मुख्य सामग्रीवर वगळा



            •  चुलीला आवतन..

                                                              
                              : लेखिका :
                   राधिका (माजगावकर) पंडित.
                      संवाद : 8451027554.

      चुलीला आवतन.... नवल वाटलं ना वेगळं नांव वाचून ? अहो! सगळ्या घरादाराला म्हणजे बाळगोपाळांपासून वृद्धांपर्यंत अगदी सगळ्या फॅमिली मेंबरना लग्नाच्या जेवणाचं आमंत्रण आहे बरं का हे! ह्या आमंत्रणात बडेजाव नाही. मानपान नाही तर या दोन शब्दातच अगत्य आणि आग्रह सामावलेला असायचा. 
      भुसावळच्या रेल्वे नॉर्थ कॉलनीत आम्ही रहात होतो, त्या एरियाला 40 बंगला म्हणायचे. साध्यासरळ खानदेशी भाषेतली लोकं माझ्या मुलांना विचारायची 'आरं तु चाळीस बंगल्यातला कां रं ?' मुलांच्या डोळ्यात भल्या मोठ्या तब्बल 40 बंगल्यात रहात असल्याचं स्वप्न तरळायचं आणि तो बालचमू खुशीने होकारार्थी मान डोलवायचा. चार हजारच्या वर वस्ती झाली तरी तो '40 बंगला' नांव घेऊनच अबाधित राह्यला.
     कायम लक्षात राह्यलं ते कॉलनीच्या बाहेरच 'कंडारी गाव' आणि गावातलं ढोल ताशातलं ते लग्न. वराती पुढे बेफाम नाचून, मुहूर्त टाळून नवरदेवाचे ते खट्याळ मित्र मंडळ, भटजींना ताटकळत ठेवून, नवरीला "पाहू रे किती मी वाट" म्हणून वाट पाहायला लाऊन, भर उन्हात घामानं निथळत नाचून नाचून न्हाहून निघायचं. 
      अक्षतांचा मारा झाला, शुभमंगल सावधान झालं की, गर्रकन वळून मंडळी जेवणाच्या हॉल कडे जीव घेऊन पळत सुटायची, पडत धडपडत पट्टीवर आपलं बुड आदळायची. पट्टी म्हणजे लांबलचक सतरंजीचा पट्टा हो! 
     लग्न झाल्यावर पुणेरी भाषेतल्या मला, या खानदेशी 'पट्टी' शब्दानी चांगलाच हिसका दाखवला होता. ती मजेशीर कथा नंतर सांगणारच आहे. तहान भुकेनी कासावीस झालेले, उशीर झाल्याने भुकेचा डोंब उसळलेलं वऱ्हाड, अगदी बाया पण पानावर बसल्या की, पुरुष मंडळी गरमागरम मसालेदार तर्रीssदार वांग्याच्या भाजीच्या, वरणाच्या बादल्या घेऊन पुढे पुढे सरकायची. पाठोपाठ  वाफाळलेल्या बट्टीची तापलेली परात घेऊन आलेला एखादा पैलवानगडी ओरडायचा, "अप्पा अवो बट्ट्या चुरा की, मागनं वरण आणि गावरानी तूप येतंय." लगेच बचकभर रंगीबेरंगी मोकळी बुंदी पण पानात पडायची.  वाढणाऱ्याचा वेग विजेला लाजवील असाच असायचा. गरम गरम जेवणाच्या वाफेनी आधीच घामाघुम झालेला जेवणारा, पोटातल्या कावळ्यांना शांत करण्याकरता बट्टी दोन्ही हाताने कुस्करायचा. 
      मी पुणेकरीण असूनही नंतर ह्या अगत्याच्या सहभोजनात तरबेज झाले होते. पण एखादी मुंबईकरीण ह्या वातावरणानी, उकाड्याने, आणि ह्या बट्टी चुरणे प्रकरणांनी कमालीची गोंधळून जायची. आता ही बट्टी कांद्यासारखी फोडायची की तुकडे मोड करायची या प्रश्नाने भांबावलेला तिचा चेहरा आणखीनच बावळट व्हायचा. त्यातून वरणवाला पहाडी आवाजात ओरडायचा, "ओबाई बट्टी चुराकी, वरण कुठे वाढू? अहो ताई तुकडे नका मोडू तुकड्यावर वरण वाढल्यावर पत्रावळीवर तापी नदीच उतरल की वो".
