'अस्सी’ चित्रपट नव्हे चळवळ….
लेखक
✍🏻प्रा. राहुल गोवर्धन माहुरे
शांतीनगर, जुनेशहर, अकोला.
संवाद : 9822278925, rmahure@gmail.com
बॅालीवूड मध्ये अनेक चित्रपट बलात्कार या विषयावर आलेले आहेत येत आहेत आणी येत राहणार ‘निर्भया हत्याकांड’ ने तर संपूर्ण देश चं काय तर जग पण हादरुन गेलं होतं हा एकूणचं प्रकार अतिशय भयंकर आहे. सर्व्हेक्षणानुसार असे आढळले की दर २० मी. ला भारतात कुठे ना कुठे तरी बलात्कार होतो. काहींची नोंद होते काही नोंद होत नाही हे आणखी आपल्या समाजव्यवस्थेचे दुर्दैव आहे. घरात, बाहेर, कामाच्या ठिकाणी, प्रवासात कुठे ही महिला सुरक्षित नाही हि आपली शोकांतिका आहे.
हा चित्रपट महिलांच्या सुरक्षेवर, आपल्या लाचार न्यायव्यवस्थेवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवेदनाशून्य झालेल्या आपल्या सामाजिक मानसिकतेवर जोरदार प्रहार करते.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी मग वेगळं काय मांडलं हा प्रश्न आपल्याला पडतो..परंतु सिनेमा बघितल्यावर याचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळते. या आधी अनुभव सिन्हा यांनी मुल्क, थप्पड आणि आर्टिकल १५ यांसारख्या सामाजिक आणि वास्तविक विषयांवर भाष्य केलं आहे.‘अस्सी’ हे नाव निवडण्यामागेही कारण आहेच. रोज देशात सरासरी ८० बलात्कार होतात. त्यातल्या किती गुन्ह्यांची नोंद होते? कुणाला शिक्षा होते? कोण सुटून जातं? कुणाला न्याय मिळतो? यासाठी आहे. ‘अस्सी’आपल्याला या अनुभवांतून घेऊन जातो. यामध्ये सरकार, संघटना जेव्हा करतील तेव्हा करतील परंतु हा लढा आपला आहे. तुमचा आमचा सर्वांचा या देशातील प्रत्येकाचा आहे. स्वतःचा, आपल्या मानसिकतेचा, आपल्या विचारांचा, आपल्या संस्कारांचा आहे. अशा भयंकर घटनांवर ठोस उपाययोजना काय? कारण समस्या वर वर सोडवुन उपयोग नसते. तर तिचे मुळातुन चं उच्चाटन करणे गरजेचे असते. अन्यथा ती परत डोकं वर काढते. इतके वर्ष झाले तरी यावर परमनंट सोल्यूशन आपण काढु शकलो नाही हे आपले सर्वांचे दुर्दैव आहे. हा सिनेमा आपल्याला आरसा दाखवतो. स्त्री अनादीकाळापासुन आजही विज्ञान, तंत्रज्ञान आणी आधुनिक युगात सुरक्षित नाही. तिच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन चं मुळात आपण बदलवला नाही.
ती आजही एकटी मोकळेपणाने कुठे ही जावु शकत नाही. सर्व नियम केवळ तिच्या साठी चं अशी असतांना असलेली परिस्थिती आहे. एक संवाद रावी ची भूमिका करणारी तापसी या सिनेमात बोलते तो असा
"औरत को इतना गुस्सा आता है,
कि,दुनिया राख हो जाए,
बस हमको जलानी नहीं है"
आम्हाला याचं परमनंट सोल्युशन पाहीजे..
अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन गौरव सोलंकी यांनी केले असून, अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटात कोणत्याही एका पात्राला 'हिरो' बनवलं नाही. तर, त्यांनी कथेलाच केंद्रस्थानी ठेवलं आहे. प्रत्येक पात्राला आवश्यक तेवढीच जागा देत त्यांनी वास्तववादी आणि प्रखर सिनेमा उभा केला आहे. हा सिनेमा नसुन एक चळवळ आहे. आणी संवेदना जीवंत असणाऱ्या प्रत्येकांनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे. हे गुन्हेगार येतात कुठुन हो.. आपल्यातुन चं न…मग याला जबाबदार कोण? हा प्रश्न आज प्रत्येकांनी आपल्या मनाला विचारला पाहीजे. सिनेमा इतका सहज चालतो कुठे ही अतिशयोक्ती नाही. पिडितेचा पती ज्याला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असतो. आपल्या पत्नी सोबत तो मोठ्या धाडसाने उभा असतो. नाहीतर समाज काय म्हणेल? या एका प्रश्नात चं अनेक लोक आपलं आयुष्य जगणं चं सोडून देतात.
आपल्या नंतर आपल्या मुलांची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. मला न्याय मिळेल हा आशावाद त्याच्या डोळ्यात दिसतो. तो सूड घेण्याचा कट रचत नाही. तो रक्तासाठी ओरडत नाही. तो पुरुषत्व दाखवत नाही. तो एक कायदा पाळणारा नागरिक आहे जो त्याच्या पत्नीच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करतो. न्यायालयात तिच्या शेजारी बसतो. तिला कामावर घेऊन जातो. तिची बरे होण्याची वाट पाहतो. बाल्कनीत तिच्यासोबत शांतपणे उभा राहतो. अशा घरात मुलाला वाढवतो जिथे आता पूर्वीसारखे वाटत नाही. तो संयम हा चित्रपटाच्या सर्वात मजबूत पर्यायांपैकी एक आहे.
बलात्कार झाल्यानंतर कामावर जाण्यासाठी जेव्हा पिडीता जाते तेव्हा मुख्याध्यापक महिला असतात त्यांच्या तोंडी जो संवाद आहे. ते आजच्या समाजाचे वास्तव आहे. ते म्हणतात माझ्या शाळेचा निकाल हा १००% लागला आहे . मात्र माझी संपूर्ण शाळा चं नापास झाली आहे. संवाद हिंदीत आहे मी मराठीत मांडला माणुसकी, संवेदना, भावना, सुख-दुःख, यापलीकडे मानव गेला आहे. आपण मुलांना योग्य गोष्टी शिकवत आहोत का? आपण गुण, करिअर, ए-आय आणि स्पर्धेवर इतके लक्ष केंद्रित केले आहे की, आपण नितिमत्ता, आदर, सहानुभूती शिकवायला विसरलो? आपण मुलांना एक सभ्य माणूस असणे म्हणजे काय? हे न शिकवता वाढवत आहोत का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात..
एक विकृती कायम त्याच्या मनात डोक्यात भिनलेली असते. पिडीता ही शिक्षिका असते. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची बातमी जेव्हा शाळेत कळते तेव्हा इयत्ता नववीत शिकणारे विद्यार्थी त्या व्हॅाट्स ॲप गृप वर ज्या कमेंट टाकतात, मिम टाकतात हे संतापजनक आहे. हेचं शिक्षण आपण त्यांना दिलं का? आज या वयात ते असे विचार कसे करु शकतात.
माझं असं वैयक्तिक मत आहे की, आपली शिक्षण व्यवस्था चं इथं फेल ठरली आहे.
स्त्री चा सन्मान आदर आजच्या समाजातील प्रत्येक घटक विसरला आहे. स्त्री ही नुसतं उपभोगाची वस्तू आहे. हे अजुन पूर्णपणे नामशेष झाले नाही. आपलं पौरुषत्व गाजवण्याचे एकमेव साधन म्हणजे स्त्री
अशी निच माणसिकता समाजाची बनली आहे. फार गप्पा होतात, चर्चा होतात, मोठमोठाले भाषणे, परिषदा, सक्षमीकरण सर्व केल्या जाते. परंतु तरीही बलात्कार होतात ही आपली हार आहे. एका घटनेमुळे महिलेशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कसा बदल होतो. मुले एका रात्रीत मोठी होतात. स्त्रिया भीतीशी झुंजायला शिकतात. पुरुष अशा शांततेत फिरतात जे स्पष्ट करणे कठीण असते.
तापसीने रावी नावाच्या वकीलाची भूमिका साकारली आहे. जी खुप तन्मयतेने आणी प्रामाणिकपणे काम करते. आणि पिडीतेला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. तिच्या संवादातून आणि मौनातून जे काही ती व्यक्त झाली आहे त्याला खरंच तोड नाही.
मोहम्मद झिशान अयुब, कनी कुश्रुती, कुमुद मिश्रा, रेवती, नसिरुद्दीन शाह, तापसी पन्नू या सगळ्यांचा अभिनय खूप चांगला आहे.
मनोज पाहवा, सीमा पाहवा, सुप्रिया पाठक या कलाकारांनीही आपल्या भूमिकांना विशेष न्याय दिला. छायाचित्रण आणि संगीत, कॅमेरावर्क आणि पार्श्वसंगीत चित्रपटातील वातावरणाला अधिक भयाण आणि वास्तववादी बनवते.
बाल कलाकार म्हणून आदिक जैसवाल याने उत्तम अभिनय केला आपल्या आईसोबत काहीतरी चुकीचं घडलयं हे त्याला कळतं त्याला त्याचे वडील कोर्टात घेवुन जातात तेव्हा कुणीतरी विचारतं हा लहाण मुलगा आहे. याला कशाला आणलं कोर्टात तर वडील जे उत्तर देतात ते एक माईल स्टोन ठरते ते असे
‘बच्चा कहां रहा है वो अब बडा हो गया है ’
हे सर्व तो या वयात अनुभवतो आहे.ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. न्यायाधीश म्हणून रेवती यांनी जी भूमिका केली आहे हे पाहून १९९१ मध्ये आलेल्या ‘लव्ह’ सिनेमातील मॅगी हि चुलबुली भूमिका साकारणारी रेवती हिचं आहे का? हे पाहुन खुप कौतुक वाटते. अत्यंत कसदार अभिनय आहे. तीची आणि रावी ची कोर्टात असतांना ची नजरेची भाषा हा सिनेमा चा आत्मा आहे.
कविता सून लेनी चाहीये
कभी कभी समझ में आ जाती है।
हा संवाद मार्मीक भाष्य करतो…
सिनेमात तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे दिग्दर्शन, दुसरं म्हणजे संवाद आणि तिसरं म्हणजे कॅमेरा टेकींग गिधाडे उडण्याचा सिन जो दाखवण्यात आला तो दर्शवितो की, गुन्हे करुनही उघड माथ्याने गुन्हेगार समाजात वावरत आहेत हे दुर्दैव आहे.भारतीय सिनेसृष्टीत अशा प्रकारचे चित्रपट तयार होणं आवश्यक आहे. कारण चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आपल्या समाजात नेमकं काय घडत आहे. हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. काही चित्रपटांमुळे समाजात बरेच सकारात्मक बदल होतात. ‘अस्सी’ या चित्रपटातूनही सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा आहे. एक उघडी जखम जी एवढ्यात चं बरी होणार नाही. आणि तरीही आम्हाला आशा आहे.
व्यवस्थेत बदल होईल…
‘आज मुझे पर मिले’
‘वक्त लगा, पर मिले’……
————————————

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा