• मुकी जनावरे मौनातून बोलतात.
लेखक : ऋतुराज कशेळकर
आमच्याकडे चंपी नावाची कुत्री होती. ही चंपी आमच्या घर आणि वाडीची रखवालदारच! मुख्य म्हणजे मला लहानपणी "बाळा, अभ्यास केला पाहिजे" असं जे जे सांगायचे त्या सगळ्या नातेवाईक आणि गावकर्यांवर ही चंपी जोरदार भुंकायची. एकादोघांचे कपडेही तिने फाडलेले आहेत. घरात माझं दुःख समजू शकणारी अशी ती एकमेव होती. त्यामुळे माझा तिच्यावर प्रचंड जीव. ही चंपी माझ्या मागून शाळेत यायची आणि व्हरांड्यात निमूट झोपायची.
एकदा आमच्या म्हसवडकर गुरूजींना तिची अडचण झाली. त्यांनी तिला हाकलायला छडी उगारली आणि चंपी उडी मारून त्यांच्या मनगटाला चावली. गुरूजींना शुद्ध आली तेव्हा ते दवाखान्यात होते. दुसर्या दिवशी शाळेतल्या सगळ्या पोरांनी खंडणी द्यावी, तशी चंपीसाठी एकेक पोळी आणली होती.
मास्तर बरे होऊन आल्यावर त्यांनी मला झोडायचं असं ठरवून, मी मुद्दाम कुत्री शाळेत आणतो, अशी आवई उठवली. मग मीही मला ओरडणार्या आमच्या चुलत आजोबांनाही चंपी कशी चावली होती, याची एक सुरस कथा रचली. तरीही म्हसवडकर मास्तरांनी मला एकदा छडीने दोन फटके मारल्याबरोबर मी जोरात, "आई गं" ऐवजी "ये गं चंपे!" असं ओरडलो आणि चंपीने वर्गाच्या दारात भुंकून भुंकून थैमान घातलं. शाळा सुटून दुसर्या वर्गातली मुलं घरी गेली तरी ती म्हसवडकरांना जाऊ देईना. त्यांनी बाहेर पाऊल टाकलं रे टाकलं की ही भुंकायची. माझ्यासकट अख्या शाळेनं ती मजा अनुभवली. शेवटी मी तिला शांत करून घरी घेऊन गेलो. तेव्हापासून म्हसवडकर इहलोकात दोघांनाच घाबरायचे. शाळा तपासणीला येणारे साहेब आणि चंपी!
लहान वयात आपल्यावर माया करणारं जनावर का असेना, आपण त्याला अतोनात जीव लावतो. तसं माझं चंपीच्या बाबतीत होतं. मी कुठूनही येताना दिसलो की ती एक विशिष्ठ आवाज काढायची, गाल चाटायची, पुढचे दोन पाय माझ्या पोटावर ठेवून मिठी मारल्यासारखी बिलगायची.
गेली त्याच्या आदल्या दिवशी दुपारपासून गायब होती. मी काकुळतीला आलो. संध्याकाळी 'शुभं करोति' म्हणून झाल्यावर मी गणपतीला हात जोडून विनवलं, "माझी चंपी परत येऊ दे!" रात्री जेवून सगळे झोपले तरी चंपी आली नव्हती. मध्यरात्री मागल्या दारी तिचा आवाज आला. मी ताड्कन उठून गेलो. तिची एक खास ॲल्युमिनियमची थाळी होती. त्यात दूध घालून, पोळी कुस्करून मी तिला अक्षरशः भरवली. पोळी खाऊन झाल्यावर तिने गाल चाटले, दोन पाय खांद्यावर ठेवले, मान तिरकी करून माझ्याकडे बघत होती. थोड्या वेळाने निघून गेली. सकाळी वाडीतल्या बकुळीखाली ती मरून पडली होती. आदल्या रात्रीच्या चाटण्यातून, एकटक बघण्यातून काहीतरी सांगायचं असावं तिला. पण नाही कळलं.
नंतर अनेक दिवस वर्गात बसल्या बसल्या अचानक चंपीच्या भुंकण्याचे भास होत. शाळेत जाता येता एकाकी वाटे. चंपीनंतर कुत्रं पाळायचा धीर झाला नाही.
