• कलाप्रेमींसाठी अकोल्यात साकारतोय लोकरंग
• १८ एप्रिलला अभिनेत्री मधुरा वेलणकरांचा विनामूल्य नाट्याविष्कार
अकोला: सगळ्याच क्षेत्रात वाढ होणाऱ्या अकोला महानगरात सांस्कृतिक क्षेत्रसुद्धा बाळसे धरीत असून कलाप्रेमींची तहान भागविण्यासाठी आता 'लोकरंग' नावाचा कलासमूह निर्माण झाला आहे. हा समूह वर्षातून पाच नामवंत कार्यक्रमाची मेजवानी अकोलेकरांना देणार आहे. येत्या शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी या उपक्रमाचे अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते उदघाटन होत आहे.
अकोल्यातील अनेक नामवंत लोक कलेच्या विविध क्षेत्रात मुशाफिरी करीत मोठे झाले आहेत. आज मुंबई, पुणे इत्यादी मोठ्या शहरात एका उंचीवर ते पोहोचले आहेत. अजूनही असंख्य तरुण, तरुणी धडपडत आहेत. अनेकांना योग्य व्यासपीठ मिळाले तर अनेक चाचपडत आहेत. कला, साहित्य, संस्कृती इत्यादी क्षेत्रात रुची वाढावी आणि या वैभवी शहराला पुन्हा कलेचे संरक्षक शहर म्हणून ओळख प्राप्त व्हावी यासाठी काही समविचारी मित्रांनी " लोकरंग " या कलेच्या मंचाची स्थापना करण्याचे ठरवले आहे. लोकजागर मंच प्रमुख अनिल गावंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून लोकरंगच्या माध्यमातून ठराविक पाचशे लोकांना या समूहात सहभागी केले जाणार आहे. दहा हजार रुपये अनामत आणि पाच हजार वार्षिक सभासद शुल्क भरून यात कुणालाही सहभागी होता येणार आहे. अकोल्यात कार्यरत विविध कलाप्रेमी आणि नामवंत या समूहात मार्गदर्शन करणार असून केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देऊनच हा समूह थांबणार नाही तर अभिनय कार्यशाळा आणि वन्हाडी खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देणारे उपक्रम सादर केले जाणार आहेत. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमिलाताई ओक हॉलमध्ये हा कार्यक्रम होत आहे.
अभिनेते भारत गणेशपुरे मेंटॉर
लोकरंग या समूहाचे मराठी अभिनेते भारत गणेशपुरे हे मेंटॉर राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनात या समूहाचे अकोल्यात कामकाज चालणार आहे. येत्या १८ एप्रिल रोजी सुरुवात होणाऱ्या या उपक्रमाला ते स्वतः उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात लोकरंग मार्फत अभिनेते गणेशपुरे अभिनय कार्यशाळा चालविणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
कला शहर व्हावे म्हणून ...
लोकरंग हा उपक्रम अकोल्यातील विविध मान्यवरांच्या चर्चेतून उदयास आला असून अकोला शहराला पुन्हा कलेचे शहर म्हणून ओळख प्राप्त होऊन वऱ्हाडी कलावंतांचा शुद्ध मायानगरी मुंबईत प्रभाव निर्माण व्हावा आणि कलाप्रेमींना उत्तम कलाकृतींचा आस्वाद घेता यावा यासाठी हा समूह असून कुणालाही त्यात सहभागी होता येईल अशी माहिती लोकरंग अध्यक्ष अनिल गावंडे यांनी दिली.
पहिला कार्यक्रम दिवंगत
सीमा शेटे यांना समर्पित...
लोकरंगच्या वतीने सादर करण्यात येणारा ' मधुरव' हा पहिलाच कार्यक्रम अकोल्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील दिवंगत सौ. सीमा शेटे - रोठे यांना समर्पित राहणार आहे. रविवारी अकोल्यातील श्री शिवाजी कॉलेज मध्ये आयोजित श्रद्धांजली सभेत तसा निर्णय जाहीर करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा