आजची कथा
कर्माचा सिध्दान्त
लेखक
- सचिन मधुकर परांजपे
पालघर
“आयुष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या....
माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ... आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले. रिटायरमेंटपर्यंत एकही इनक्वायरी नाही की कसली चौकशीही नाही. खाल्लेला पै न पै नीट पचवून, इन्वेस्ट्मेंट करुन आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करुन पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते. कसलीही ददात नाही की काही नाही.... वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य. रोज स्कॉच आणि सिगारेटी वगैरे असूनही तब्येत धडधाकट. सहा परदेशप्रवास, आलिशान कार, मुलाचा बिझनेस... मज्जानू लाईफ.
एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे आले, पत्रिका दाखवायला... बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले. मला समजेचना... मग विषयाला हात घातला. ते त्यानंतर जे काही म्हणाले ते मला तरी खूप आंतर्मुख करुन गेलं...
“सचिन, वरवर बघता मी म्हणेन माझ्याइतका सुखी माणूस कोणी नाही. वारेमाप पैसा, तीन फ्लॅट्स, गावाकडे बंगला, पैसा अडका, सगळं काही आहे. पण तुला सांगू? माझं मन आता गेले काही दिवस मला अतिशय खात आहे. मी कोणालाही सांगू शकत नाही, बायकोलाही सांगितले नाही... अरे, आता मला रोज आयुष्य जगताना, बँक बॅलन्स बघताना, बायकोचे दागिने बघताना, मी आयुष्यभर ज्यांना ज्यांना लुटलं, ज्यांच्याकडून पैसे खाल्ले त्यांचे चेहरे उभे रहातायत. म्हणजे मी जेव्हा अगदी ज्युनियर असल्यापासून एका खेड्यातल्या गरीब बाईकडून साहेबांच्या सहीला पन्नास रुपये लागतील असं बोलून जिच्याकडून पैसे खाल्ले त्या बाईचा चेहराही उभा रहातो. मी जिथून जिथून पैसे खाल्ले, लोकांची अडवणूक केली आणि पैसा दिला नाही म्हणून कामं केली नाही ते सगळे मला दिसतात... माझा कॉन्शस मला खायला लागला आहे. मी झोपलो तरी मला आता मन शांत बसू देत नाही.... एका बाईने मला लाच म्हणून हजार रुपये दिले नाही. मी तिचं काम केले नाही ती बाई दिवसभर आमच्या ऑफिसबाहेर झाडाखाली हतबलपणे बसून होती ते आठवतं, तेव्हा काही वाटलं नव्हतं, पण आता मला कमालीची बेचैनी येते. तिचा हतबल म्लान चेहरा आठवतो. अत्यंत लबाडीने आणि साळसूदपणे लोकांना लुबाडून केलेल्या खरेद्या आठवतात. गोरगरिबांना लुटून मी युरोपवारी केली त्याचा गिल्ट मला आतून कुरतडतो आहे...
सगळं मजेत चाललंय असं तुम्हाला जगाला दिसतंय ते तसंच दिसत रहाणार याची काळजी मी घेतोच आहे. पण परवा मुलगा माझ्या सुनेसमोर मला म्हणाला, 'पपा तुम्ही गप बसा हो. तुम्हाला काय कळतंय?' माझा कचरा झाला तिच्यासमोर. पण पुन्हा हसरा रिलॅक्स मुखवटा घेऊन मी वॉकला बाहेर पडलो रे...
वाल्या कोळ्यासारखी गत झाली आहे माझी. माझं आंतर्मन मला सांगतंय... आत्ता आनंदी मुखवटा घालून मी हसत खिदळत फिरतोय पण आतून पोखरत चाललो आहे मनाने. मला अन्नपाणी गोड लागत नाही. मी अबोल होत चाललो आहे. हरिद्वारला जाऊन गंगास्नान पण करुन आलो.... काय जे मनात येईल ते करतो. अन्नदान करतो, होमहवन करतो पण मला आतून माहित आहे... हे डाग निघणार नाहीत. मी आतल्या आत कोंडून मरणार आहे सचिन....”
मी पत्रिकेवर नजर टाकली. शनि महादशा सुरु होऊन जेमतेम सहा महिनेच झाले होते. शनि महाराजांचा अंमल सुरु झाल्यावर देवांचे देव महादेवही जिथे वरमले आणि हत्तीचं रुप घेऊन जंगलात लपले तिथे असल्या छाटछूट रावसाहेब आणि तात्यालोकांची काय अवस्था होणार? आजही ते गृहस्थ दिसतात... नजरेतला भकासपणा आणि एकटेपणा आताशा जास्त गडद होत चालला आहे... बाकी सगळं छान सुरु आहे!!!
©® सचिन मधुकर परांजपे
पालघर.
(आवडल्यास सामायिक करतांना लघुकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)
आजची ही कथा *माजी वायुसैनिक श्री. चंद्रशेखर धुमाळ, हैदराबाद* यांच्या सौजन्याने.
_*C/P.*_

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा