"रस्ता महत्त्वाचाच...... .."
माणसाचं मन कसं आहे, याचं वर्णन अनेक लेखकांनी केलं आहे ,संतांनी केलं आहे. त्यात फक्त वर्णन नाही, ते वर्णन प्रत्येकाला असं वाटतं - हे माझंच आहे .याचं कारण आहे, ते वर्णन अगदी माणसाच्या मनाशी जुळणारं आहे. एकरूप होणार आहे. महाराष्ट्रभर नव्हे भारतभर गाजलेल्या आणि दमदार लेखनाने माणसाच्या ओठांवर असणाऱ्या ,खानदेशी कवयत्री बहिणाबाई चौधरी यांनी माणसाच्या मनाचे वर्णन केले आहे ते अगदी नेमकं आहे- ' मन वढाय वढाय जसा शेतातलं ढोर ' शेतात जसं एखादा प्राणी असतो, ढोर असतो त्याला कळत नाही , हे खाऊ की ते खाऊ ! त्याला काही नेमकं सुचत नाही तसेच माणसाच्या मनाचं असतं का ? एका क्षणात इथे दुसरा क्षणात तिथे असं माणसाचं मन हे वाऱ्यावर फिरत असतं. त्याला वेग असतो. त्याला मर्यादा नसते विचारांची, कधीची कशाचीही ! नेमकं नाव नक्की केलं ते वऱ्हाडी बोलीचे अभ्यासक आणि मराठीचे लेखक डॉ. रावसाहेब काळे यांनी ! महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे ते सर्वत्र नावाजलेले लोकप्रिय कवी डॉ. विठ्ठल वाघ त्यांच्या एका कवितेत म्हणतात -
मधी वावरात आंबा
चारी मेरीनं कनसं
डेबुजी च्या कीर्तनात
जसे डोलती मानसं...
कविता तशी वेगळी मात्र माणसाच्या मनाशी साधर्म राखणारी. ती अशी की जसं एखाद्या कीर्तनामध्ये माणसाचं मन रमतं, त्याची बुद्धी फारशी काम करत नाही .तो बुद्धीला दाद देऊ शकत नाही .तसंच माणसाच्या मनाचं होतं कारण बुद्धीनुसार तो काही करत नसतो तर मनाने करत असतो.डोलणं माणसाच्या हातात राहत नाही.
बुद्धीने किंवा माणसाच्या मनाने त्याचा शरीराचं ,त्याच्या कार्याचा संचालन होतं असं म्हणतात. एक सत्य हे ही आहे की माणसाच्या मनात असलेली भीती ही ,त्याला कार्य करण्यास थांबवते किंवा अयशस्वी होऊ देते. खरंतर हे थांबविणे शक्य आहे कारण बुद्धी आणि मन यामध्ये जे वरचढ होईल त्यानुसार माणसांकडून कृती करण्यात येते आणि त्याचेच परिणाम माणसाला निश्चितपणे मिळत असतात. मग कोणत्या वेळी मनाला हावी होऊ द्यावे हे माणसाला ठरवता येणे शक्य आहे, ठरवता येते त्याने विचार केला तरच ! एक तर खरं की मन आणि बुद्धी यामध्ये बुद्धीने घेतलेला निर्णय किंवा केलेली कृती ही निश्चितपणे अधिक चांगल्या परिणामाकडे नेणारी असते कारण मनाला असं वाटत असतं की अमुक व्हावं पण तसं होईल याची खात्री कुणाला आहे ? ज्याची खात्री आहे ते करायला काय हरकत आहे ? मन आणि बुद्धी यामध्ये मनात भावना असतात तर बुद्धीला व्यवहाराची, वास्तविकतेची जोड असते ज्याचं भान नेहमी ठेवणं अत्यंत गरजेचं असतं.
माणसाची बुद्धी ज्यावेळेला मन आणि मोह च्या ताब्यात जाते त्यावेळेला ती काम करेनाशी होते हे काय खरात या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांवरून लक्षात आलं नाही माणसांच्या ?
माणसं त्यांच्या - त्यांच्या परिस्थितीने निर्णय घेतात हे खरं आहे मात्र त्यात बुद्धीचा वापर , हा निश्चितपणे झालाच पाहिजे यात शंकाच नाही. निर्णय कोणताही का असेना तो मनाने घ्यावा लागतो मात्र त्यावर वर्चस्व बुद्धीचं असलंच पाहिजे. एखादा निर्णय मनाने घेत असताना माणसाचा नाईलाज होऊ शकतो मात्र त्यांनी बुद्धीने विचार करावा की मी ही परिस्थिती पलटवून लागेल आणि याच परिस्थितीनुसार, मी नव्याने उभारणी करीन म्हणजे नक्कीच करेन ! परिस्थिती कोणतीही आणि कशीही असो त्यामध्ये सकारात्मक एकाग्रता म्हणतात ते अशाच विचार करण्याला ! खरंतर विचारांची सुरुवात व्हायला पाहिजे.यासाठीच की काय म्हणतात ना....
जो सफर की सुरूवात करते हैं
वो मंजिल भी पा लेते हैं
चलने का हौसेला रखना
क्योंकी
अच्छे इन्सानो का तो
रास्ते भी इन्तजार करतें हैं.....
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक ,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन , अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा