नाट्य प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप
70 विद्यार्थ्यांनी घेतले नाट्यकलेचे धडे
सिने व नाट्य क्षेत्रातील दिग्गजांनी दिले प्रशिक्षण
अकोला : स्थानिक आर. डी. जी. महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप करण्यात आला. या शिबिरात विविध शाळांमधील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नाट्य प्रशिक्षणाचे धडे घेतले. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आर. डी. जी. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात सिने दिग्दर्शक निलेश जळमकर, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड चे जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, सिने निर्माते शत्रुघ्न बिरकड, सीआयडी, क्राइम पेट्रोल व विविध वेब सिरीज मध्ये भूमिका करणाऱ्या किरण ठाकरे पावसकर, प्रख्यात नाट्य प्रशिक्षक सौरभ ठाकरे उपस्थित होते. प्रारंभी रंगभूमी देवता नटराज, भारतीय सेवा सदनाच्या संस्थापक अध्यक्षा राधा देवीजी गोयनका यांच्या प्रतिमांचे अतिथींच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सिद्धी गणेश प्रोडक्शन चे संचालक व या शिबिराचे आयोजक सचिन गिरी यांनी प्रास्ताविक करून दहा दिवस चाललेल्या या शिबिरातील घडामोडींची माहिती दिली. प्रमुख अतिथी निलेश जळमकर, प्रदीप खाडे, शत्रुघ्न बिरकड, डॉ. चारुशीला रुमाले यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आपल्या मनोगतातून नाट्य व चित्रपट सृष्टीतील अनेक किस्से उपस्थितांसमोर कथन केले. याप्रसंगी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नृत्यासह विविध नाट्यछटा सादर करून आपण प्रशिक्षणात काय शिकलो याची प्रचिती उपस्थितांना दिली. या सर्व प्रशिक्षणार्थींना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. भारतीय सेवा सदनाचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले, सचिन गिरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात नाट्य क्षेत्रातील दिग्गज देवदत्त पाठक, हरीश इथापे, किरण पावसकर ठाकरे, सौरभ ठाकरे, मिलिंद केळकर यांनी प्रशिक्षणार्थींना नाट्यकलेचे धडे दिले. शिबिराच्या यशस्वीते करिता सचिन गिरी यांचे सह मंदार घेवारे, विष्णू क्षीरसागर, रोशन समदुरे, अश्विनी ठाकरे, महेश इंगळे, अक्षय पिंपळकर, मोनिका अनासने, स्वराज पाटोळे, प्रमोद वानखडे, साहिल सप्रे, गीता जोशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तनया भोकरे यांनी केले. नाट्य क्षेत्रातील विष्णू निंबाळकर यांचे सह अनेक पालक व विद्यार्थी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा