानाजी देशमुख यांनी गृहस्थी प्रचारक ही भन्नाट संकल्पना संघविश्वात उभी केली. बाबा आणि वैशाली यांनी आपल्या छोटया पार्थ सह आपला संसार वनवासी कल्याणच्या खडतर, कंटकाकीर्ण मार्गावर नेऊन ठेवला. समाजासाठी अद्भुत आणि अकल्पनिय वाटावे असा हा घटनाक्रम होता.
अरुणाचल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड या प्रदेशात भारतविरोधी कारवाया अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तिथल्या बांधवांना भारतभक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वनवासी कल्याणचे असंख्य उपक्रम सुरू आहेत. या सातही प्रदेशातील विद्यार्थीनीं साठी रायपूर मध्ये शबरी कन्या आश्रम (वसतीगृह) हा भव्य प्रकल्प सुरू आहे. या कन्या आश्रमाची जवाबदारी वैशाली कडे तर बाबा कडे छत्तीसगड प्रांताची जवाबदारी आली. दोघेही कल्याण आश्रमाच्या कामात रममाण होऊन गेले. पार्थचे जीवन सुद्धा याच भूमीवर आकार घेत होते. बाबा सतत छत्तीसगड प्रांताच्या प्रवासावर तर वैशाली कन्या आश्रमाच्या पूर्वांचलातील मुलींच्या संगोपनाकडे असे वर्षानुवर्षे सुरू होते.
पूर्वांचलातील मुलींची भाषा, खानपान सगळे भिन्न असूनही त्यांना आपलेसे करून प्रेम उत्पन्न करणे हे सोपे काम नव्हते. पण बाबा आणि सौ. वैशाली यांनी पूर्वांचलातील मुलींच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांचा संसार हा असा विस्तारीत होत गेला, भव्य झाला. यासाठी अनेकवेळा त्यांनी पूर्वांचलात प्रवास केला. दरवर्षी यातील काही मूली दिवाळी मध्ये देशाच्या विविध भागात स्वयंसेवक परिवारात निवासाला घेऊन येत.
अभ्यास आणि उत्तम वक्तृत्व यांची जोड असलेल्या वैशालीजीं मध्ये सुध्दा नेतृत्व क्षमता आहे.
समर्पण भाव, स्वभावातील सहजता, शांत आणि स्नेहपूर्ण व्यवहार, संघविचारांवर प्रचंड श्रद्धा, बाबा सारख्या कर्मयोगी पतीस प्रचंड साथ, नातेवाईकांशी जपलेला जिव्हाळा अशा कितीतरी गुणवैशिष्ट्यांचे दर्शन वैशालीजीं मध्ये अनुभवायला येतं.
केवळ मी-माझं या विश्वात रममाण असणाऱ्या सर्वांसमोर वैशाली आणि बाबा या साक्षात प्रेरणामूर्तीच आहेत. या दोघांनी सहजपणे असंख्य जीवने घडविली आहेत, अनेक परिवारांचे ते आधार केंद्र आहेत. आपण समाजासाठी करत असलेलं प्रत्येक काम ही भारतमातेची सेवा आहे.
आपल्या आईच्या सेवेचा कुठे गवगवा करायचा नसतो ही संघाची भावना, धारणा आणि कार्यसंस्कृती. पण अनेक वेळा....संघ काय करतो? संघाचे काय योगदान? या सारखी प्रश्ने उभी होतात तेव्हा संघगंगेतील हे अनंत माणिके समाजासमोर यावी असं प्रकर्षाने वाटतं.
आज अखिल भारतीय ब्राहमण महासंघ, अकोला जिल्हा द्वारा या कर्मयोगी, सेवाव्रती दांम्पत्यास जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी अकोल्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ स्वातंत्र्यवीरांच्या या ओळींना आपल्या जीवनात कृतीनं उतरविणा-या बाबा आणि सौ. वैशाली यांना हा पूरस्कार प्रदान होत असल्याने या पूरस्काराचीच उंची अधिक समृध्द झाली आहे आणि आधूनिक दधिची असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रति ख्-या अर्थानं कृतज्ञ भाव आयोजकांनी प्रगट केला आहे, याकरीता समितीचे अभिनंदन.
बाबा सर आणि सौ. वैशालीजी आपल्या कार्यकर्तृत्वाला सादर प्रणाम.
000000
अभिनंदन! अभिनंदन!
उत्तर द्याहटवा