• रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
अकोला :
अलिकडे नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू झाला, तर दुसरी ज्येष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अकोल्यातही मोकाट जनावरे भर रस्त्यात मधोमध बसतात. मुख्य रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. अनेक वस्तीत आपल्या शिंगांणी अनेकांना जखमी केल्याचे वृत्त आहे. परंतू याचा बंदोबस्त करण्यात प्रशासन ढिम्म आहे.
यद्यपि, ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. गायीच्या पोटात तेहतीस 'कोटी' देवांचा वास असल्याने रस्त्यावर दिसलेल्या गायींना स्पर्श करून दर्शन घेतल्याशिवाय कोणीही पुढे जाताना सहसा दिसत नाही. गाई शांत स्वभावाच्या असतात. त्या तुलनेत तिच्याच पोटी जन्मलेले बैल हे मात्र रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे शेतीकामे व फावल्या वेळात या बैलांना शर्यतीत उतरवले जाते. एखाद्यावर बैलाने केलेला हल्ला दुर्लक्षिला जाऊ शकतो; परंतु गायीने केलेल्या हल्ल्यात एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला प्राण गमवावे लागणे, ही नक्कीच हळहळ व्यक्त करणारी घटना म्हणावी लागेल.
नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे व तेवढ्याच उत्कंठतेने पाहिला जात आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या गायीने एका ज्येष्ठावर हल्ला केला. हा हल्ला अतिशय हृदय पिळवटून टाकणाराच म्हणावा लागेल. गाय, बैल यांसारखे पाळीव प्राणी स्वसंरक्षणासाठी शिंगांचा वापर करतात. पण कळवण येथील घटनेत कुंभार बांधवाने पायाने माती तुडवावी त्याप्रमाणे या गायीने त्या ज्येष्ठावर हल्ला चढवला. नागरिकांनी लाठ्या, दगडांचा वापर करून या गायीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण तिने हल्ला सुरूच ठेवला. या ज्येष्ठाला सोडविण्यासाठी रस्ता ओलांडून धावत आलेल्या दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीवर या गायीने हल्ला केला व त्यांनादेखील आपल्या चारही पायांखाली अशरशः तुडवले व यातच त्यांचा मृत्यू झाला. गायीने अशाप्रकारे हल्ला करावा ही घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. एकेकाळी गोठ्यात निवाऱ्याला असणाऱ्या, रानावनात शांत ठिकाणी चरणाऱ्या गायी आता शहरातील पडेल ते अन्नपदार्थ खाऊन गुजराण करताना दिसत आहेत. कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाईंना आता शहरात गोठ्यांसारखे निवारास्थान राहिलेले नाही. त्यांचे मालक सकाळी दूध काढून त्यांना मोकाट सोडून देतात. चाऱ्याचे वाढलेले भाव पाहता एका गायीला दिवसाला किमान दोनशे रुपयांपर्यंत खर्च येतो. त्या तुलनेत या गायी दूध देत नाहीत. त्यांच्या दुधावर मालकांची गुजराण होते. त्यामुळे या गायींना मोकाट म्हणून सोडून दिले जाते.
ग्रामीण भागात या गायींना रानावनात, शेतातील उर्वरित माल यातून चारा उपलब्ध होतो. पण शहरात या गायींच्या वाटेला उरलेसुरले फास्टफूड येते. त्यातून या गायींच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. शहरातील गलबलाटात या गायी चिडचिड्या व हिंसक होताना दिसत आहेत. जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभयीत असताना आता मोकाट जनावरे हिंसक बनल्यामुळे या विरोधात नागरिक आवाज उठवताना दिसत आहेत. या घटनेनंतर शहाणपण सुचलेल्या कळवण नगरपंचायतीने मोकाट जनावरे पकडून बेज येथील गोशाळेत पाठवली आहेत. संबंधित गायी मालकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.
शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न हा नवा नाही. शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्ते झाकोळले जात असताना याच रस्त्यांवर ही मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात. अनेक अपघातांना ही जनावरे कारणीभूत ठरतात. रात्रीच्या वेळी मोकाट फिरणारे कुत्रे अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहेत; परंतु याकडे कोणी गांभीर्याने पाहताना दिसत नाही. पूर्वी प्रत्येक गावात कोंडवाडे होते. गावात फिरणारी ही जनावरे या कोंडवाड्यात डांबली जात असत. कोंडवाड्यातील या जनावरांवर कोणी हक्क सांगितला तर दंड भरून त्यांना ही जनावरे परत दिली जात होती. परत अशी मोकाट जनावरे सापडली तर ती जप्त केली जात होती. गाव तिथे कोंडवाडा हा नियम पूर्वीपासून लागू आहे. पण शहरातील गोठे गायब होऊ लागले व कोंडवाडेही गायब झाले. मात्र, मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मोकाट जनावरांचा संबंधित प्रशासनाने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अथवा त्यांची रवानगी गोशाळेत करणेदेखील शक्य आहे. शहरातील वाढत्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी दरवर्षी कोट्यवधीची टेंडर काढली जातात; परंतु शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणातदेखील आता मलई खाऊ लागले आहेत.
हा सर्व प्रकार म्हणजे पैसे खाण्यासाठी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रकार आहे. शहरातील मोकाट जनावरांमुळे कायदा-सुव्यवस्थेचादेखील प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. या गायींची कत्तलीसाठी तस्करी होताना दिसते. नाशिकच्या कळवण तालुक्याचाच विचार केला तर येथे या गायींच्या तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यातून गोरक्षकांवर जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी हल्लेदेखील केले आहेत. हे सर्वकाही होत असताना मोकाट जनावरांवर व त्यांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कारवाई होताना दिसत नाही. घटनेचे मूळ शोधण्याऐवजी वरवर मलमपट्टी करण्यातच आपल्या प्रशासनाचा नेहमी शिरस्ता राहिला आहे. मोकाट जनावरांसाठी गोशाळांसारखे पर्याय असताना त्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. त्याउलट कोटींचे टेंडर काढून कुत्र्यांच्या गळ्यात दोर व माजरांच्या गळ्यात निर्बीजीकरणरूपी घंटा बांधण्यात प्रशासन व त्यातील अधिकाऱ्यांना अधिक रस असतो. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या मुक्या जनावरांकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही. पण ही मोकाट जनावरे आता मुकी राहिली नाहीत, तर हिंसक बनत चालली आहेत. त्यांना वेळीच वेसण घातले नाही, तर बिबट्यांनंतर मोकाट जनावरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा