ग्राहक चळवळीचे प्रणेते
स्व.बिंदुमाधव जोशी (नाना)
लेखक : मंजित देशमुख
संवाद : 99227 91837
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी ( नाना ) यांचे आज दहावे पुण्यस्मरण...
वेदांती योगाभ्यासी घराण्याची परंपरा असणाऱ्या आदरणीय बिंदुमाधव जोशी म्हणजेच नानांचा जन्म 25 सप्टेंबर 1931 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाला. प्राचीन ग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा उत्तम अभ्यास, शुद्ध जीवन, स्वच्छ व्यवहार, निरोगी आयुष्य , जाणकार योगाभ्यासी म्हणूनच समाजकार्यात झोकून देणं आणि ग्राहक चळवळीचा प्रचार आणि प्रसार कार्यासाठी संपूर्ण देशभर प्रवास करणं त्यांना शक्य झालं. यातूनच *ग्राहक चळवळीला भारतीय सिद्धांताचा वैचारिक आयाम देऊन " वन लाईफ - वन मिशन "हे जीवनसूत्र मानून त्यांनी एक देशव्यापी संघटना बांधली. आद.नाना हे अखेरच्या श्वासापर्यंत समाजशरण वृत्तीने अखंड कार्यरत राहून ग्राहक चळवळीचे तारणहार बनले.

विशुद्ध चारित्र्य, पारदर्शी व्यवहार, समाजाप्रती असणारी आत्मीयता माणसं जोडणं, त्यांच संघटन उभा करणं ही त्यांची कार्य गुणवैशिष्ट्ये. स्वतः नानांनी 1974 साली सुरू केलेल्या ग्राहक चळवळीचा नवा भारतीय विचार समाजा समोर मांडत ग्राहक शक्ती अधिक न्याय्य शक्ती म्हणजे शोषण मुक्ती हा सिद्धांत त्यांनी साध्य केला. देशातील राष्ट्रपती,पंतप्रधानांपासून ते सर्वच क्षेत्रातील महानुभावांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करून ग्राहक चळवळीचा हा नवा आयाम त्यांनी अंगी उतरविला. त्यातूनच 1980 साली ग्राहकांच्या हितरक्षणासाठी म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रारूप बनवण्यात आले सलग सहा वर्ष पाठपुरावा केल्यानंतर 24 डिसेंबर 1986 साली हा ग्राहक संरक्षण कायदा जन्मास आला. आणि शोषण मुक्तीचा एक नवा सिद्धांत कार्यान्वित झाला. गाव तिथे ग्राहक पंचायत हे ध्येय घेऊन संपूर्ण भारताची त्यांनी परिक्रमा केली. 1995 मध्ये महाराष्ट्र शासनात स्वतंत्र ग्राहक कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आले या ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून ( केबिनेट दर्जाचे मंत्रिपद) प्रशासन ग्राहक चळवळीला कसे सहाय्य करू शकते याचे संपूर्ण देशासमोर एक आदर्श मॉडेल उभारण्यात आदरणीय नाना यशस्वी झाले. त्याच माध्यमातून संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यांमधून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण कक्ष आणि स्वतंत्र न्यायदानासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगांची उभारणी करण्यात आली.भारताला विश्ववंदिता करवून सुजलाम सुफलाम मलयजत शीतलाम बनवूया हाच वचननामा तंतोतंत पालन केलेल्या 85 वर्षांच्या या ग्राहक चळवळीच्या पालनकर्त्याची 10 मे 2015 रोजी प्राणज्योत मालवली. आज नाना जरी नसले तरी नानांचे विचार चिरंतन आहेत. तुमच्या माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते नानांचे विचार उरी शिरी घेऊन हि ग्राहक चळवळ पुढे नेत आहेत. बीज रुपी तूंची !
करी पेरणी स्वतःची।
उपजेल कणीस ऐश्वर्याचे !!
हा विचार आणि वसा "अखिल भारतीय ग्राहक पंचायत" नेटाने आचरणात आणत आहे. 85 वर्षांच्या आयुष्यामध्ये हिमालयाची उंची आणि गंगेच्या ओघा इतकी पवित्रता लाभलेल्या आद. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्यातील बिंदू.. बिंदूंना आज दि.10 मे 2025 रोजी त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनी संपूर्ण भारतातील ग्राहक चळवळीच्या व्रतधारी कार्यकर्त्यांकडून विनम्र अभिवादन....
(लेखक हे अ.भा. ग्रा.पं. अकोला जिल्हाध्यक्ष आहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा