जननी जाणताना....
लेखिका-
सौ विदुला जोगळेकर
तो जन्माला आला तोच मुळी आईचा दावेदार असल्यासारखा.... तिच्या दुधाची गरज जशी संपली.. आणि तो घास घेऊ लागला तेंव्हापासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तिचा शारीरिक, मानसिक छळ करतच राहिला. ती कधी कधी कातावून जायची. कसली अढी घेऊन पोर पोटी जन्माला आला आहे कुणास ठाऊक, म्हणून व्याकूळ व्हायची, पण तो मात्र त्याच्याच मस्तीत. काही शिकवावं, समजून सांगावं म्हटलं तर तिच्यापुढे मिनिटभर उभं राहणं टाळायचा. आजी, आजोबा, बाबा, काका, या इतरांशी मात्र स्नेहपूर्वक वागायचा. कजागपणाकडे झुकणाऱ्या सासूबाईंना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायच्या, पण वरकरणी मात्र 'आईशी असं वागू नये' म्हणत त्याला हसत हसत त्या गोंजारायच्या. कधी वडील म्हणून नवऱ्याने देखील त्याच्या अशा वागण्याची फारशी दखल घेतली नाही. दोन मुलींवर झालेला वंशाचा दिवा.... त्याला जन्मापासून सारं माफ होतं.
तिचं मातृत्व आतून व्याकूळ व्हायचं. त्याला साद घालायचं. पण एक मिजास त्याच्या डोळ्यात ठाण मांडून बसलेली असायची. आपल्यासाठी आपली आई झुरतीय हे बघून लहानपणापासून तो तिच्या झुरण्याची मजा घ्यायचा. आपल्यासाठी ती झुरतेय हे बघून त्याचा पुरुषार्थ फुलून यायचा.
ती मात्र शेवटी आईच. तिच्या मायेला कुठली आलीय लाज. जरा बरा वागला बोलला की ती त्याला गोंजारायला जायची आणि स्वतःचे हसे करुन घ्यायची. वय वाढेल तसं लेकाच्या वागण्यात पडेल फरक ही तिची वेडी आशा तिला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे ओढून न्यायची.
शिक्षणासाठी म्हणून मोठ्या शहरात गेला आणि तिकडेच रमला तो. जात्याच हुशार आणि महत्वाकांक्षी. भावनेच्या बाबतीत कोरडा ठक्क ! त्यामुळे यश मात्र त्याच्यावर कृपावंत होते.
ती आपल्या पोटच्या गोळ्याचे कौतुक लांबून करत राहायची. तिच्याशी कसाही वागला तरी आपल्याच हाडामासांवर तो पोसला आहे, तिचा ऊर त्याच्या यशाने भरुन यायचा...
मुलींनी मात्र भरपूर जीव लावला. त्या सुखावर तिचा संसार निभावून गेला. मुली सासरी गेल्या आणि ही वरमाई होण्यासाठी अधीर झाली. लग्न झाल्यावर कदाचित त्याच्या भावना आपल्यासाठी बदलतील, परक्या पोरीपुढे तरी तो आपल्याशी व्यवहार म्हणून तरी नीट वागेल अशी तिची भाबडी आशा.
तिला त्याला बोहल्यावर चढवायची घाई झाली आणि एक दिवस तो शहरात वाढलेल्या, स्मार्ट, देखण्या मुलीला घरी घेऊन आला. शिकलेली, नोकरी करणारी चटपटीत पोर. कोण कशाला विरोध करेल. दोघांच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाले.
त्याची तीव्र टोकदार वागणूक लग्न झाल्यामुळे किंचित बदलली होती पण कोरडेपणा मात्र होताच. बायकोबरोबर त्याने तिला जोडीने नमस्कार ही केले होते. उंचापुरा, देखणा आपला पोरगा बघून तिला कित्येकदा त्याच्या सावलीत विसावा घ्यावासा वाटे. त्याने आई म्हणून काही आपली वास्तपुस्त करावी, त्याला काही चार चांगल्या गोष्टी सांगाव्यात, त्याच्या डोक्यावर असलेल्या काळ्याभोर केसांमधून हात फिरवावा, तिचं मातृमन या साध्याच वाटणाऱ्या गोष्टींसाठी तळमळायचे.
सून येण्याआधी आईपण काही तिने उपभोगले नाही. लेकासाठी करायच्या या गोष्टींना मात्र ती आजवर मुकलीच होती. पण हल्ली कारणापुरतं तरी बरं वागत होता तिच्याशी. बायकोला दाखवण्यासाठी की काय माहित नाही... पण ती नवखी पोरं चाणाक्ष होती. काही दिवसांतच तिने माय लेकाच्या नात्यातील दरी हेरली. आईला जाणत नाही तो दुसऱ्या कुणाला काय जाणणार....!
तिने आईसाठी बोथट झालेल्या आपल्या नवऱ्याच्या जाणिवेला धार लावायचे ठरवले. आईचे जगण्यातील स्थान/महत्व ही कुणी कुणाला सांगण्याची गोष्टच नाही. माऊली म्हणजे एक अनुभूती आहे आणि ती फक्त जाणीवेतच उमजते.
दिड दोन वर्षे ती मायलेकांचे रुक्ष व्यवहार बघत असतानाच तिला स्वतः ला मातृत्वाची चाहूल लागली. नवऱ्याच्या, सासूच्या कोडकौतुकात न्हात तिने सारे गर्भसोहळे अनुभवले. आपला अंश जीव रुपात अंकुरणार म्हणून तो बायकोला कोण जपत होता.
बाळंतपणासाठी माहेरी जाताना तिने त्याला बजावून सांगितले 'आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी तू माझ्या सोबत हवास. लेबर रुममध्ये तुझं असणं माझ्यासाठी दिलासादायक ठरेल.'
त्याने मान्य केले आणि डॉक्टरांनी दिलेल्या तारखेआधीच आठ दिवस तिला कळा सुरु झाल्या. तिच्या फोनवरच्या शिणलेल्या आवाजाने तो धावत दवाखान्यात गेला. पांढराफटक पडलेला तिचा चेहरा. क्षणभर उसंत न घेणाऱ्या कळा. मूल योग्य वजनाचे असल्यामुळे नर्स डाॅक्टरांची चाललेली धावपळ, वेदनेने पिळवटून गेलेले तिचे डोळे....
त्याचे डोळे एकाएकी भरुन आले. बाळाला जन्म देताना तिला तर काही होणार नाही ना... त्याला काळजीने ग्रासले. तिच्या दाबून धरलेल्या ओठातून वेदना बाहेर पडू बघत होती, पण ती नेटाने मुठी आवळून वेदना सोसत होती...
छे...छे... काय या यातना... जीवातून जीव जन्माला येणं सोपं नाही. तो नर्सपाशी धावत गेला. 'तिला काही होणार तर नाही ना. बघा ना ती किती केविलवाणी झाली आहे, सुटकेसाठी तडफडतीय... काही तरी करा ना...!'
नर्स हसून म्हणाली, 'आई होणार तर हे सहन करायलाच हवंय दादा... सगळ्या मायमाऊल्या हे सहन करतात.... तिने मरण यातना सोसल्याशिवाय नव्या जीवाला दुनिया दिसत नाही, म्हणून तर माऊलीच्या ऋणात माणूस आजन्म राहतोच. फेडू म्हणता न फिटणारं हे ऋण....!'
खाड्कन त्याचे डोळे उघडले.... आजवरचा सारा भुतकाळ त्याच्या समोरुन क्षणात तरळून गेला. का वागलो आपण आईशी असं मनमानी पणाने...? त्याला उत्तर मिळेना....
खिशातून मोबाईल बाहेर काढत त्याने आईला फोन केला 'आहेस तशी ताबडतोब दवाखान्यात ये....'
त्याचा रुद्ध स्वर ऐकून ती घाबरली. काय झालं असेल, बाळ बाळंतीण सुखरुप असतील ना...?दवा का श्याम
ती धावत दवाखान्यात आली. मुलगी झाली होती.. तिला नात झाली होती. तिच्या लेकाच्या हातात ते गोंडस गाठोडं निळ्या दुपट्यात गुंडाळून नर्सने दिले होते...
लेकाच्या फोन मुळे धावत पळत दवाखान्यात आल्याने तिचा श्वास फुलला होता. सून, नात, लेक समोर रुममध्ये सुखरूप दिसत होते. ती थोडी शांत झाली... तेवढ्यात बाळ खाली बायकोच्या पुढ्यात ठेवून तो धावत आईकडे आला आणि थेट तिच्या पावलांवर नतमस्तक झाला. तिची पाऊले त्याच्या अश्रूंनी ओलावली...
ती गोंधळली, 'अरे काय झालं?' अनपेक्षितपणे त्याचे हे टोकाचे चांगले वागणे... तिचा देह थरथरु लागला....
'आई क्षमा कर मला... लहानपणापासून जेव्हढा मी तुला विनाकारण त्रास दिला, त्या सगळ्या त्रासासाठी मला क्षमा कर.' त्याने तिचे पाय घट्ट धरून ठेवले. बेडवर श्रांत देहाने झोपलेली सून समाधानाने हसली. जीव जन्माला घालण्यासाठी आईला कोणत्या दिव्यातून जावे लागते याची नवऱ्याने फक्त झलक पाहिली होती आणि.... त्याचे स्वतः बद्दलचे सारे समज आणि जन्मदात्री बद्दलचे आजवरचे गैरसमज क्षणात मावळून गेले. आज आपला नवरा खऱ्या अर्थाने माणूस झाला याची तिला खात्री पटली. आता जगातील कोणतीच गोष्ट मायलेकरात मनभेद करु शकणार नाही....!
तिने तो चिमुकला जीव सासूबाईंच्या ओंजळीत ठेवला. नुकतेच उमललेले तिचे मातृत्व या वठून खोड झालेल्या मातृत्वाला फुटलेली कोवळी पालवी डोळ्यात साठवून घेत होते आणि मनात म्हणत होते... मातृत्व सांगण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे....!©®.
(आवडल्यास सामायिक करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा