• अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधाना
• तीन महिन्यांचे मोफत धान्य वाटप सुरु
अकोला :
पावसाळ्याचे दिवस आणि पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेता, उपाययोजनेचा भाग म्हणून अलिकडेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारकांना शासनाने मंजूर केलेले तीन महिन्यांचे मोफत धान्य वाटप सुरु केल्याची माहिती जुने शहरातील जयहिंद चौकातील सरकारी रास्त भाव धान्य दुकानाचे प्रो.प्रा.एन.आर. गांधी यांनी बोलतांना दिली.
आज शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे धान्याचे वितरण अगदी शांततेत सुरु असल्याचे चित्र होते. शासनाच्या या निर्णयाचे लाभार्थ्यांनी स्वागत केल्याची माहिती मिळत आहेत.
जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारक ३ लाख ३० हजार १८० गरीब कुटुंबांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांतील मोफत धान्याचे वाटप ३ जूनपासून जिल्ह्यातील १ हजार ६० रेशन दुकानांमधून सुरू करण्यात आले आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांना दरमहा रेशन दुकानांमधून मोफत धान्याचे वितरण करण्यात येते. पावसाळ्यात पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेता, गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना मोफत धान्य वितरणात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रेशनकार्डधारकांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यातील मोफत धान्याचे वितरण जूनमध्ये एकाच महिन्यात करण्याचे निर्देश शासनामार्फत ११ मे रोजीच्या आदेशानुसार देण्यात आले होते.
त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारक ३ लाख ३० हजार १८० लाभार्थी कुटुबाना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यातील मोफत धान्याचे वाटप जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून ३ जूनपासून सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.
लाख क्विंटल धान्यसाठ्याची होणार उचल!
जिल्ह्यातील रेशनकार्डधारक ३ लाख ३० हजार १८० लाभार्थी कुटुबाना जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील मोफत धान्य वाटपासाठी शामनामार्फत मंजूर आवंटनानुसार जिल्ह्यात २ लाख १६ हजार क्विंटल गहू व तांदूळ इत्यादीची उचल होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाय्रांनी दिली.
एकत्रित उचल करण्याचे शिधापत्रिकाधारकांना आवाहन
ऑगस्टपर्यंतचे शिधावाटप जूनमध्येच पूर्ण करणार. आगामी पावसाळा व प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तिन्ही पावसाळी महिन्यांच्या अन्नधान्याची शिधापत्रिकाधारकांनी एकत्रित उचल करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले आहे.
पावसाळ्यामुळे ही खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये तिन्ही महिन्यांचा शिधा पाठविण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांनी द ३० जूनपूर्वी रास्त भाव दुकानांतील ई-पॉस मशिनवर बोटाचा ठसा देऊन एकाचवेळी तिन्ही महिन्यांचा शिधा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिकूल हवामान, पाऊस यामुळे नागरिकांना अडचणी येऊ नयेत व कुणी वंचित राहू नये म्हणून आगाऊ शिधावाटप करण्यात येत असल्याची माहिती श्री. रविंद्र यन्नावार यांनी दिली.
पावसाळ्याचे दिवस आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता, शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यांतील रेशन कार्डधारक पात्र लाभार्थ्यांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांतील मोफत धान्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सुरू करण्यात आले आहे.
- राजेश येन्नावार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा