• लेखिका : सौ.शुभदा वडके रामसिंग
संवाद : 9920965112
"इथे दोन मार्क्स कमी कसे आलेत गं? काय करत होतीस तू ? लक्ष कुठे असतं? अशी चूक होऊच कशी शकते म्हणतो मी ? गणितातही दोन मार्क्स गेलेत. असं का होतंय गं ? नीट अभ्यास नाही करता येत ? एवढी मोठी झालीस तरी अक्कल नाही अजिबात. चार मार्क्स गेलेत एकूण. सिली मिस्टेक्स करतेस. आणि आता रडतेस काय ? ती सोनल पहिली आली. माझं नाक कापलंस. आजपासून तुझं संध्याकाळी खेळण बंद. फायनलला स्कोअर कर मगच आपण बोलू....."
बापाचा असा अवतार बघून रोशनी घाबरून गेली. तशी नेहमीच ती घाबरलेली असायची. त्यात 'ओपन हाऊस' च्या दिवशी तर फारच. हा दिवस उगवूच नये असं वाटायचं तिला. खूप हुशार होती ती. त्यामुळे परीक्षेचं तसं टेन्शन नसायचं तिला. पेपर मधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिला येत असायचं. पण काही वेळा घाईगडबडीत एखाद्या उत्तरात गडबड व्हायची. पेपर मॅडम कडे दिला कि नंतर तिला ते आठवायचं. तरी ती पूर्ण पेपर पुन्हा वाचून पाहायची. पण बहुदा ह्या ज्या सिली मिस्टेक्स व्हायच्या त्या तिच्या वडिलांच्या भीतीचाच परिणाम असावा. त्यामुळे परीक्षा संपली कि उलट तिचं टेन्शन वाढायचं.
आत्ताही तसंच झालं आणि तिच्या डोळ्यात पाणी गोळा व्हायला सुरुवात झाली. वय तरी असं काय मोठं होतं. सारं मिळून अकरा. शाळेत जायला लागल्या पासूनच तिचा काच वाढला होता. आत्ता फक्त पाचवीला होती ती. आणि तिचे वडील तिला अशा पद्धतीने ओरडत होते. ते ओरडतायत म्हणून ती गर्भगळीत झाली होतीच. त्यात भर म्हणजे पाचवीच्या सगळ्या क्लास समोर हे जोरजोरात चालू होतं. त्यामुळे त्या एवढ्याश्या जीवाला भारी अपमानित वाटत होतं. पण नाईलाज होता. कधी एकदा सगळं संपतंय आणि आपण वर्गाबाहेर जातोय असं तिला झालं होतं.
तिच्या वडिलांचा हा गोंधळ ऐकून थोडा वेळ सगळ्या वर्गात शांतता पसरली. रोशनीचा निरागस चेहरा, आता दुःखाने आणि अपमानाने काळवंडला होता. जोडीला हुंदके वाढले होते. तिच्या टीचरना तिची हि अवस्था बघवत नव्हती. इतकी गोड मुलगी केवळ दोन चार मार्कांसाठी एवढा ओरडा खात असलेली बघून त्या पुढे आल्या. आणि रोशनीच्या बाबांना अडवत म्हणाल्या, "जरा इकडे बाजूला या. काय काम करता तुम्ही ?"
"एका प्रायव्हेट फर्म मधे अकाऊंटण्ट आहे मॅडम." रोशनी चे पापा बोलले.
"तुम्ही तुमच्या मुलीवर एवढं ओरडताय. तेही सगळ्यांसमोर. फार मोठी चूक करताय. किती लहान आहे ती. जेमतेम पाचवीत आहे ती. तिच्या इतक्या लहान वयात आपण किती बरं मार्क्स मिळवत होतो ? थोडं आठवून बघा. तसाही आत्ताच्या मुलांवर ताण खूपच आहे. त्यात आपण असं ओरडून तो आणखी वाढवतो. मुलांना समजून घेतलं पाहिजे. आणि हि आपलीच जबाबदारी आहे. आणि जे काही ओरडायचंय ते तुम्ही घरी ओरडा तिला. इथे बाकीच्या मुलांसमोर नको. मुलं हट्टी होतात हो अशाने."
आत्ता तरी रोशनीची सुटका झाली होती. पण तिच्या वडिलांची हि सवय नंतरही पुढच्या परीक्षांमध्ये तिला त्रासदायक ठरत गेली. मुलं शाळेत होती तोपर्यंत मलाही हे सगळं ऐकायला मिळत होतं. माझी मुलगी तिच्याच वर्गात होती. त्यामुळे प्रत्येक ओपन हाऊसला रिपीट टेलिकास्ट सारखा आरडाओरडा व्हायचाच. म्हणजे टीचरच्या सांगण्याचा काडीमात्र परिणाम त्या माणसावर झाला नव्हता. रोशनीची आई मात्र कधीच आलेली दिसली नाही शाळेत.
शाळेत दहावीला 95% मिळवून पहिली आली रोशनी. पुढे कॉलेजला गेली. आणि बापाच्या हाताखालून सुटली. पहिली ते दहावी इतकी वर्ष केवळ ओरडाच खाण्याची सवय झाली होती तिला. कॉलेजच्या मोकळ्या वातावरणात ती मोकळी होत गेली. जरा जास्तच. कारण आता ओपन हाऊस नव्हतं.
पण ह्या सगळ्याचा उलटा परिणाम झाला. रोशनी बेताल झाली. ताणलेल्या रबरावरचा ताण अचानक निघून गेल्यावर जसं होतं तसं झालं तिचं. ताणलेल्या मनावरचा ताण सैल पडला. आणि चांगलं वाईट समजेनासं झालं. अभ्यास मात्र प्रामाणिकपणे करत होती. त्यामुळे शिक्षण छान चालू होतं. पण 18 वर्षांची झाल्याबरोबर तिने घर सोडलं. आणि एका मुलाबरोबर लिव्हइन रिलेशन मधे रहायला लागली. आई वडिलांनी संबंध संपवले होते. कि तिनेच ते संपवले होते ते कळलं नाही. तिच्या बद्दल माझ्या मुलीच्या मित्र मैत्रिणीमधे अधून मधून चर्चा व्हायची. ती थोडीफार घरातही कळत होती.
आणि एक दिवस अचानक बातमी आली की, बाईक वरून जाताना ऍक्सिडेंट झाला आणि ती जागीच खलास झाली. सोबतचा मुलगा तिला तसंच टाकून पळून गेला होता. आणि आईवडील कळून सुद्धा ढुंकूनही बघायला आले नाहीत. एकुलती एक असूनही, ती मेल्यावर सुद्धा तिला अग्नी द्यायला त्यांना यावंसं वाटलं नाही. इतका त्यांचा अहंकार मोठा होता. शेवटी बेवारस म्हणून विल्हेवाट लावण्यात आली. ऐकल्यावर रोशनी साठी नकळत डोळे पाझरायला लागले.
काय चूक होती त्या गोड मुलीची ? मुलं म्हणजे केवळ तुमच्या हातचं खेळणं नाहीये. लहान असली तरी त्यांनाही मन आहे. भावना आहेत. त्यांच्याशी मैत्र वाढवायला पाहिजे. स्वतःची चूक सुद्धा आईवडिलांपाशी व्यक्त करता आली पाहिजे असं नातं निर्माण करायला पाहिजे. नाहीतर हे असं होऊन बसतं....
अशा तऱ्हेने उमलत्या आयुष्याचं एक ओपन हाऊस असं अचानकच क्लोज झालं होतं.
©® सौ. शुभदा वडके रामसिंग
संवाद : 9920965112
(योग्य वाटल्यास सामायिक करतांना लघुकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. अशा सकारात्मक संदेश असलेल्या कथा वाचण्यासाठी व सामाजिक संदेश असलेले स्टेटस अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या 9325927222 या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधा -मेघःशाम सोनवणे.)
आजची ही कथा स्वतः लेखिका सौ. शुभदा वडके रामसिंग मीरा भाईंदर, ठाणे, यांच्या सौजन्याने.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा