मुख्य सामग्रीवर वगळा

 


'श्री राजराजेश्‍वर भगवान':
 अकोल्‍याच्‍या श्रध्‍देचा दिपस्‍तंभ. . .

                        लेखक
              © निशिकांत देशपांडे,
                 अकोला. संवाद : 9850342404

      "नमः शिवाय शान्ताय सर्वपापप्रणाशिने।
    भक्तानां हृत्स्थितायै च श्रीराजेश्वराय ते नमः॥"



    कोल्याच्या पवित्र भूमीवर, अत्‍यंत तेजस्वी, दिव्य आणि प्राचीन परंपरेच्‍या रूपात उभे आहे श्री राजराजेश्वर मंदिर. अकोल्याचे ग्रामदैवत, अकोलेकरांच्‍या श्रद्धेचा केंद्रबिंदू, आणि इतिहासाच्या उत्कट क्षणांचा साक्षीदार असे हे देवालय. श्री राजराजेश्वर मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असून मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. राजा अकोलसिंहाच्‍या जीवनात घडलेली कथा आणि शिवलिंगाची जागृती ही  कथा माहिती नाही असा अकोल्‍यात तरी कोण असेल?   

     श्री राजेश्वर हे महादेवाचे अतीव शांत, पण जागृत रूप आहे. हे मंदिर केवळ एक स्थापत्य नाही, ती जिवंत श्रद्धेची दिव्य मूर्ती आहे. हजारो भक्तांच्या ओठांवर रोज उच्चारली जाणारी "हर हर महादेव!" ही केवळ एक घोषणा नसून आत्मा आणि दैवताच्या एकरूपतेची अनुभूती आहे.

          "मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय
            नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
           मंदारपुष्पबहुपुष्प सुपूजिताय
           श्रीराजराजेश्वर नमः शिवाय॥"

     शिव म्हणजे पंचमहाभूतांचे अधिपती, ज्यांनी सृष्टी, स्थिती आणि लय या त्रयींचे  अधिपत्य गाजवले. अकोल्यातील हे श्री राजराजेश्वर रूप, म्हणजे या त्रिगुणात्मक शिवशक्तीचे साक्षात प्रतीक आहे. या तेज:पुंज प्रतिकासमोर उभा राहिलेला प्रत्येक भक्त, स्वतःला विसरून एक अलौकिक शांती अनुभवतो. हे मंदिर म्हणजे धर्म, भक्ती, आत्मबोध आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम आहे. येथे नित्‍य पूजा-अर्चा आणि धार्मिक अनुष्‍ठाने तर होतातच पण या मंदिरात अनुभवयाला येते ती विलक्षण शांती. श्रावण महिन्‍यातील श्री राजेश्‍वराचे विलोभनीय आणि गोजीरे रूप बघून मन धन्‍य होतं. श्रावणातील अखेरच्‍या सोमवारी पूर्णेच्‍या जलाचा अभिषेक करणारी कावडयात्रा ही अकोल्‍याचा सांस्‍कृतिक वारसा, वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे. 

     "धर्मो रक्षति रक्षितः" या उक्‍तीचं प्रगटीकरण म्‍हणजे श्री राजराजेश्‍वर मंदिर.  देवाधिदेव श्री राजेश्‍वराच्‍या साक्षीने याच प्रांगणात लोकमान्य टिळक यांनी संत श्री गजानन महाराजांच्या साक्षीने "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ही ब्रिटीश सत्‍तेला ललकारी दिली. ही केवळ घोषणा नव्हती, ती होती एक युगांतकारी गर्जना, ज्याने संपूर्ण भारताच्या स्‍वातंत्र्याचा जागर करण्‍यात मोठी भूमिका केली. 

     इतिहास सांगतो, क्रांतीवीर राजगुरू यांनीही अकोल्यात अनेक दिवस वास्तव्य केले आणि हे मंदिर त्यांच्या क्रांतीचा मौन साक्षीदार ठरले. श्री राजराजेश्‍वर बाबांनी राजगुरू सारख्‍या वीरपुरूषाला अनेक दिवस आपल्‍या कवेत घेतलं, त्‍याचं रक्षण केलं. मंदिराच्या जीर्णोद्धार कामांदरम्यान मंदिराच्या परिसरात एक भुयारसदृश रचना देखील नूकतीच सापडली आहे, तज्‍ज्ञांचे मते ही सुमारे 200 वर्षांपूर्वीची आहे.  

     पिढयानुपिढया अकोलेकरांच्या हृदयात श्री राजराजेश्वर विराजमान आहेत. जीवनाच्या सुख-दुःखात, आरंभात आणि अंतात, संकटात आणि समृद्धीत श्री राजेश्वराचं स्मरण हाच आधार बनतं. सकाळची आरती असो की सायंकाळची, प्रत्‍येक वेळा तीचा नाद दिव्‍य, भव्‍य आणि उर्जादायी. ‘ हsर  हsर महादेव ‘ च्‍या गगनभेदी जयकारात काही क्षण उभं राहणं हा केवळ अनुभूतीचा विषय आहे. हजारो अकोलेकर तो नित्‍य घेत आले आहेत. श्री राजेश्‍वर मंदिर हे अकोलावासियांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. अनेकांच्‍या दिवसाचा प्रारंभ तर अनेकांच्‍या दिवसाची अखेर श्रीराजेश्‍वरासमोर नतमस्‍तक होवूनच होते. 

      या मंदिराची विश्‍वस्‍त म्‍हणुन सेवा करणा-यांमध्‍ये जुन्‍या पिढीतील अनेक लोक आहेत. स्‍व. श्री दादा देशपांडे यांच्‍या कार्यकाळात मंदिराचा झालेला कायापालट एैतिहासिक आहे, दादांचे वडील अॅड. स्‍व. बापूसाहेब यांनी मंदिराच्‍या संचालनात केलेली सेवा संस्‍मरणीय आहे तर सध्‍या दादांचे चिरंजीव अॅड. श्री राजेश्‍वर उपाख्‍य गिरीषजी विश्‍वस्‍त म्‍हणुन सेवेचा हा वारसा स‍मर्पित भावनेने चालवित आहेत. देशपांडे कुटुंबाच्‍या तिन पिढयांनी केलेली सेवा निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील अनेक वर्षांपासून श्री गजानन घोंगे, अॅड. श्री. रामेश्वर ठाकरे, श्री अण्‍णाजी अभ्‍यंकर, श्री नरेशजी लोहिया, ऍड. राम भौरदकर ही कार्यतत्‍पर विश्‍वस्‍तांची चमू मंदिराचा अधिकाधिक कायापालट करण्‍याचे कार्य करीत आहेत. या सर्वांच्या परिश्रमांना आज जणू पावतीच मिळाली आहे, म्हणून सर्वांचे अभिनंदन.

     महाराष्ट्र शासनाने श्री राजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. या निर्णयामुळे केवळ मंदिराचं सौंदर्यच वाढणार नाही, तर त्याचं धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मूल्यही अधिक उंचावेल. या मंदिराचा कायापालट म्हणजे अकोल्याच्या आत्म्याला मिळालेला नवसंस्कार आहे. हा कायापालट म्हणजे श्रद्धेच्या दीपात भरलेलं नवं तैल आहे. हे मंदिर आता नव्या पिढ्यांसाठी केवळ एक दर्शनस्थळ नसून संस्कार केंद्र होणार आहे. 

    श्री राजेश्वर मंदिर हे केवळ अकोल्याचे नव्हे तर ते अकोल्याच्या आत्म्याचे, परमश्रध्‍देचे, अभिमानाचे आणि उज्ज्वल भविष्याचे प्रेरणास्‍थान आहे आणि म्‍हणुनच महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले पाहीजे. या विषयाचा पाठपूरावा करणारे आमदार श्री रणधीर सावरकर  तसेच आमदार श्री वसंत खंडेलवाल आणि सर्व संबंधित अधिकारी, नेतृत्‍व यांचे अभिनंदन केलेच पाहीजे.
 
    अकोल्‍याचे  सांस्‍कृतिक, धार्मिक, एैतिहासिक वैभव या कार्यामुळे अधिकच दैदीप्‍यमान होणार हे नक्‍की. 

          "नमः शिवाय च राजेश्वराय,
            भक्ताभीष्ट फलप्रदाय।
            पुण्यं कुरु मम जीवनं,
           भवसागरात् उद्धर माम्॥"
   हर हर महादेव! श्री राजराजेश्वराय नमः!

          © निशिकांत देशपांडे, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...