ही मुकी जनावरं मौनातून बोलतात, ते शब्दात मांडता येत नाही. मला नेहमी वाटतं की या मुक्या जनावरांना देवाने एका दिवसासाठी का होईना, वाचा दिली पाहिजे. जे आवडलं ते सांगायला, रूचलं नाही त्याबद्दल तक्रारीला, नुकसान केल्याबद्दल शिव्या घालायला आयुष्यात एकदा तरी त्यांना कंठ फुटला पाहिजे.
आमची जया नावाची म्हैस होती. मी पहिलीत गेलो त्या वर्षी विजयादशमीला तिचा जन्म झाला, म्हणून आजीने तिचं नाव जया ठेवलं. ती तर साक्षात मायाळू होती. ती लहान होती तेव्हा मी तिच्या डोक्यावर डोकं आपटायचो. ती मोठी झाली तरी आमचा हा खेळ चालायचा. आपण एकमेकांना टाळी देतो तशातला तो प्रकार होता.
ही जया तशी गोठ्यातली सगळ्यात मोठी. त्यामुळे कुटूंबप्रमुख! आणि ही जबाबदारी ती कुशलपणे पार पाडायची. गावठाणात सगळ्या लहान मोठ्या पारड्यांना नेणं आणणं, तिकडे इतर कुणाच्या गुरांनी आमच्या गुरांना त्रास दिला की त्यांच्याशी झोंबी करणं, ही कामं ती अगदी पोक्तपणे करायची. चांगली पंधरा वर्षं गोठ्यात होती. भरभरुन देत होती. पण काळाचे आरे फिरले आणि गोठ्यातल्या दोन म्हशी विकाव्या लागल्या.
माहेर सोडताना मुलीची जी अवस्था तीच अवस्था जयाची होती. तिला नेणारा टेम्पो नाक्यावरुन वळेपर्यंत ती व्याकुळ नजरेनं, "मला नाही जायचं" असं सांगत होती. तिला बिचारीला फक्त माया माहित, माणसांच्या जगातला व्यवहार तिला कसा कळणार?
आमच्या गोठ्यात अशी अनेक गुणी जनावरं होती. शिसवी रंगाच्या कावेरी जवळ मी तासन् तास बसायचो. तिचे डोळे म्हणजे काठोकाठ वात्सल्य होतं. गोग्रासासाठी तिला पाळलेली होती. सुंदर-सुकुमार ही बैलजोडी म्हणजे दोन उनाड दोस्त असावे असे होते. चरायला गेले की गावातल्या कुणाच्याही बैलाशी दोघे मिळून झोंबी खेळायचे. आणि ही झोंबी म्हणजे वर्गातला आचरट मुलगा जसा आधी खोडी काढतो, मग भांडतो, मग हातापाईवर येतो, तशा थाटात चालायची.
सुकुमार आजारी होता. औषधपाणी चालू होतं. आजोबा परगावी गेले होते. सुकुमार अत्यवस्थ झाला, पण प्राण सोडत नव्हता. पणजीआजी त्याला म्हणाली, "खूप राबलास रे बाळा, पण जा आता सुखाने!" पण सुकुमारने ऐकलं नाही. संध्याकाळी आजोबा आले. जमिनीवर पडलेल्या सुकुमारने त्याही अवस्थेत उठायचा प्रयत्न केला, पण त्याला जमलं नाही. आजोबा त्याच्यासमोर गुडघ्यावर बसले. त्याच्या गालांवर हात ठेवून म्हणाले,"सुकुमार, जा बाबा आता! खूप केलंस घरासाठी! भरपूर झिजलास रे बाळा! कधी तुला मारलं असेल तर माफ कर. तुझ्या पायाने लक्ष्मी आणलीस. खूप दिलंस. तुला वाट पहायला लावली. पण आता सुखाने जा." सुकुमार सारं समजल्यासारखा गेला. तेव्हा आजोबा रडले होते. माझ्या बुरूजासारख्या आजोबांना ढासळलेलं असं मी फक्त तेव्हाच पाहिलं.
काही दिवसांपूर्वी मी एका मित्रासोबत जसवली तळ्यावर उभा होतो. हरिहरेश्वरकडून एक कार आली आणि म्हसळ्याकडे वळली. त्या वळणावर एक गायीचं वासरू बसलं होतं. कारच्या पुढच्या चाकाच्या खाली स्टेअरिंगच्या दांडीत त्याचे दोन पाय अडकले होते. त्याला त्यातून सोडवून ती कार निघून गेली. नंतर त्या नाक्यावर फक्त आम्ही दोघे आणि प्रचंड मानसिक आघात झालेलं ते वासरू असे तिघेच जण होतो. लाॅकडाऊनमुळे आसपासची दुकानंही बंद होती. मी बराच वेळ त्याला पहात होतो. शेवटी एकदाचं ते तोल जाऊन रस्त्याच्या कडेला आडवं झालं. माझ्याकडे पाण्याची बाटली होती. मी त्याच्या तोंडात ती उपडी केली. थोडं पाणी प्यायलं आणि प्रचंड कृतज्ञपणे त्याने माझ्याकडे पाहिलं. "तुझं भलं होवो" असा काहीतरी आशिर्वाद त्या मुक्या जीवाने दिला असेल.
आणि अगदी कालच दुपारी आमच्या एका म्हशीचं वेळेपूर्वी वेत झालं. रेडकू मेलं, हिची वार अडकली. शेवटी डाॅक्टर आले. त्यांनी वार ओढून काढली, तीन चार सलाईन लावल्या, दोन इंजेक्शनस् दिली. तिला प्रचंड त्रास होत होता. तिचं तोंड दोरीने बांधलं होतं आणि ती दोरी धरून मी उभा होतो. अधूनमधून तिला शांत करायला तिच्या डोक्यावर हात फिरवत होतो. शेवटची सलाईन लावली तेव्हा ती टिपं गाळत होती.
आपल्याला चार पैसै मिळावेत म्हणून किती सोसतात ही मुकी जनावरं! गोचीड गायीम्हशींच्या आचळाला लागली, तरी रक्तच पिते, असं म्हणतात. माणूस त्या गोचीडीपेक्षाही खालच्या स्तरावर आहे. तो मिळेल तोवर दूध पितो, दूध संपलं की खाटकाला गायीम्हशी विकून पैसे मिळवतो. पूर्वी गोठ्यात मेलेल्या जनावराला मोठा खड्डा खणून, त्यात ठेवून, वर कफन घालून गाडायचे. दूध न पिता वासरू मेलं तर गाडताना त्याच्या तोंडाशी गवत किंवा पेंढा ठेवायचे. आता जनावर मेलं की सरळ गावठाणात बेवारसपणे फेकतात.
आपण म्हणतो की 'मी गायीम्हशी पाळल्या', खरंतर त्या आपला प्रतिपाळ करत असतात. त्यांचे पांग आपण फेडूच शकत नाही. निदान त्यांच्या उपकाराची जाण तरी आपण ठेवावी अशी त्यांची आपल्याकडून माफक अपेक्षा असते.
"समर्पण" हा या मुक्या जीवांचा धर्म असतो. माणसावर अतोनात माया करतात, आपले कधीतरी रागाने मारलेले फटकेही मुकाट खातात. खरं तर त्यांच्या मनात विद्रोह भडकला तर मी मारलेल्या दोन फटक्यांसाठी, दावणीवरुन सोडल्या सोडल्या शुक्रीने मला यमलोकी धाडलं असतं. पण तिच्या मनात असं कधी आलं नाही. सर्वस्व देऊनही, दिल्याचा अहंकार येऊ न देणं, ही गोष्ट या गुरांकडून शिकावी.
या मुक्या सवंगड्यांना हे सगळं मी त्यांच्या भाषेत सांगू शकत नाही. त्यांच्यासारखी मौनाची भाषा मला अवगत नाही. पण दोस्तहो, जसं माझं जगणं सजवण्यात माणसांचा वाटा आहे, तसा तुमचाही वाटा आहे. न बोलता बरंच शिकवलंत तुम्ही! असाच लोभ ठेवा, ही विनंती!
_ © ऋतुराज कशेळकर
(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा