लोकनेते स्व.पुरुषोतम
उपाख्य भाऊसाहेब येते
लेखक :
• प्रा. शरद पुसदकर,
अमरावती. संवाद : 9423608651
कोणी आपल्या व्यक्तीमत्वाने कोणी आपल्या पेहरावाने, कोणी आपल्या वक्तृत्वाने लोकांचे लक्ष वेधून घेते. मात्र भाऊसाहेब येते आपल्या साध्या राहणीमानाने व नम्रतेने लोकांना जिंकून घेत. त्यांच्या साध्या राहणी सारखे त्यांचे विचारही निर्मळ होते. ते काँग्रेस पक्षाशी आजीवन एकनिष्ठ राहीले. ते अत्यंत निस्वार्थी असे दुर्मीळ राजकारणी होते. त्यांनी काँग्रेस सेवादलाचे अमरावती जिल्हा महाधिनायक म्हणून केलेल्या कार्याचा माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा हयांनी गौरव केला होता.
ते आयुष्यभर निर्मोही व व्यवहारातील भ्रष्टाचारापासून पूर्णतः अलीप्त राहीले. ते राजकारणात राहूनही त्यागी वृत्तीचे होते. असे म्हणतात की कांग्रेस पक्षाची आमदारकीची तिकीट त्यांना मिळत असूनही दिलेल्या शब्दाखातीर आपल्या मित्रास दिली व अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी प्रचारकार्यही केले.
त्यांना लोकसेवेच्या व्रताने झपाटले होते. सकाळी ८ पासून रात्री ११ पर्यंत ते जनतेच्या सेवेसाठी वाहून घेत.
बडनेरातील गोरगरीब हिंदू-मुस्लीम बांधवांकडे जाऊन त्यांचे दू:ख हलके करीत व समस्या सोडविण्यासाठी सर्व प्रयास करीत. कामगार वर्गासोबत येते साहेबांचे आपुलकीचे नाते जुळले होते. बडनेरा येथील विजय मील बंद झाल्यानंतर कामगारांचे हाल त्यांनी पाहिले. बंद मील सुरू करण्यासाठी विविध आंदोलने केलीत. तसेच साखळी उपोषणे केलीत. अखेरचा उपाय म्हणून मुंबईस आमरण उपोषण सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मील सुरू केली. त्यामुळे शेकडोंना आपला रोजगार परत मिळाला.
बडनेरा नगर परिषदेचे ते 2 वेळा अध्यक्ष राहीलेत. त्या कार्यकाळात त्यांनी बडनेरा शहराचा विकास केला. दुसऱ्या टर्म मधेच बडनेरा नगर परिषदेच्या अमरावती महानगरपालीकेमधे विलीनीकरण झाले, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असतांना विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात. सहकार क्षेत्रामधे त्यांनी सुतार- लोहार सह सेवा सोसायटी, ग्राहक भांडार, संतोषीमाता सह. पॉवरलूम, सहयोग शै. संस्था यांची स्थापना केली. कष्टकरी वर्गाच ते जातपातविरहीत सामान्य व सर्व धर्मातील कष्टकरी वर्गाचे मसीहा म्हणजे लोकनेते होते. स्वतः उच्चशिक्षीत इंजिनियर असूनही उच्चअधिकारी यांचेशी व अशिक्षीत गरीब व्यक्तींशीही तेवढ्याच सहजपणे मिसळत असत.
समाजकार्य करीत असतांना त्यांनी आपल्या घरादाराची पर्वा केली नाहीं. बडनेरा येथील मील सुरु करून घेण्याचे आंदोलन उभे करण्यासाठी त्यांनी पत्नीच्या नावावरील शेतजमीन विकून पैसे उभे केले. नागरिकांचे गा-हाणे ऐकून ते सोडविष्याच्या व्यग्रतेन त्यांचे स्वतध्य कुटुंबाकडे काहीसे दुर्लक्षही झाले प्रसिध्दीपराङ्मुख व मितभाषी स्वभावामुळे त्यांनी स्वतःचा मोठेपणा कधी पक्षासमोर किंवा लोकांसमोर येऊ दिला नाही.
साधी राहणी, उच्च विचारसरणी
भाऊसाहेबांवर महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. त्यांना पित्याकडून देशप्रेमाचा समृद्ध वारसा लाभला होता. त्यांचे वडील स्व. विष्णुपंत येते हे स्वताही इंजिनियर व आर्थिक संपन्न होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. एवढेच नव्हे तर कारावासही भोगला होता. ह्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय घरामधे मोठमोठया नेत्यांच्या नेहमी भेटी होत.
अगदी भाऊसाहेबांच्या काळातही अनेक मुख्यमंत्री मंत्री घरी येत. माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी यांच्याशी असलेल्या सलोख्यामुळे त्यांनी इंदिराजींशी प्रत्यक्ष भेटून अनेकांची राजकीय कामे करून आणली होती
बडनेरा न. प. चे ते ५ वेळा नगर सेवक व अध्यक्षपदही भूषविले. त्यांच्या कार्यकाळात बडनेरात त्यांनी अनेक विकासकामे केली. अमरावती महानगरपालीकेत बडनेरा न. प.चे विलीनीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले.
स्व इंदिराजींना अटक झाल्यानंतर उफाळलेल्या जनक्षोभ व आंदोलनात भाऊसाहेबांची सक्रीय भूमिका होती. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच अन्य राजकारणी मंडळींवर भाऊसाहेबांचा नैतिक प्रभाव होता.
नाव, धर्म, व जातपात भेद रहीत समाजकारणामुळे ते गोरगरीब नागरिकांचे लोकनेते झाले होते. म्हणूनच आजही त्यांचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याची स्मृति म्हणून बडनेरा येथे होऊ घातलेल्या सांस्कृतिक भवनास राणा यांच्या पाठपुराव्यामुळे व पुरुषोत्तम उपाख्य भाऊसाहेब येते यांचे नांव देण्यात येत आहे.
लेखक :
• प्रा. शरद पुसदकर, अमरावती.
संवाद : 9423608651
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा