'गुढीपाडवा' - भारतीय हिंदू
कालगणनेचा शास्त्रीय मानबिंदू
• मोहनशास्त्री जलतारे,
ज्योतिषाचार्य
रविवारी 30 मार्चला, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा असल्याने, ह्या दिवशी 'विश्वावसू' नामक नूतन संवत्सराचा प्रारंभ होत आहे. ह्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून गुढी उभारावी. गुढीचे पूजन करीत असताना
'ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाsभिष्ट फलप्रद | प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यम् मद्गृहे मंगलम् कुरु |अशी प्रार्थना करून गोडधोड नैवेद्य अर्पण करावा. आपापल्या कुळाचाराप्रमाणे ह्याच दिवशी श्रीरामचंद्रांच्या किंवा वासंतिक देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो.
आपल्या उत्तम आरोग्यासाठी ह्यादिवशी कडुनिंबाची पाने व त्याचा फुलोर घेऊन त्यामध्ये हिंग, जिरे, ओवा, गुळ इत्यादी पदार्थांचे चूर्ण करून ते ह्या दिवशी सेवन करण्याचा जुना प्रघात आहे. हा दिवस भारतीय वर्ष कालगणनेचा, खगोलीय गणितीदृष्ट्या वैज्ञानिक महत्त्व असलेला तसेच धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक असे महत्त्वाचे संदर्भ लाभलेला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा दिवस तर आहेच.
शिवाय वर्षातील अत्यंत शुभ अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभमुहूर्त सुद्धा आहे. हा सण म्हणजे आपला हजारो वर्षांपासूनचा सांस्कृतिक व राष्ट्रीय वारसा जतन करण्याचा एक महत्वपूर्ण दिवस होय. गुढीपाडवा या मंगलदिनाविषयी अनेक धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. ते सर्वच येथे मी मांडणार नाही. तर ह्या वर्षारंभ दिनाचे खगोलीय दृष्ट्या जे महत्त्व आहे, तेच येथे प्रामुख्याने अधोरेखित करायचे आहे.
परमेश्वराप्रमाणेच काळ सुद्धा अनादी व अनंत असला तरी तसेच तो निर्गुण व निराकार असला तरी ज्याप्रमाणे परमेश्वर वेळोवेळी अवतारित होऊन सगुण व साकार रूप धारण करतो तद्वतच काळ सुद्धा (अर्थात केवळ पृथ्वीतलावरील) ग्रहगतीच्या माध्यमातून सगुण व साकार होतो. तो कसा ?
ते आता समजून घेऊ. काल निदर्शक ग्रह आहेत व सर्व ग्रह हे सूर्याभोवती दीर्घ वर्तुळाकृती मार्गाने परिभ्रमण करीत असतात. ह्या वर्तुळाकृती मार्गात ग्रहांची परिक्रमा चालू असता ह्याचे आरंभ स्थान ते नेमके कोणते आणि आरंभबिंदू निश्चित न ठरवता ग्रह गोलांच्या फेऱ्यांची गणना तरी कशी करणार ? आपल्या सूर्य मालिकेत सूर्याभोवती फिरणारे सर्व ग्रह ज्या मार्गाने फिरतात, त्याला 'क्रांती मार्ग' असे म्हणतात.
हेच क्रांतीवृत्त सुद्धा होय. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीचा आस ह्या क्रांतिवृत्ताशी साडेतेवीस अंशाचा तिरका कोण करतो. ह्या आसाच्या काटकोनात पृथ्वीची सर्व अक्षवृत्ते आहेत. विषुववृत्त हे सगळ्यात मोठे अक्षवृत्त होय. हे विषुववृत्त क्रांतीवृत्तापर्यंत वाढविले तर ते आकाशातील विषुववृत्त होईल. हे आकाशस्त विषुववृत्त सूर्याच्या क्रांतीवृत्ताशी, पृथ्वीच्या आसाच्या तीरकसपणामुळे, क्रांतीवृत्ताला दोन ठिकाणी छेद देते. त्यामुळे क्रांती वृत्त हे विश्ववृत्ताच्या अर्धे उत्तरेस व अर्धे दक्षिणेस विभागले जाते. विषुववृत्त क्रांतीवृत्ताला ज्या ठिकाणी छेद देते त्या बिंदूला 'संपात बिंदू' असे म्हणतात. सूर्याच्या उत्तरायणाच्या काळात ज्यावेळी सूर्य ह्या संपात बिंदूत प्रवेश करतो, त्यावेळी वसंत ऋतूची सुरुवात होते. म्हणून त्या बिंदूला 'वसंत संपात' किंवा 'उत्तर संपात' असे म्हणतात. क्रांतीवृत्तावरील हा वसंत संपात बिंदू, हेच ग्रहांचे अंतर मोजण्याचे वा फेरे मोजण्याचे प्रारंभ स्थान होय. आणि म्हणूनच ह्या बिंदूजवळ जेंव्हा सूर्य आणि चंद्र हे महत्त्वाचे दोन्ही ग्रह एकत्र येतात, अर्थात त्यांची पूर्व-पश्चिम शून्य अंशात युती होते, त्यानंतरच्या सूर्योदयकाळी भारतीय नवीन वर्षास सुरुवात होते.
आणि हा दिवस म्हणजेच 'चैत्र शुक्ल प्रतिपदा' म्हणजेच 'गुढीपाडवा' होय. भारताच्या उत्तर भागामध्ये हा सण 'नवरेह' तर दक्षिण भारतात हा 'उगादी' नावाने साजरा होतो. पंजाब हरियाणा इत्यादी ठिकाणी साजरा होणारा 'बैसाकी' ही हाच. अशा प्रकारचे कुठलेही खगोलाधारित वैज्ञानिक, गणितीय, शास्त्रीय अधिष्ठान इंग्रजी, हिजरी वा अन्य प्रकारच्या कालगणनेस मात्र नाही. (इसवी सणाची पद्धती, ग्रेगोरियन कॅलेंडर याची अशास्त्रीयता मी ह्या अगोदरच्या अन्य प्रकाशित लेखांमध्ये सविस्तर निवेदन केली आहे). ही चांद्र कालगणना असून ह्याचा उत्तम गणितीय मेळ, सौर कालगणेशी बसवलेला आहे. त्यामुळे आपले सर्व सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आदी हे ठराविक ऋतूमध्ये तसेच त्या त्या मासामध्येच येतात.
ह्या उलट हिजरी कालगणना जरी चांद्रकाल गणनेवर आधारित असली तरी तिचा मेळ सौर कालगणनेशी नसल्यामुळे त्यांचे सर्व सण हे ऋतुचक्रामध्ये मागे मागे सरकताना दिसून येतात. ह्यास्तव गुढीपाडव्यापासून सुरू होणारी हिंदूंची भारतीय कालगणना हीच खरी शास्त्रीय कसोटीला उतरणारी कालगणना ठरते.
अशा प्रकारे शास्त्रशुद्ध, गणितसिद्ध व विशिष्ट खगोलीय ग्रहस्थितीच्या अचूक मापदंडावर आधारित तसेच जगाच्या इतिहासात सर्वात प्राचीन असलेली अशी सर्वार्थाने आपली अस्मिता असलेली ही हिंदू कालगणना केवळ आपल्यासाठीच अभिमानास्पद नसून सर्व जगानेच हया कालगणनेचा पुरस्कार करायला हवा. कारण ती पूर्णपणे वैज्ञानिक आहे. त्यामुळे, तसा तो सर्व जगाला सहज करताही येईल. तथापि आपणच ह्या बाबतीत उदासीन असल्यामुळेच जगाला त्याचे महत्त्व पटवून देण्यात आजतागायत कमी पडलो आहोत, हे खेदाने का होईना मान्य करावे लागते. तथापि भारताला जर अधिक सामर्थ्यशाली व विश्वगुरु म्हणून स्वतःला सिद्ध करावयाचे असल्यास ह्यापुढील भविष्यात आपल्या ह्या शास्त्रशुद्ध हिंदू कालगणनेचे महत्त्व जगाला आपण पटवून द्यायला हवे. असे झाल्यासच आपण जगाला खरे मार्गदर्शक व विश्वगुरू होऊ शकू.
जरी आपण आपले सर्वच धार्मिक सण, उत्सव, व्रतवैकल्ये, महापुरुषांची जयंती / पुण्यतिथी ही आपल्या या हिंदू कालगणनेनुसारच साजरे करीत असलो तरी आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये मात्र आपण ह्या कालगणनेची उपेक्षाच अधिक करीत आहोत. कारण आपण परकीय इंग्रजी सत्ता तर उलथवून लावली पण त्यांचे संस्कार मात्र आपण अजून पूर्णपणे उलथवून लावू शकलो नाही, हे खेदाने का होईना मान्य केलेच पाहिजे. असो.
आपणा सर्वांना नूतन संवत्सराच्या
हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक शुभेच्छा.
• ज्योतिषाचार्य मोहनशास्त्री जलतारे,
अकोला. mob. no.9822711733
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा