मुख्य सामग्रीवर वगळा

31 मे 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विशेष लेख

     महाराष्ट्राची लोकमाता
 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी                     होळकर
           लेखक
           प्रविण टाके,
     उपसंचालक (माहिती)
    विभागीय माहिती कार्यालय,
            कोल्हापूर.
      संवाद : 9702858777
                
     हाराष्ट्राच्या इतिहासाला अनेक थोर संत, समाजसुधारक आणि आदर्श राज्यकर्त्यांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. त्या तेजस्वी परंपरेतील एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लोककल्याण, न्यायप्रियता, धर्मपरायणता आणि सक्षम प्रशासन यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. म्हणूनच इतिहासाने त्यांना ‘लोकमाता’ आणि ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी बहाल केली.
•क्लिक करा, सविस्तर वाचा...
 ‌‌    अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नव्हती; परंतु माणकोजी शिंदे यांनी अहिल्यादेवींना धार्मिक, नैतिक आणि व्यवहारज्ञानाचे शिक्षण दिले. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये करुणा, परोपकार आणि नेतृत्वगुण दिसून येत होते. असे सांगितले जाते की, मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी एका मंदिरात लहान अहिल्यादेवींना भक्तिभावाने पूजा करताना पाहिले आणि त्यांच्या गुणांनी प्रभावित होऊन आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह घडवून आणला. विवाहानंतर त्या माळवा प्रांतातील होळकर घराण्यात आल्या. त्यांचे वैवाहिक जीवन इंदूर आणि महेश्वर परिसरात गेले.
    ‌‌   अहिल्यादेवींच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. पती खंडेराव यांचे युद्धात निधन झाले. त्यानंतर सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले. पुढे पुत्र मालेराव यांचाही मृत्यू झाला. या मोठ्या दुःखातून सावरत त्यांनी राज्यकारभाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्या काळात स्त्रीने राज्यसत्ता चालवणे हे अत्यंत कठीण मानले जात होते; परंतु अहिल्यादेवींनी आपली बुद्धिमत्ता, धैर्य आणि प्रशासनकौशल्याने संपूर्ण माळवा प्रदेश सक्षमपणे सांभाळला.
       सन १७६७ ते १७९५ या काळात त्यांनी राज्यकारभार केला. त्यांची राजधानी महेश्वर येथे होती. त्यांच्या प्रशासनात प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य होते. त्या दररोज जनतेच्या तक्रारी ऐकत आणि त्वरित न्याय देत. गरीब, शेतकरी, व्यापारी, स्त्रिया आणि दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले.त्यांच्या न्यायप्रियतेविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. न्यायदान करताना त्यांनी कधीही पक्षपात केला नाही. स्वतःच्या नातलगांविरुद्धही त्यांनी न्यायाच्या तत्त्वांनुसार निर्णय दिले. त्यामुळे प्रजेमध्ये त्यांच्या विषयी अपार आदर निर्माण झाला. “राज्यकर्त्याने प्रजेच्या सुखासाठी काम केले पाहिजे” हा त्यांचा मूलमंत्र होता.
      अहिल्यादेवींची ओळख केवळ एक सक्षम प्रशासक म्हणून नाही, तर लोककल्याणकारी आणि धर्मपरायण राज्यकर्ती म्हणूनही आहे. त्यांनी भारतभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि यात्रेकरुंसाठी निवासस्थाने बांधली. उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत त्यांच्या दानशूर कार्याचा ठसा दिसून येतो. लोकांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, यात्रेकरुंना पाणवठा असा सर्वंकष विचार करुन त्यांनी विहिरी, बारवा, तलाव, कुंड, पाणपोया देशाच्या विविध भागात बांधल्या. ज्या काळात प्रदेशाप्रदेशात विभागणी होती त्या काळात ‘बंधुता’ पेरण्याचे काम तत्कालीन भारतात त्यांनी केले. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मोठे योगदान दिले. तसेच सोमनाथ, गया, उज्जैन, नाशिक, द्वारका, रामेश्वरम, अयोध्या आणि हरिद्वार यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये घाट, मंदिरे आणि धर्मशाळा उभारल्या. वाराणसीतील अनेक घाट आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतात. राज्यात व्यापार आणि शेतीला चालना मिळाली. रस्ते, पाणीपुरवठा, बाजारपेठा आणि सुरक्षाव्यवस्था यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळे माळवा प्रदेश आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. त्यांच्या प्रशासनात भ्रष्टाचाराला थारा नव्हता.
       अहिल्यादेवींचा करारीपणा आणि धाडसी नेतृत्व अनेक प्रसंगांत दिसून आले. युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. शत्रूंना पराभूत करताना त्यांनी धैर्य आणि रणनीतीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. स्त्री नेतृत्वाविषयी असलेल्या समाजातील मर्यादित कल्पना त्यांनी आपल्या कार्यातून मोडून काढल्या.
       भारतीय इतिहासात त्यांच्या समकालीन अनेक प्रभावी महिला होऊन गेल्या.  परंतु लोककल्याणकारी राज्यव्यवस्था आणि धार्मिक-सामाजिक कार्य यांच्या समन्वयामुळे अहिल्यादेवींचे स्थान विशेष मानले जाते.
       अहिल्यादेवींना “पुण्यश्लोक” ही उपाधी देण्यात आली कारण त्यांनी आपल्या प्रजेला दुःखातून मुक्त करुन सुखी करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या राज्यकर्त्यालाच “पुण्यश्लोक” म्हटले जाते. त्यांच्या कार्यामुळेच त्या आजही लोकांच्या मनात “लोकमाता” म्हणून जिवंत आहेत.
         महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या कार्याचा गौरव विविध प्रकारे केला आहे. त्यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण “अहिल्यानगर” असे करण्यात आले. १३ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त चोंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या जतन संवर्धनासाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. केंद्र शासनाने त्यांच्या 300 व्या जयंतीला विशेष डाक तिकीट काढले. राज्य शासनाने पुण्यश्लोक 300 हा विशेष लोगो प्रकाशित केला आहे. 
        आज महाराष्ट्र शासन त्यांच्या आदर्श राज्यकारभाराच्या तत्त्वांनुसार सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. महिलांचे सक्षमीकरण, उद्योग, शिक्षण आणि स्वावलंबन यासाठी अनेक उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.

         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 
         महिला स्टार्टअप योजना
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” ही महाराष्ट्रातील महिलांना उद्योग आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि नवीन व्यवसाय उभारण्यासाठी मदत करणे हा आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना: स्टार्टअप व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व कौशल्यविकास, आर्थिक सहाय्य व कर्ज सुविधा, उद्योग उभारणीसाठी सल्ला, नवउद्योजकांना प्रोत्साहन अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे न्याय, सेवा, धर्मपरायणता आणि लोककल्याण यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांचा आदर्श राज्यकारभार आजही प्रशासनासाठी मार्गदर्शक मानला जातो. लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी त्यांची विचारसरणी आजच्या काळातही तितकीच महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे.
           00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...