मुख्य सामग्रीवर वगळा

            दुखऱ्या वेलींचा सुगंध 

                                           लेखक- संदीप काळे

                                   व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई,

                                संवाद : 9890098868

      मी त्या दिवशी माझ्या गावी पाटनूरला होतो. काही नातेवाईकांना भेटण्यासाठी गाडीतून कच्च्या रस्त्याने भोकरकडे निघालो होतो.  डोक्यावर रणरणते ऊन. नांदेडचा उन्हाळा म्हणजे काही विचारू नका! इतके असूनही धरणांमुळे आमच्या भागात आताही नद्या वाहतात. कालवे काठोकाठ भरून वाहतात. किती कमाल आहे! जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे, तिथे आज पावसाळ्यासारखे पाणी वाहते. कोणत्या जन्माची ही पुण्याई असेल.

 अनेक ठिकाणी पाण्याचा गैरवापर होतोय. पाण्याची प्रचंड नासाडी होते, असेही चित्र दिसते. मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. एका ठिकाणी असे चित्र होते की, नदीला छान पाणी होते. काही महिला नदीच्या काठावर धुणे धूत होत्या. लहान मुले पाण्यात खेळत होती. एका बाजूला काही गुराखी म्हशींना धुण्याचे काम करीत होते. माझ्यातले मूल पाण्याचा आनंद घेऊ पाहत होते.  मला राहावले नाही. एका झाडाखाली मी गाडी थांबवली आणि एका दगडावर टेकून नदीत पाय सोडून बसलो. वरून रणरणते ऊन आणि खालून नदी वाहते, असे केवळ काश्मीरमध्येच असू शकते का? तिथे वरून बर्फ वितळला, की खाली स्वच्छ पाण्याची नदी वाहते. माझे लक्ष पाण्याच्या आनंदाने होणाऱ्या प्रवासाकडे होते. तितक्यात आवाज आला, 'माझे कपडे. माझे कपडे!”  त्या ओरडणाऱ्या महिलेकडे माझे लक्ष गेले. ती जिकडे हातवारे करत होती, तिकडे मी पाहिले. पाण्याच्या प्रवाहामध्ये हळुवारपणे लोखंडाचं एक टोपलं, भरलेल्या कपड्यांसह पुढे पुढे सरकत होतं. अंगावर नेसलेल्या साडीमुळे त्या बाईला फार खोल पाण्यात जाता येत नव्हते. कुणीतरी ते लोखंडाचं टोपलं बाहेर काढावं, यासाठी ती ओरडत होती. मदतीसाठी आवाहन करत होती.  क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धावत गेलो आणि ते वाहणारं टोपलं हातानं पकडलं. घाबरून गेलेल्या त्या महिलेला एकदम घाम फुटला होता. 'धन्यवाद दादा, माझे कपडे वाहून गेले असते, तर सासू माझ्यावर खूप चिडली असती' असे म्हणून ती महिला नदीपात्रातून वर निघाली. एका झाडाखाली तिने शांतपणे ते टोपलं ठेवलं आणि त्यातला एकेक कपडा काढून ती बाजूच्या दगडांवर वाळत घालू लागली.  मी पाण्याच्या बाहेर आलो, तेव्हा आकाशातून आग ओकणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता अधिकच जाणवली. मी पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी गाडीकडे वळलो. तेवढ्यात माझं लक्ष त्या महिलेकडे गेलं. ती महिला भाकर तुकडा काढून खाण्याच्या तयारीत होती.

  ll  जाता जाता तिने मला सहज हटकलं आणि म्हणाली, "दादा, या... दोन घास खाऊन जा."

      मला फारशी भूक नव्हती, पण तिच्या भाकरीवरील उडदाच्या डाळीचा खमंग वास माझ्या नाकात शिरला. उडदाची डाळ म्हणजे माझी कमजोरी. अजून एक विचार मनात आला, आपण या माउलीला नकार दिला, तर तिला काय वाटेल? शिवाय आपल्यावर बालपणी झालेला संस्कार, 'समोर आलेल्या अन्नाला कधी नाही म्हणू नये'. 