      त्याच्या ओरडण्यांनी आणखीनच  भेदरलेल्या तिच्या डोळ्यात पाणी तरराळायचं. आणि मग ते बघून एखादी पोक्त मावशी डोक्यावरचा पदर सावरत पुढे व्हायची. हो, इतक्या जीवघेण्या उकाड्यातही म्हातारीचा डोक्यावरचा पदर ढळायचा नाही  बरं का! वरण वाल्या समोर कमरेवर हात ठेवून हात नाचवत ती मावशी म्हणायची, "इतकी घाई कशापायी रं? वरणाची बादली पेलवना कां तुला? हाता पायापेक्षा तोंडात बराच जोर आलाय तुज्या? वरडतोस कशापायी, मुंबईकरीण नवीन  हाये, प्रेमाने सांग की, प्रेमाने वाढ, आण ती बादली हीकडं." आता मावशीच्या पुर्षी आवाजातल्या दरडावणीला घाबरून पोरगं वरणाची बादली तिथंच ठेउन पळ काढायचं. 
      मावशीबाय पोरीच्या पानापुढं फतकल् मारून तांडा मांडा घालून बट्टी बारीक कुस्करायची. एक तुकडा पोरीच्या हातात ठेवून म्हणायची, "आता ह्यो तुकडा तू चुरुन बग, पुढच्या वक्ताला तरबेज झाली पाह्यजेस." 
      आता कुठे त्या पोरीच्या डोक्यात प्रकाश पडला, बट्टी चुरायची म्हणजे बारीक करायची असते. पुढे झालेल्या तिला म्हातारी म्हणाली, "सवय कर आमच्या गावच्या जेवणाची. कुनी  सांगावं, हिंतच तुझा 'शेर' आसल. एखादं पोरगं तुला 'हेरल' आणि मुंबईवरून इकडे खानदेशात पळवून आणल." आणि काय सांगू, पोरगी चक्क लाजली की हो! ते पाहून तरुण पोरं चेकाळली. 
      बट्टीच्या चुऱ्याचं 'आळं' करून त्या द्रोणात वरणाचं 'ओघळार' ओतून प्रेमाने  त्यावर तुपाची धार मावशी बायनी सोडली, आणि मग पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या मुंबईकरणीने दाल बट्टी वर आडवा हात मारला. 
      आता पुढची गंमत तर ऐका, योगायोगाने बोला फुलाला गांठ पडून मावशीबायच्या नातवाने तिला हेरली आणि वडीलधारी व मुलगा मुलगी पसंती होऊन त्याच मांडवात साखरपुडा ही झाला. मुंबईची गाडी खानदेशकडे वळली. अशा प्रकारे मुंबईची कोळीण, खानदेशाची 'लेवा पाटलीण' झाली. पुढे धोरणी मावशीबायने नातवाला, सुनेला पिठाची गिरणी काढून दिली. आता मुंबईकरीण बट्टी चुरण्यात काय, खाण्यात काय, दाल बट्टीचे रवाळ पीठ दळून देण्यात इतकी तरबेज झाली की आख्खं 'कंडारी' गांव तिला दालबट्टीवाली मुंबईकरीण म्हणून ओळखू लागलंय. अशा प्रकारे योगायोगाने दाल बट्टी कथा कुठून कुठे पोहोचली. पुढे कामगार गडी ठेवून तिने दोन गिरण्याही काढल्या.
    तुम्हीच आता खानदेश दौरा काढा  आणि ह्या चविष्ट, सणकून भूक लागल्यावर दणकून खायच्या अशा 'दालबट्ट्या' खायला खानदेशात नक्की जा. तिथे तुमचं अतिशय अगत्याचं, प्रेमाचं, आग्रहाचं भरपेट जेवण नक्कीच होईल. त्या खानदेशी आग्रहाला धन्यवाद देऊनच तुम्ही बाहेर पडाल. हे अनुभवाचे बोल आहेत. ह्या खानदेशी खासियत ला दाद दिल्याबद्दल तुमचें ही आभार मंडळी.

               ©® राधिका (माजगावकर) पंडित
                 सिंहगड रोड, पुणे, 8451027554.

(आवडल्यास सामायिक करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. 


                          
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...