लेखक
• डॉ.मोहन खडसे
संवाद : 9823289010
माणसाच्या जगण्यात काय महत्त्वाचे आहे? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असण्याची शक्यता असते. कुणी म्हणेल आनंद महत्त्वाचा, कुणी म्हणेल पैसे महत्त्वाचे, कुणी म्हणेल प्रतिष्ठा आणि लोकोप्रेम महत्त्वाचे ! मात्र कुणाला असं वाटत असेल तर ते चुकीचं नाहीच की समाधान महत्त्वाचे आहे. आता पुन्हा तेच की प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा विचार हा महत्त्वाचा आहे आणि त्याचा सन्मान करणे, हे इतरांचे कर्तव्य आहे, जे पूर्ण केले म्हणजे समाधान आपोआप मिळते.संवाद आणि चर्चा नेहमीच होत असतात. कुणी कुणाशी संवाद करताना व्यक्त होणे, हा एक भाग असू शकतो तर त्या व्यक्त होण्यातून इतरांना काही सांगणे, हा दुसरा भागअसू शकतो. असंच एकदा चर्चा सुरू असताना एकजण दुसऱ्याला म्हणाला, 'मला तुमच्यासाठी काही करणे हा आनंदाचा विषय कमी मात्र समाधानाचा विषय जास्त आहे, कारण आपण आपल्या या आयुष्यामध्ये कोणासाठी काही केलं हे लोकांना समजलं नाही तरी चालेल मात्र ते स्वतःला नक्कीच माहीत असतं ज्याचे रूपांतर आपोआप समाधानात होते यात शंकाच ती काय?' माणसाच्या कोणत्याही कृतीचं एकदा त्याला समाधान मिळालं म्हणजे त्याला आनंद हा आपोआपच मिळतो हेही तितकेच खरे. यात मात्र अडचण अशी आहे की माणूस हा समाधानासाठी कमी आणि आनंदासाठी जास्त धडपड करतो आणि त्यात कुणाला यश येतं कुणाला येत नाही. आनंदासाठी काही करताना मग ते कृती करणं असो, विचार करणे असो, प्रयत्न करणे असो की एखादी वस्तू विकत आणणे किंवा खाणे असो ! त्यामध्ये स्वतःचा विचार हा अधिक प्रमाणात करण्यात येतो तो तसा चुकीचा नाहीच मात्र इतरांसाठीही काही करण्याचा माणसाने प्रयत्न केला तर त्याला आनंद आणि दोन्ही समाधान हे दोन्ही एकाच वेळेला मिळतात यात शंकाच नाही. मग अशावेळी माणसाला 'हिमालय की गोद मे' सिनेमातलं मनोज कुमार आणि माला सिन्हा यांनी गायलेलं गाणं आठवू शकते ते असं की -
खिला जो मेरा दिल सारी बगिया खिली....
आनंदात समाधान नसते का? नक्कीच असते. माणसाने त्याच्या कुटुंबातील, मित्र परिवारातील, नातेवाईकांमध्ये कोणासाठी काही केलं तर त्याचा आनंद सगळ्यांना होतो आणि त्याचं समाधान हे नक्कीच त्याला असतं म्हणजे आनंदात समाधान असतं हे खरं! पण समजा एकाने दुसऱ्यासाठी काही केलं आणि ते त्याला माहीत नसलं पण जे केलं ते चांगलं केलं असल्याने, ज्याचं चांगलं झालं त्याला आनंद होतो मात्र करणाऱ्याला आनंद आणि समाधान दोन्ही प्राप्त होतात. आपण कोणासाठी काही करतोय हे 'दाखवण्यात' आनंदही मिळतो आणि समाधानही मिळतं मात्र त्याची चव काही वेगळी असते जी फार काळ माणसाच्या मनात टिकेलच याची खात्री नाही. अशातच जर माणसाने दाखविण्याचा प्रयत्न केला नाही पण करून टाकलं तर त्याचा आनंद आणि समाधान माणसालाच मिळतं. हा कुणाला स्वार्थीपणा वाटत असेलही मात्र इतरांनी माणसाच्या उपकाराखाली दबून राहू नये, म्हणूनही असं केलं तर काय हरकत आहे? पुन्हा तेच की काय करावं आणि काय करू नये, का करावं आणि का करू नये, हा ज्याच्या-त्याच्या विचारांचा अन् वृत्तीचा फरक असतो. याचं कारणही तसंच आहे कारण हा ज्याच्या-त्याच्या आनंदाचा विषय असतो, ज्याच्या त्याच्या समाधानाचा विषय असतो. कुणाला कशाचा आनंद तर कुणाला कशात समाधान मिळेल, हे कुणाला तरी सांगता आलं आहे काय?
आनंद कोणालाही आवडतो, आवश्यकही आहे मात्र समाधानाला महत्त्व तेवढेच आहे की नाही? खरं तर माणसाने एक काही तरी निवडण्याकडे लक्ष दिलेच पाहिजे, कारण की सगळंच काही एका वेळेला माणसाला मिळू शकत नाही. भारताच्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने, विविध ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चांगले मिळते तर काही मिळत नाही हे सत्य आहे.
संत कबीर त्यांच्या एका दोह्यात म्हणतात की -
चिंटी चावल ले चली
बीच में मिल गई दाल
कहे कबीर दो ना मिले
इक ले, इक डाल
माणसाच्या मनात मुळातच असलेल्या मोहाला नियंत्रित करण्यासाठी संत कबीरांनी असे लिखाण खूप केले आहे. वरील दोह्याचा अर्थही फार सोपा आहे. तो असा की आपल्या इवल्याशा तोंडामध्ये तांदुळाचा दाणा घेऊन जाणाऱ्या मुंगीला रस्त्यात डाळ दिसली. तिला डाळीचासुद्धा मोह झाला. मनात घालमेल झाली. ती अशी की तांदूळ सोडावा तरच डाळ मिळेल, डाळ सोडायची तरच तांदूळ मिळेल, पण दोन्ही एकत्र मिळू शकत नाही. काही सोडलं तर काही मिळतं हे सत्य ! आनंद आणि समाधानासंदर्भात हे खरं होऊ शकतं का? दोन्ही गोष्टी एकाच वेळेला मिळणं शक्य आहे काय? शक्य आहे पण त्याला अट आहे ती अशी की माणसाने केलेली कृती ही केवळ त्याच्या आनंदासाठी - नसावी तर इतरांच्या आनंदासाठीच असावी, तरच माणसाला आनंद आणि समाधान एकाच वेळेला मिळण्याची शक्यता असते. मनाची प्रसन्नता निर्माण होते ती अशाच वृत्तीमुळे!
(प्रस्तुत लेखक हे प्रख्यात स्तंभलेखक, शिक्षणतज्ज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोलाच्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करताहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा