• शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात नाट्य अभिनय कार्यशाळा
संपन्न
अकोला :
स्थानिक शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अकोला येथे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत सांस्कृतिक समितीच्या वतीने दि. २८/०२/२०२५ ते ५/०२/२०२५ दरम्यान नाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अनिल कुलकर्णी सचिव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा अकोला
यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर शिवाजी नागरे, डॉ. मनोज मालपाणी, कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ ज्ञानसागर भोकरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सुमेध कावळे, डॉ. निशा वराडे उपस्थित होते. पहिल्या दिवशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती वैशाली गोस्वामी,समन्वयक अप्लाइड थेटर इंडिया फाउंडेशन यांनी विद्यार्थ्यांना थिएटर गेम्स, बाॅडी मूव्हमेंट, इम्प्रोनायजेशन याविषयी माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी डॉ. सुनील गजरे यांनी संवाद शैली याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व प्रात्यक्षिक करून घेतले. तिसऱ्या दिवशी वास्तवभासी अभिनय व नाट्यनिर्मिती प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक दिग्दर्शक सुयोग देशपांडे, आसक्त पुणे यांनी घेतले. तर दुपारच्या सत्रात संतोष जढाळ नेपथ्यकार भारतीय रंगभूमी, मुंबई यांनी विद्यार्थ्यांना नाटकामध्ये नेपथ्य व त्याची निर्मिती याबद्दल मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी डॉ. अनिलकुमार साळवे संभाजीनगर यांनी नाट्य व चित्रपट यातील अभिनय तसेच चित्रपट तंत्र याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.पाचव्या दिवशी बी. गोपनारायण यांनी नाट्यलेखन व नाट्यबीज कसे फुलवायचे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. दुपारच्या सत्रात नाट्य तंत्र व प्रकाश योजना याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे प्रा डॉ. कैलास पोपुलवार नांदेड यांनी माहिती दिली. सहाव्या दिवशी अनिल कुलकर्णी यांनी रंगभूषा याचे प्रात्यक्षिक घेतले तर दुपारच्या सत्रात दिलीप देशपांडे यांनी एकपात्री अभिनयचे प्रात्यक्षिक घेतले. सहा दिवसीय नाट्यशिबिराचा समारोप डॉ. ताराताई हाताळणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी प्रमुख मार्गदर्शक दिलीप देशपांडे ज्येष्ठ नाट्यकर्मी उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री नानासाहेब कुलकर्णी, प्राचार्य डॉ जगदीश साबू उपस्थित होते. समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. ताराताई हाताळणे यांनी विद्यार्थ्यांना जे कलागुण तुम्ही कार्यशाळेत शिकले, त्याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये निश्चित होईल असे प्रतिपादन केले. या नाट्यशिबिरामध्ये विविध महाविद्यालयातील मिळून एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन कु. प्रियंका शर्मा हिने, अहवाल वाचन प्रा. डॉ.ज्ञानसागर भोकरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा सुमेध कावळे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा