मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रसंतांच्या सहवासात 
पद्मश्री श्री जनार्दन बोथे

                   लेखक
                  डाॅ. रामदास चवरे
                  पुणे .
                  संवाद : 8308998672

        खिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दनपंत बोथे यांना केंद्र शासनाने नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यानिमित्त यवतमाळच्या सुप्रसिद्ध दाते कॉलेजचे माजी प्राचार्य व मराठीतील सुप्रसिद्ध लेखक डॉ.रामदास चवरे यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची घेतलेली मुलाखत या ठिकाणी आम्ही रसिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत.

(1) आपण राष्ट्रसंतांच्या सहवासात कसे आणि केव्हापासून आलात?

गोगरी (जि. वाशिम) हे माझे जन्मगाव. तेथे वंदनीय राष्ट्रसंताचे आगमन झाले होते. मी तेव्हा दहा
बारा वर्षांचा असेल. स्वभावात बालसदृश खोडकर वृत्ती होती. त्यानुसार राष्ट्रसंतांशी वागलो. ते प्रसन्नपणे
हसलेत. मला जवळ बोलावले. सविस्तर चौकशी केली. मायेने पाठीवरून हात फिरविला. त्या अजाण वयातही
मी भारावून गेलो. त्यांच्याविषयी मनात ओढ निर्माण झाली. दुसरे दिवशी राष्ट्रसंत निघाले तेव्हा त्यांच्यासोबतच
निघालो. माझे वडील बापुराव पाटील हे वृत्तीने आध्यात्मिक, संत महात्म्यांविषयी आदर बाळगणारे. त्यांनीही
मला महाराजांसोबत जाण्यासाठी आनंदाने परवानगी दिली. तेव्हापासून मी महाराजांसोबत राहिलो. महाराजांनी
प्रेमाने सर्व कामे शिकविलीत. खूप चांगले संस्कार केलेत. जणू पाषाणातून मूर्ती घडविणारे शिल्पकारच ते. मी
त्यांचा खाजगी सचिव म्हणून सारी कामे करू लागलो. स्टेनो व टायपिस्ट म्हणून त्यांच्यासोबत वावरलो.
व्हायोलिन वाजविण्याचेही काम केले. फोटोग्राफर झालो. हजारो फोटो काढलेत. अशी विविधांगी कामे
करण्यात हरखून जात असे. महाराजांच्या सहवासात आनंदी, उत्साही वातावरण असे.

(2) तत्कालीन कालखंड, सामाजिक स्थिती, लोकमानस यांविषयी थोडक्यात सांगा.

त्यावेळी आजच्यासारखा शिक्षणाचा प्रसार झाला नव्हता. दृतगती वाहने नव्हती. गतीशील नि
नावीन्यपूर्ण प्रसार माध्यमे नव्हती. भौतिक समृद्धी नव्हती. समाज परंपराप्रवण होता. लोकमानसांत परंपरांचे
प्राबल्य होते. साधेपणा अधिक होता. या साधेपणाचे नाते अध्यात्माशी होते. मनात श्रद्धा होती. राष्ट्रसंतांच्या
भजन, प्रवचनाच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत. त्यांच्याविषयी आदर होता. भक्तिभाव
होता. खेड्यापाड्यांतले लोक पायाची पायपीट करीत कार्यक्रमाला हजेरी लावत. तेव्हा आर्थिक समृद्धीपेक्षा
मानसिक समाधान अधिक होते. विनोबा भावे, प्र. के. अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर, दादा धर्माधिकारी,
भवानीशंकर नियोगी अशा महामानवांच्या मनात राष्ट्रसंतांविषयी आदर होता.


(3) राष्ट्रसंतांची जीवनशैली, कार्यप्रणाली, दूरदृष्टी याबद्दल माहिती सांगाल का?

राष्ट्रसंत साधे, सरळ जीवन जगलेत. सकाळी चारनंतर ते कधीच झोपले नाहीत. तोच नियम त्यांच्या
अवतीभवतीच्या लोकांना आचरणात आणावा लागे. महाराज कधी कोणावर रागवत नसत. चिडत नसत.
अवतीभोवती कोणावर आघात झाला तर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत. ते कधी साधी जांभई देत नसत.
आपण थकलो आहोत, असे दाखवत नसत. ते खूप संयमी, सोशीक नि प्रेमळ होते. अंगात 104 डिग्री ताप
असतानाही ध्यानासाठी बसत. ते वृत्तीने शांत, उत्साही आणि आनंदी राहत. त्यांचे व्यक्तिमत्त्व चैतन्यदायी व
प्रेरणादायी होते. आपल्या सहवासातील सर्वांनी कर्तव्यतत्पर व कार्यमग्न राहावे, असे त्यांना वाटे. महाराज
हरहुन्नरी होते. एक द्वाड घोडा कोणालाच आपल्या पाठीवर स्वार होऊ देत नव्हता. लोकांनी महाराजांना
सांगितले. ते घोड्याजवळ गेले. त्याला पाहिले. त्याच्या पाठीवर थाप मारली. उडी मारून त्याच्या पाठीवर
स्वार झाले. तीन तास रपेट मारून परत आले. हे पाहून सारे स्तिमित झाले. शेतकरी, शेती, बैलजोडी यांविषयी
त्यांना लळा होता. समाज उन्नत कसा होईल, राष्ट्र बलवान कसे होईल यांविषयी ते मुक्त चिंतन करीत. महाराज
जेथे जात तेथे जणू त्यांची पावले उमटत. कोणतेच क्षेत्र त्यांना वर्ज्य नव्हते. म्हणूनच विनोबांच्या भूदान
कार्यासाठी ते तत्परतेने धावून गेले व अल्पावधीत त्यांनी हजारो एकर जमीन मिळवून दिली. राजकारणी नेते
यांना उद्देशून राष्ट्रसंत म्हणतात -
अब देशके नेता एक करो । आझादी आबाद करो
कहे तुकड्या लो संदेश मेरा । नही तो नाव झकोला खाता है
यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.

(4) राष्ट्रसंताच्या साहित्याचा स्वातंत्र्योत्तर विदर्भातील समाज, संस्कृती आणि साहित्य यांवर कोणता व
कसा परिणाम दिसतो ?

राष्ट्रसंत तुकडोजी हे कृतीशील संत होते. त्यांच्या ठिकाणी उक्ती आणि कृती यांचा संयोग होता. विदर्भ
किंवा महाराष्ट्र नव्हे तर अखिल भारत त्यांची कर्मभूमी होती. ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीत त्यांनी भारत चीन सीमेवर
जाऊन भारतीय सैन्याला प्रोत्साहित करणारे विचार व्यक्त केले. भारतीय समाज आणि संस्कृतीचे त्यांचे गाढ
आकलन होते. त्यांच्या उन्नयनाचा मार्ग सांगताना ते कधीच थकले नाही. समाज वरवर दिसायला साधा
असतो. मात्र तो विचाराने प्रगल्भ असतो. कोणालाही पारखून घेतल्याशिवाय त्याला आपले मानत नाही की
त्यांचे ऐकत नाही. राष्ट्रसंतांच्या बाबतीतही त्याने तेच केले. राष्ट्रसंतांचा उपदेश आणि त्यांचे जीवन त्याने न्याहाळले. त्याला ते मनोमन रुचले. म्हणूनच गावागावांत राष्ट्रसंतांच्या प्रतिमांचे पूजन होते. विचाराचे अनुसरण
होते. आजच्या धकाधकीच्या आणि संक्रमण कालखंडातही हे सातत्य टिकून आहे. राष्ट्रसंतांना समताधिष्ठित
समाज अपेक्षित होता. जीवनाला संपन्न, समृद्ध, उदात्त करणारी संस्कृती हवी होती. हा विचार लोकांच्या मनात
रुजलेला आहे. म्हणूनच आज भेदाभेद पाळताना लोक दहावेळा विचार करतात. एकमेकांना समजून घेण्याचा
प्रयत्न करतात. निमित्त साधून राष्ट्रसंतांच्या जीवनावरील व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. नागपूर आणि
अमरावती विद्यापीठात ‘राष्ट्रसंत विचार’ हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. विविध सांस्कृतिक
उपक्रमात राष्ट्रसंताचे समताधिष्ठित विचार येतात. राष्ट्रसंतांनी शिक्षण, आरोग्य, श्रमप्रतिष्ठा यांचे महत्त्व प्रतिपादन
केले होते. त्याही बाबतीत आज आशावादी चित्र आहे. उरला मुद्दा साहित्याचा. त्याविषयी मी बोलू शकत
नाही. तो माझा अभ्यासाचा प्रांत नाही. ते आपणच ठरवायचे.

(5) राष्ट्रसंत तुकडोजींच्या साहित्य निर्मितीविषयी थोडक्यात सांगाल का?

वं. राष्ट्रसंतांचे साहित्य आणि जीवन एकच आहे. ते जे जगले तेच लिहिले आणि जे लिहिले तेच
जगले. ते अपारंपरिक जीवन जगले. स्थैर्य आणि विश्रांती त्यांना कधी लाभलीच नाही. सारखे भजन, प्रवचन
चाले. आज येथे तर उद्या तेथे. अशावेळी जेव्हा जेथे जसा वेळ मिळेल तसे ते लिहायचे. अर्थात हे लेखन
प्रसिद्धीसाठी नव्हते, हे तर स्पष्टच आहे. त्यांच्या लेखनात कळवळा आहे, प्रबोधनविचार आहे, परिवर्तनाची
दिशा आहे, अस्पृश्यता निवारणाची ओढ आहे. ग्रामीण माणसाला सुखाने जगता यावे म्हणून ते परोपरीने
नवनवीन विचार सांगतात. साधारणतः साहित्य निर्मितीसाठी मानसिक स्थैर्य व एकांत हवा असतो. राष्ट्रसंतांच्या
बाबतीत ते शक्य नव्हते. त्यांचे श्री गुरुदेव आश्रम, मोझरी येथे वास्तव्य असताना लेखन सुरू असे, तसे
प्रवासातही त्याचे सातत्य असे. एखादा प्रसंग पाहून ते व्यथित होत आणि त्यांच्या लेखणीला धुमारे फुटत.
जपानचा दौरा केल्यानंतर तेथील अनुभवावर त्यांनी केलेले लेखन वास्तव साहित्याचा आदर्श ठरावे. राष्ट्रसंत
सर्जनशील साहित्यिक होते. मात्र तसे ते कधीच बोलत नसत.

(6) राष्ट्रसंतांची अंतिम इच्छा कोणती होती?

सर्वसामान्य माणूस राष्ट्रसंतांच्या विचाराचा केंद्रबिंदू होता. हा सर्वसामान्य माणूस ग्रामीण परिसरात
राहतो. शेतीत राबतो. तो जगाचा पोशिंदा आहे. त्याला उद्देशून राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली आणि ती
ग्रामनाथाला अर्पण केली. ही बाब खूप बोलकी आहे. ‘‘जब देखू किसानोंकी भलाई। मैने खुशियाँही खुशियाँ
मनाई‘‘ हे त्यांचे उद्गार आहेत. माझे साहित्य घरोघरी जाऊ द्या. मी साहित्यातून तुम्हाला भेटेल, असे ते म्हणाले होते. त्यांनी अनेक जुन्या परंपरा नाकारल्या. माझी गादी नाही. माझा कोणी वारसदार नाही, असे त्यांनी स्पष्ट
बोलून दाखविले होते. चांगल्या गुणांचा माणूस माझे कार्य चालवेल असे ते म्हणत असत.

(7) राष्ट्रसंतांनंतर आश्रमात त्यांचे कार्य कसे सुरू आहे?

आज आश्रमात नियमितपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळी ध्यान होते.
सर्वधर्मसमभावाचे पालन होते. स्वच्छतेवर लक्ष दिले जाते. दरवर्षी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त
बौद्धिक सत्रांचे आयोजन होते. राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा दिला जातो. क्रियाकर्माऐवजी कृतीवर भर
असतो. विदर्भात अनेक जिल्ह्यांत गुरुदेव सेवा मंडळाच्या विविध शाखा आहेत. त्या कार्यरत आहेत. मोझरीला
गुरुदेव सेवा मंडळाच्या सभा होतात. त्यातून विधायक चर्चा होतात. आजही महाराजांचे समाधीस्थळ पाहणारांचे
लक्ष वेधून घेते. स्वच्छता, नीटनेटकेपण, आटोपशीरपणा तेथे दिसून येतो. एका अर्थाने ते प्रेरणास्थळ आहे.
                      ००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...