मी त्या महिलेच्या बाजूला असलेल्या दगडावर बसलो आणि तिला म्हणालो, 'द्या अर्धी भाकर…' 

        त्या माउलीने एका भाकरीवर डाळ आणि आंब्याचं लोणचं टाकून ती माझ्या समोर ठेवली. मग काय विचारता? मस्त जेवण सुरू झालं. तिची भाकरी आणि उडदाची डाळ मला अतिशय आवडली, हे तिच्या लक्षात आलं. मग तिनं तिच्याकडं असलेली दुसरी भाकर मला दिली. ती म्हणाली, 'दादा, आता मी घरीच निघाले. घरी दुसरं काय काम हाय? भाकरी करायची न् खायची'. 

       काही तरी बोलायचं, म्हणून मी सहज विचारलं, 'तुमच्या घरी कोणी नसतं का?' 

      'असतात की, पण इथं कोणी राहत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी सगळे शहरात असतात'. त्या माउलीनं माहिती दिली. 

      तिनं दिलेली भाकरी - भाजी  मी आवडीनं खात होतो. दरम्यान आमच्या गप्पा सुरू झाल्या.

       ती महिला कोण होती? कुठून आली? तिच्या घरी काय परिस्थिती आहे? ती सध्या कुठल्या परिस्थितीत आहे? आणि तिच्या आयुष्यात ती एकटी का आहे? प्रत्येक महिलेच्या मनात एक गंभीर महाकाव्य दडलेले असते, तसे तिच्याही होते. 

       मी ज्या महिलेशी बोलत होतो तिचं नाव राधिका जाधव. राधिका जाधव त्या नदीपासून जवळ असलेल्या एका वाडीवर राहतात. तीन-चारशे घरांची ती वस्ती अजूनही विकासापासून लांबच आहे. राधिकाच्या घरी दहा एकर शेती. नवरा बऱ्यापैकी शिकलेला. राधिकाच्या लग्नाला आज तीस वर्षे पूर्ण झाली. पण या तीस वर्षांत राधिकाला मूलबाळ झालं नाही. डॉक्टरांच्या तपासणीनंतर लक्षात आलं, की राधिकामध्येच दोष आहे. त्यामुळे तिला मूल होणार नाही.

'माझ्या वंशाचा दिवा पाहिजे,' असा आग्रह राधिकाच्या सासूनं धरल्यावर, राधिकाच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. राधिकाच्या सवतीला दोन मुलं झाली. ती मुलं, राधिकाचा नवरा आणि तिची सवत लेकरांच्या शिक्षणासाठी नांदेडला राहतात. घरची शेती, सासू-सासरे, आर्थिक व्यवहार  सगळं राधिकाच्या खांद्यावर आहे.

       राधिकाचं व्यावहारिक कौशल्य फारसं शिक्षण नसतानाही अफाट आहे. बाजारपेठेचं ज्ञान, पाहुणचार, आलं गेलं, सोयरेधायरे, घरचे मानपान हे सगळं तिला सहज जमतं. व्यवहारातले चढउतार, नात्यांमधल्या अडचणींवर मात करण्याची प्रक्रिया यामध्ये ती तरबेज आहे. पण राधिका आई बनू शकली नाही, म्हणूनच तिच्यावर गणगोतात टीका होत राहिली.  

      खूप वेळ गप्पा झाल्यावर राधिका खुलून बोलायला लागली. ती म्हणाली,

'आता राधिका ऐवजी ‘वांझोटी’ हा शब्द कानाला सवयीचा झालाय. त्याचं मला काही वाटत नाही. मी स्वतःहून वांझोटी झाले का? मला मूल होऊ नये, यासाठी मी काही केलंय का? नाही ना? मग समाजातल्या बोलण्याकडं मी लक्ष का द्यायचं?' 

       या जेमतेम शिक्षण असलेल्या बाईमध्ये इतका आत्मविश्वास आणि स्पष्टता कुठून आली असेल, हा विचार मला छळू लागला.

       राधिकाचं आपल्या नवऱ्यावर अफाट प्रेम होतं. पण दुसरी बायको आल्यापासून त्याचं प्रेम आटून गेलं होतं. ती म्हणाली, 'समाजाचं काय... काहीही बोलतो. पण तो (नवरा) आजही सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळा. कधीतरी प्रेमानं बघतो आणि त्या प्रेमाच्या नजरेसाठीच जगावंसं वाटतं. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. मी त्याचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही. तरी त्यांनी मला सांभाळलं, हे काय कमी आहे?'

      मी आणि राधिका बोलत असताना आणखी एक बाई तिथे आली. ती म्हणाली, 'आला का भाऊ तुला न्यायला? तुझं बरं आहे गं. जवा वाटलं तवा भावाला बोलवतीस'. 

      राधिका हसून म्हणाली, 'हा माझा सख्खा भाऊ नाही. रस्त्यानं जाणारे दादा हायीत. त्यांनी पाण्यात वाहत जाणारं माझं टोपलं काढून दिलं. मग सुकादुकाच्या गप्पा झाल्या. जेवण झालं, बस इतकंच!' 

      ती दुसरी आलेली बाई माझ्या चमचमणाऱ्या बुटांकडे, पोशाखाकडे आणि गाडीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र अचंबा होता.

मी त्या दोघींच्या शेजारी दगडावर बसलो होतो. हातात भाकरी आणि गप्पा सुरू, हे बघून तिला आश्चर्य वाटलं. ती बाईही आमच्या गप्पांत सामील झाली. तिचं नाव नंदा.

नंदाला पाच मुली आहेत. सहाव्यांदा गरोदर आहे. नवऱ्याला ‘मुलगाच’ हवा आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगी म्हणजे परक्याचं धन, अशा विचारानं नंदाचं सगळं कुटुंब झपाटलेलं आहे.

      मी नंदाला  विचारलं, 'घरी वातावरण कसं आहे?' 

      ती म्हणाली, 'काय वातावरण? राबराब राबायचं अन् मुलगा होत नाही, म्हणून रोज शिव्या खायच्या. माझी आई जिवंत होती, तवा तिला समदं सांगायचे. आता तीही नाही. वडील लहानपणीच गेले. भावाकडून काही आधार नाही.

ती म्हणाली, 'पाच गर्भ पाडले. सगळे मुलीचेच. तीन-चार वैद्य म्हणाले, यांना मुलगा होणारच नाही. तरीही सासू-सासरे ऐकत नाहीत. डॉक्टर म्हणतात, 'असं केलं, तर बाई वाचल कशी?' 

       एकीकडे राधिका तिचं दुःख सांगत होती, तर दुसरीकडे नंदा. जिवंत असूनही ती रोज कसे मरण अनुभवते, हे मला सांगत होती.

      राधिका म्हणाली, 'आता जगणं फक्त नवऱ्याच्या त्या एका नजरेसाठी असतं. तो कधीतरी एक प्रेमळ नजर टाकतो. माझा नवरा आजही प्रेम करत असेल. समाज काय... कुणालाही दोष देतो. कावळेच नुस्ते!' 

      नंदा पुढे म्हणाली, 'खूप वेळा वाटतं, या नदीत उडी मारावी. जीव द्यावा. पण मग मुलींचा विचार येतो. माझ्या माघारी त्यांचं कसं होईल?'

      त्या दोघींच्या बोलण्यातून जे जग समोर आलं, ते मी ना कधी पुस्तकात वाचलं होतं, ना पाहिलं होतं. दोन वेगवेगळ्या सामाजिक त्रासांमधून रोज मरत जगणाऱ्या ह्या दोन स्त्रिया, त्यांचं दुःख कोणत्याही मापात मोजता येत नाही. 

      मी उठलो आणि गाडीकडे चालायला लागलो. मी एकदा मागे वळून पाहिले, तेव्हा त्या दोघी अर्धवट वाळलेल्या कपड्यांवर दगड ठेवत होत्या, ते कपडे वाऱ्यावर उडून जाऊ नयेत म्हणून. पण समाजाने त्यांच्यावर केलेले आरोप, त्यांची कुचंबणा, त्याला थोपवायला त्यांच्याकडे कोणताच उपाय नव्हता. कोणतंच मनोभावे वजन नव्हतं. 

      राधिका आणि नंदा ह्या दोन्हीही दुखऱ्या वेली आहेत. त्यांचा कर्तृत्वाचा सुगंध दूरवर पोहोचतोय, पण आपण त्यांना आपुलकीचं पाणी घातलं नाही, तर एक दिवस ह्या वेली सुकून जातील, तो सुगंध हरवून जाईल. बरोबर आहे ना? 

      राधिका आणि नंदा यांच्यासारख्या दुखऱ्या वेली ग्रामीण भागात तुम्हाला पावलोपावली भेटतील. त्यांना आधार द्या. त्यांचं दुःख समजून घ्या. त्यांना जर आपण दोन क्षणाचा आनंद देऊ शकलो, तर आपण खरे 'माणूस' झालो म्हणायचं. अन्यथा काही खरं नाही!

                  •  संदीप काळे,

                   व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई,

                        संवाद : 9890098868

(आवडल्यास सामायिक करतांना सत्यकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...