मुख्य सामग्रीवर वगळा

सत्य कथा


                    सत्य कथा                 
                    
                      श्रीमंती

                     लेखिका
           - सौ. गीता वासुदेव नलावडे
            बोरिवली, मुंबई.
            संवाद : 8655846810




       राहुल काळे हा माझा लाडका विद्यार्थी. त्याला नुकतीच जुळी मुलं (एक मुलगा, एक मुलगी) झाली हे समजलं आणि खूप म्हणजे खूपच आनंद झाला. लगेच त्याला अभिनंदनचा फोन केला. बाळांना बघायला जायचे मात्र काहीना काही कारणाने लांबणीवरच पडत होते, आज तीन महिन्यांनी तो योग आला होता. 
      शाळेत पोचल्यावर बाळांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी राहुलला फोन केला. तर तो म्हणाला, "बाई, मी आत्ता थोडा वेळ बाहेर चाललोय, पण तुम्ही आजच या. मी गाडी पाठवतो." 
       डॉक्टर असलेला धाकटा भाऊ स्वप्निल गाडी घेऊन आला. स्वप्निलनं अदबीने गाडीचा दरवाजा उघडला, माझ्या हातातली पर्स मागच्या सीटवर ठेवली. गाडीत थोड्या गप्पा झाल्या आणि स्वप्नील -  राहुलच्या इमारतीच्या आवारात गाडी थांबली. 


      स्वप्निल पर्स घेऊन माझ्यापुढे, म्हटलं, "अरे, पर्स दे," तर म्हणाला, "राहू द्या, बाई. मी आणतो ना."
      त्याच्या वागण्याने खरंच भारावून गेले. राहुलला म्हटलं, "अरे, गाडी कशाला पाठवलीस ? आणि तेही स्वप्नीलला यायला लावलंस. रिक्षाने आले असते. मी काही कोणी मोठी व्यक्ती नाही." 
       तर तो म्हणतो, "तुम्ही मोठ्या आहात का नाही, हे आम्ही ठरवायचं, तुम्ही नाही." त्याच्या उत्तरावर मी निरुत्तर.
       घरी तर स्वागताची जंगी तयारी. स्वप्नीलच्या बायकोने शिरा केला होता आणि राहुलच्या बायकोने पोहे. मी घरून येतानाच तुडुंब जेवून गेलेले. "निम्मं करा ग. एवढं सगळं नाही जाणार," असं म्हणत गप्पांना सुरुवात झाली. 
       "श्री दत्त स्नॅक्स" नावाने राहुलची अनेक ठिकाणी हॉटेल्स आहेत. मुंबई अहमदाबाद हायवेवर मनोरला आणखी एका हॉटेलचं बांधकाम सुरू आहे. 
      त्याच्या वडिलांनी, श्रीक्षेत्र परशुराम येथे एका शैक्षणिक संस्थेला 55 लाख रुपयांची मदत केली होती. त्या शाळेचे कामकाज, त्या शाळेचा रिझल्ट, त्याठिकाणी बाबांसाठी बांधलेलं स्वतंत्र ऑफिस, पनवेल येथे पटवर्धन हॉस्पिटलला त्यांनी दिलेली मदत, या सर्व गोष्टी राहुल - स्वप्नील मोठ्या कौतुकाने सांगत होते. 
      मुलांच्या कर्तृत्वाचा अभिमान आई-वडिलांना असतो, तर इथे मुलांच्या डोळ्यात आपल्या वडिलांच्या सत्पात्री दानाचा आणि दानशूरतेचा सार्थ अभिमान दिसून येत होता. 
      शैक्षणिक क्षेत्राला मदत केलेली असल्याने मलाही खूप उत्सुकता होती. राहुलच्या वडिलांचे हे कार्य पाहून कोणालाही आनंद झाला होईल. पैसेवाले बरेच असतात, पण देण्याची वृत्ती फार थोड्या लोकांकडे असते. इथे तर लक्ष्मी आणि सरस्वती दोघेही आनंदाने नांदतांना दिसत होते. 
      राहुलच्या बायकोने दोन्ही बाळं बाहेर आणली. मुलगी आर्या म्हणजे अगदी ज्युनियर राहुल ! हाक मारल्याबरोबर इतकी छान हसली की जगातील सर्व मौल्यवान गोष्टी त्यावरून ओवाळून टाकाव्यात. मस्तच हसू होते. अजूनही माझ्या नजरेसमोर तो हसरा चेहरा येतो आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं. अंगदला (मुलगा) खोकला व ताप असल्यामुळे तो शांत होता. दोन्ही छोट्यांना बघून, मन समाधान आणि आनंदाने भरून गेलं. 
       तासाभरात शाळेत यायला निघाले तर पेढे बर्फीचे दोन बॉक्स राहुलने हातात ठेवले, म्हणाला, "एक शाळेत द्यायला सगळ्यांसाठी आणि एक घरी न्यायला." शाळेत सोडायला पुन्हा गाडी होती. स्वतः राहुल गाडीत बसवायला आला. मला अवघडल्यासारखं झालं. ही कामाची मुलं, आपल्यासाठी उगाच त्यांचा वेळ वाया नको जायला. 
      दुसऱ्या दिवशी, माझं एवढे अगत्याने स्वागत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी राहुलला फोन केला, तेव्हा म्हणाला, "बाई, तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्यात. काल आई-बाबा त्या शाळेच्या भूमिपूजनाला गेले होते. तिथे तुमची आठवण आईने काढली. ती वेळ होती सकाळी साडेअकराची आणि तुम्ही त्याच वेळेस साधारणत: घरी आलात, हा योगायोग.
      दुसरे, तुम्ही गेल्यावर माझ्या बायकोनं मला एक ग्रे कलरची पर्स आणून दाखवली. लग्नानंतर आम्ही दोघं तुम्हाला भेटायला आलो होतो, तेव्हा तुम्ही ती तिला दिली होतीत. "माझ्या विद्यार्थ्यांसाठी देतेय" असं त्यावेळेस सांगितलं होतं. ती पर्स ती बाहेर कुठेही वापरत नाही. मी दिलेले पैसे त्यात ठेवते आणि पर्स जपून कपाटात ठेवते."
       हे दोन्ही प्रसंग ऐकल्यावर काय बोलावं मला कळेना. करोडोंची उलाढाल करणारा राहुल, घरात लक्ष्मी पाणी भरते आहे. ती छोटीशी पर्स, तिची किंमत ती काय ! पण त्या मागची भावना समजून तिने अजून जपून ठेवली. 
       राहुल माझा विद्यार्थी, त्याला माझ्याविषयी प्रेम असणे मी समजू शकते, पण त्याची बायको - तिची माझी जेमतेम पाच दहा मिनिटांची तेव्हाची भेट. पण तिने माझी भेट जपून ठेवावी, हे तिचं मोठेपण.
     खरंच, डोळ्यात पाणी येणार नाही तर काय ? आपले विद्यार्थी इतक्या उंचीवर जाऊनही पाय जमिनीवर ठेवून आहेत हे पाहून सार्थ अभिमान वाटला. 
      राहुल, तुझ्या हसऱ्या - खेळत्या संसाराला कोणाची नजर लागू नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप प्रेम आणि सन्मान दिलात बाळांनो, खूप खूप श्रीमंत केलंत मला !!
(हा लेख अकरा वर्षांपूर्वी लिहिलेला आहे. आज "मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दोन ठिकाणी, मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोर येथे दोन ठिकाणी, मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे येथे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर, मुंबई सातारा महामार्गावर वर्वे येथे, गोरेगाव पूर्व (मुंबई), मुंबई नाशिक महामार्ग पडघे येथे" अशा अनेक ठिकाणी श्री दत्त स्नॅक्स चोखंदळ ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे.)
        ©®सौ. गीता वासुदेव नलावडे.
बोरिवली, मुंबई, 8655846810
(आवडल्यास सामायिक करतांना सत्यकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)


    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...