मुख्य सामग्रीवर वगळा



प्रा.डाॕ.नरेशचन्द्र काठोळे 
शांतीदूत पुरस्काराचे मानकरी

                                    लेखक :
                            सुनील इंदुवामन ठाकरे 
                                २५ जून २०२५

याची सत्तरी गाठली की ज्येष्ठ नागरिक काय करतात हे वेगळं सांगायला नको. कुठलातरी ज्येष्ठ नागरिक संघ ते जॉईन करतात. एखादं भजन मंडळ किंवा अनेक क्लब यात स्वतःला गुंतवितात. नातवंडात रमतात किंवा गार्डनमध्ये समवयस्कर दोस्तांसोबत गप्पा मारतात. मात्र अमरावतीचे प्रा.डॉ नरेशचंद्र काठोळे हे एक अजबच रसायन आहे. वयाची सत्तरी ओलांडली तरीही तरुणाईच्या ऊर्जेने आजही काम करतात. तेही किशोरांपासून तर युवकांपर्यंत सर्वांसाठी. त्यांनी 12 मे 2000 या तारखेला एक क्रांतिकारी पाऊल उचललं. ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी. इथून सुरू झालं मिशन आयएएस. आज सन 2025 पर्यंत थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 16 हजार 177 कार्यशाळा त्यांनी घेतल्या. त्यांचे ते कार्य आजही अव्याहतपणे सुरूच आहे. अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयातून मराठीचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. मराठीच्या प्राध्यापकाचा आयएएस आणि आयपीएस या विषयांशी काय संबंध असेल? तर तोच खरा तर ऊर्जादायक आणि मनोरंजक प्रवास आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सातेगाव एक छोटंसं गाव. घरात शेतीवाडी काहीच नव्हती. वडील विठ्ठलराव हे शेतमजूर आणि घरगडी होते. आई गंगाबाई शेतावर मिळेल त्या काम करायच्या. या दांपत्यांच्या पोटी एक जुलै 1953 रोजी डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांचा जन्म झाला. एकूण पाच भावंडात ते थोरले. सर्वात मोठे रमेश हे अमरावतीलाच गृह उद्योग चालवितात. नरेशचंद्र हे दुसरे तर ‌ तिसरे दीपक हे टॅक्सी चालवितात. चौथ्या प्राचार्य डॉ शोभा रोकडे ह्या अमरावती जिल्हयातील परतवाडा येथील कढी महाविद्यालयाच्या  प्राचार्य आहेत. सर्वात धाकट्या निर्मला घाटे ह्या अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यात. 

सातेगावला तेव्हा चौथीपर्यंतच शाळा होती. चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ.नरेशचंद्र पाचवीला अमरावतीच्या श्री गणेशदास राठी विद्यालयात दाखल झालेत. वडील विठ्ठलराव यांनी त्याच शाळेत शिपाई म्हणून नोकरी सुरू केली. तर आई गंगाबाई या तिथल्या जिनात कामाला जायच्या. नरेशचंद्र यांना लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. शिक्षणात हुशार होते. खूप शिकून खूप मोठा व्हावं असं त्यांचं स्वप्नही होतं. ते त्यांनी पूर्णही केलं. पण हा संघर्ष सोपा नव्हता. 

सातेगाव सारख्या लहान गावातून अमरावतीत स्थिर होणे फार कठीण बाब होती. स्वतःच्या शिक्षणासाठी नरेशचंद्र सकाळी ब्रेड व बिस्किट विकायचे. शाळा झाल्यानंतर भाजीपाला आणि फळ विकायचे. अमरावतीच्या कॉटन मार्केट परिसरातील लक्ष्मी नगरच्या झोपडपट्टीत ते राहायचे. या सर्व विपरीत परिस्थितींमध्ये त्यांनी शाळेतला पहिला नंबर कधी सोडला नाही. नेतृत्व गुण तर होताच. तो स्वबळावर त्यांनी विकसितही केला. शाळेत ते कॅप्टन होते. शाळेच्या जवळपास सर्वच ऍक्टिव्हिटीज मध्ये ते सक्रिय असायचे. भाषण कलेतही त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. असं करत 1970 साली श्री गणेशदास राठी विद्यालयातून ते उत्तम गुणांनी दहावीची परीक्षा पास झालेत. पुढे चालून त्यांनी अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात बी ए साठी प्रवेश घेतला. तिथे त्यांना भली मोठी लायब्ररी दिसली. एखाद्या मुंगीला गुळाचा मोठा ढेकूळ दिसावा तसा त्यांना आनंद झाला. मग अघाशासारखी मिळतील ती पुस्तके वाचायला त्यांनी सुरुवात केली. मासिक असो वर्तमानपत्र असो अगदी बारकाईने ते वाचायचे. 

हे सर्व सुरू असताना अचानक त्यांच्यावर आभाळ कोसळलं. एक ऑक्टोबर 1974 ला त्यांचे वडील विठ्ठलराव यांचे निधन झालं. त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाची काळजी वाटू लागली. त्यानंतर 7 ऑक्टोबर 1974 ला वडिलांच्या जागेवर अनुकंपा म्हणून त्यांना श्रीमती केशरबाई लाहोटी विद्यालयात शिपाई म्हणून नोकरी लागली. एवढेच त्यांना दिलासा मिळाला. नोकरी सांभाळून शिक्षण घेणं ही तारेवरची कसरतच होती. तरीही त्यांनी ती लीलया  पेलली. दरम्यान ते तत्कालीन विदर्भ महाविद्यालयात आणि आताच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत मराठी विषयात एम ए करीत होते. शिपायाची नोकरी म्हटलं सकाळी सातच्या पूर्वीच त्यांना  जावं लागायचं. नोकरीची वेळ सुटल्यावरही एक वाजेपर्यंत निघता यायचं नाही.  नोकरी झाल्यानंतर पायीच ते कॉलेजला जायचं. दुपारी 1.30 ते 5 पर्यंत क्लासेस करायचे. यात बराच वेळ जायचा. दिवसभर काम केल्यावर होणारे श्रम तर वेगळेच. त्यांच्याच मराठी विषयाच्या वीभाग प्रमुख प्रा. मनुताई नातू यांना त्यांची जिद्द आणि धडपड लक्षात आली. त्यांनी नरेशचंद्र यांना सायकल घेऊन दिली. पुढे चालून प्रा. वसंत आबाजी डहाके, मधुकर केचे  प्रभा गणोरकर यांसारख्या विख्यात साहित्यिकांचं शिक्षक म्हणूनच मार्गदर्शन लाभलं. त्यांचं कर्तुत्व कौशल्य आणि प्रतिभा पाहून त्यांना व्ही एम व्ही च्या मराठी वांड्मय मंडळाचं अध्यक्ष केलं. लहानपणापासूनच उपक्रमशील असल्याने त्यांनी दर महिन्याला कॉलेजमध्ये कार्यक्रम घेणं सुरू केलं. व्ही एम व्ही चे मुखपत्र असलेल्या विदर्भवाणीचे ते संपादक झालेत.  दरम्यान त्यांचं कविता आणि अन्य विषयांवर लेखन सुरूच होतं. 1975 ला जीवन ज्योती तर 1974 ला झेप या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे  प्रकाशन केले..

 पुढे चालून 1976 ला गणराज्य दिनाला कवी बबन सराडकर यांना घेऊन त्यांनी साहित्य संगम ही संस्था सुरू केली. पुढे डॉ. मोतीलाल राठी या संस्थेचे अध्यक्ष झालेत. प्राचार्य डॉ. भाऊ मांडवकर प्रा. सिंधू मांडवकर शरदचंद्र सिंह बाबा मोहोड  सुरेश भट  उध्दव ज.शेळके  यांच्याशी संपर्क वाढत गेला. 

आपल्या प्रयत्नात आणि दिशेत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. 1982 हे वर्ष  त्यांच्या जीवनाला दिशा देणारे ठरले. ज्या ठिकाणी ते बेल वाजवायचे, स्वच्छता करायचे त्याच कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झालेत. पुढे  1979 मध्ये उच्चविद्याविभूषित विद्या घाटे यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्या अमरावतीच्या तपोवनात महामना मालवीय विद्यालयात नोकरीला होत्या. ही नोकरी देखील खूप महत्त्वाची ठरली. तपोवनतच त्यांना राहायला घर मिळालं.श्री संत अच्युत महाराजांचा शेजार लाभला. अमरावतीचं तपोवन म्हणजे खूप मोठे सेवा केंद्र आहे. तिथं कला शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रातील लोक नियमित भेटी देतात. त्यामुळे स्वाभाविक विविध क्षेत्रातील लोकांशी परिचय वाढत गेला. त्या काळात त्यांनी टेलिफोन देखील घेतला होता. म्हणजे श्री संत अच्युत महाराज यांच्यासाठी देखील फोन यांच्या घरी यायचा. दोघांनाही नोकरी असल्यामुळे बरेच आर्थिक स्थैर्य मिळालं. मग साहित्य क्षेत्रात झपाट्याने काम करायला सुरुवात केली. विविधांगी लेखन वाढवलं. पुस्तक प्रकाशनच्याही कामाला गती दिली. विठ्ठल वाघ मधुकर वाकोडे मिर्झा रफी अहमद बेग शंकर बडे श्रीकृष्ण राऊत किशोर सानप पुरुषोत्तम बोरकर यांच्यासह त्यांनी साहित्य क्षेत्र समृद्ध केलं. 

बहुजनांविषयी त्यांचा कळवळा वाखाणण्यासारखा आहे. त्यातूनच 19 72 ला त्यांनी बहुजन साहित्य परिषदेची स्थापना केली. त्यातही नारायण सुर्वे बा .ह. कल्याणकर  फ. मु.  शिंदे, विठ्ठल वाघ बबन नाखले जगन वंजारी  प्रभाकर पावडे जेमिनी कडू ही साहित्यातली दिग्गज मंडळी यांच्या साथीला उभी राहिली. केवळ संस्था स्थापन करून ते थांबले नाहीत. तर तिला सातत्याने गतिमान करीत राहिले. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत इथं त्यांनी पहिलं बहुजन साहित्य संमेलन घेतलं. ही परंपरा त्यांनी नंतर वरुड पांढरकवडा आणि अन्यत्रही सुरूच ठेवली.

साहित्यासोबतच त्यांचं सामाजिक भान आजही जिवंत आहे. याच प्रेरणेतून 1998 ला त्यांनी विदर्भ सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. इथून पुन्हा एका नव्या प्रबोधन पर्वाचा आरंभ करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. लेखक दिग्दर्शक डॉ. सतीश पावडे यांना घेऊन त्यांनी जुगनिर्माता हे नाटक 1998 ला रंगभूमीवर आणलं. ते डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मशताब्दी वर्ष होतं. या नाटकातून डॉ. पंजाबराव देशमुख यांचं क्रांतिकारी कार्य त्यांनी जगासमोर आणलं. विदर्भ सत्यशोधक मंडळाने पुन्हा दुसरं नाटक क्रांतयोगी गाडगेबाबा लोकांना दिलं.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे ही शिक्षकी पेशातले. त्यामुळे सर्व विद्यार्थी हे कलेक्टर कमिश्नर या उच्च पदावर जावेत असं त्यांना आजही मनापासून वाटतं. एकदा ते सांगली जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथं आयएएस झालेल्या  अभिनय कुंभार यांची भेट झाली. त्यांच्यासोबत डॉ. नरेशचंद्र यांनी सखोल चर्चा केली. तिथून त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या.   आय ए एस आयपीएस अशा परीक्षांना विद्यार्थी उगाच घाबरतात हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला. सर्व विद्यार्थ्यांना आयएएस किंवा आयपीएस होण्याची संधी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आय ए एस परीक्षा मराठीतून देता येते. पदवीला म्हणजेच ग्रॅज्युएशनला 35% मार्क पुरे असतात. पहिल्या म्हणजे पूर्व परीक्षेला 25% गुणही पुरेसे असतात. ही परीक्षा सहावी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणावरच आधारित असते. त्यातही प्रश्न विस्ताराने लिहिण्याची गरज नाही. वैकल्पिक म्हणजेच चार ऑप्शन्स मधून एक उत्तर निवडावं लागतं. विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर ते साध्य करू शकतात. आता ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. म्हणून 12 मे 2000 रोजी त्यांनी अमरावतीला डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी सुरू केली. 

त्या काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका असे प्रकार प्रचलित नव्हते. हा पहिलाच धाडसी प्रयोग होता. त्यामुळे त्यांना हे सुरू करण्यासाठी अमरावती शहरात हॉलदेखील भाड्याने मिळाला नाही. पण एकदा पुढे निघालं तर मागे वळून पाहायचं नाही. ह्या दृढनिश्चयानं त्यांनी विद्यापीठ रोडवरील महापौर बंगल्यासमोरील जिजाऊ नगरात स्वतःच्याच घरी हा उपक्रम सुरू केला. स्पर्धा परीक्षेसाठी वाहिलेली ही अमरावती शहरातील पहिली अभ्यासिका आणि ग्रंथालय ठरलं. जागेचा प्रश्न तूर्तास सुटला होता. आता आवश्यकता होती पुस्तकं फर्निचर आणि अन्य साधनांची. यावेळी सुरुवातीला श्री अण्णासाहेब हिवसे यांच्या मदतीला धावून आलेत. त्यांनी  पहिली मोठी देणगी दिली. नंतर वसुंधरा पाटील न्यायमूर्ती हिंगणे कमल किशोर फुटाणे यांनी प्राथमिक अवस्थेत दिलेल्या मदतीचा हात लाखमोलाचा ठरला. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एक दिवसीय कार्यशाळा घेणे सुरू केले. त्यासाठी कुठल्याही मानधनाची किंवा प्रवास खर्चाची अपेक्षा केली नाही. कार्यक्षेत्र ही त्यांनी अमर्यादितच ठेवलं. महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार जम्मू कश्मीर उत्तर प्रदेश तामिळनाडू गुजरात राजस्थान इथल्या अगदी सर्वात शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत हा विषय त्यांनी पोहोचविला. सेवानिवृत्त झाल्यावरही 16 हजारांच्या वर कार्यशाळा घेणे ही खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे.

विद्यार्थ्यांना ग्रंथरूपात हे मार्गदर्शन मिळावं म्हणून सन 2008 ला  मी आयएएस अधिकारी होणारच हे प्रचंड गाजलेलं पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यानंतर तीन वर्षांनी शेतकऱ्यांची मुलं झाली कलेक्टर हे पुस्तक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलं. सन 2011 ला आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांनो अधिकारी  हे पुस्तक त्यांनी लिहिलं. मुलींनी या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करावी हा त्यांचा आजही आग्रह आहे. म्हणूनच आयएएस टॉपर असलेल्या संपदा मेहता यांच्यावर त्यांनी विद्यार्थिनींनो आयएएस अधिकारी हे पुस्तक लिहिलं. यशस्वी लोकांचे प्रत्यक्ष अनुभव हे दिशादर्शक ठरतात. त्यामुळे कलेक्टर कमिशनर एसडीओ अशा अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना थेट मिळून देण्यात ते यशस्वी आहेत. थोडी थोडकी नव्हे तर आतापर्यंत तब्बल 373 अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला त्यांच्याकडे आलेत. वेगवेगळ्या कालखंडातील महाराष्ट्रातील तेरा मुख्य सचिव अकादमीला भेट देऊन गेलेत. तेही कोणत्या मानधन किंवा प्रवास खर्चाच्या अपेक्षेशिवाय.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सत्कारणी लागाव्यात म्हणून सन 2010 पासून ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर त्यांनी सुरू केलं. हा सात दिवसांचा समर कॅम्प गेल्या 16 वर्षांपासून दरवर्षी अखंड सुरू आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मा. लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई यांच्यासह अनेक मान्यवर अकादमीला भेट देतात. आज डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचे वय 73 वर्षे आहे. एक जुलैला ते वयाच्या 74 व्या वर्षात प्रवेश करततील . अगदी पहाटे पाच वाजल्यापासूनच त्यांच्या कामाला सुरुवात होते. त्यांच्या 98 90 96 70 0 3 या मोबाईल नंबरवर दिवसभर विद्यार्थी आणि पालक मिशन आयएएसची माहिती घेतच असतात. फेसबुक वर ही ते Nareshchandra kathole या अकाउंट वर सक्रिय असतात. त्यांच्या Nareshchandra kathole या युट्युब चॅनेल वरूनही ते आणि अन्य तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आपलं सेवानिवृत्त आयुष्य त्यांनी मिशन आयएएस या चळवळीला झोकून दिलं. कितीतरी विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतून घडलेत. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य अविरत करण्याची त्यांची जिद्द कायम आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनंत सदीच्छा. 
                          00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...